WFTW Body: 

शेवटल्या दिवसांतील एक मोठा धोका म्हणजे,' शक्तीहीन सुभक्तीचे रूप धारण करणे' (२ तीमथ्य ३:५). आपल्यात असलेल्या शक्तीमध्ये जी आपल्याला आपली दाने आणि प्रतिभा यांमुळे मिळाली आहे त्यात समाधान मानणे खूप सोपे आहे. जीव स्वभावाचे सामर्थ्य हे बौद्धिक शक्ती, भावनिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांतून प्रकट होते. पण यांपैकी एकही, ख्रिस्त आणि पवित्र आत्मा आपल्याला देण्यासाठी आलेले दैवी शक्ती नाही.

थोर शास्त्रज्ञ, विद्वान आणि हुशार धर्मोपदेशकांमध्ये बौद्धिक शक्ती दिसून येते. रॉक संगीतकारांमध्ये - आणि बऱ्याच धर्मोपदेशकांमध्येही भावनिक शक्ती दिसून येते. योगतज्ञ आणि इतर तपस्वींमध्ये इच्छाशक्ती दिसून येते - आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाद्वारे इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपदेशकांमध्ये देखील. या तीनपैकी एकालाही आपण आत्मिक शक्ती समजण्याची चूक करू नये.

आत्मिक शक्ती प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीत देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास भाग पाडते. हजारो वर्षांपासून आपल्या कक्षेत योग्य वेळी फिरणाऱ्या ग्रह-ताऱ्यांमध्ये दिसून येत असलेल्या देवाच्या सामर्थ्याचा विचार करा. या परिपूर्णतेचे कारण म्हणजे त्यांनी देवाच्या नियमांचे पूर्ण पालन केले आहे. हे खगोलीय पिंड या गोष्टीची मूक साक्ष देतात की, देवाची आज्ञा पूर्णपणे पाळणे हीच सर्वात चांगली गोष्ट आहे.

येशूने सैतानावर पाशवी शारीरिक शक्तीने नव्हे, तर आत्मिक शक्तीने मात केली. सैतानाच्या परिक्षेत पडल्यावर जरी येशूला असे करता आले असते तरीसुद्धा येशूने धोंड्यांचे भाकरीत रूपांतर करण्यास नकार दिला; आणि, ४० दिवसांच्या उपवासानंतर, त्याचे शरीर अन्नासाठी तळमळत होते हे जरी खरे असले तरी सुद्धा. हे, भूक लागली नव्हती तरीसुद्धा, एदेन बागेत तिची शारीरिक इच्छा लगेच तृप्त करणाऱ्या हव्वेने जे केले त्याच्या अगदी उलट होते. अन्नाच्या इच्छेप्रमाणेच, लैंगिक इच्छा ही आपल्या शरीरात वास करणारी आणखी एक इच्छा आहे. ही देखील सतत समाधानाची लालसा बाळगते. जेव्हा आपल्याजवळ आत्मिक सामर्थ्य असेल तेव्हा आपण येशूसारखे होऊ ज्याने म्हटले होते की तो त्याच्या शरीराची लालसा पूर्ण करण्याऐवजी "देवाच्या प्रत्येक वचनानुसार" जगेल.

भौतिक सिंहांना फाडून टाकण्याची शमशोनाकडे मोठी शारीरिक शक्ती होती. पण त्याच्यातील लैंगिक वासनेच्या सिंहाने त्याला वारंवार फाडून टाकले. लैंगिक वासना ही कोणत्याही सिंहापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रबळ असते, हे यावरून सिद्ध होते. योसेफ मात्र शमशोनापेक्षा बलवान मनुष्य होता, कारण तो वासनेच्या सिंहाला पुन्हा पुन्हा, दिवसामागून दिवस फाडू शकत होता (उत्पत्ती ३९:७-१२).

देव आपल्याला आत्मिक शक्ती देईल की नाही हे आपले हेतू ठरवतात. जर तुमचे जीवनातील ध्येय आणि महत्त्वाकांक्षा केवळ देवाला संतुष्ट करणे आणि त्याचे गौरव करणे असेल, तर तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य सहजपणे देईल. "तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता." (याकोब ४:३).

नोकरी किंवा व्यवसाय म्हणजे केवळ आपला उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. जीवनातील आपली महत्त्वाकांक्षा मात्र केवळ देवाला संतुष्ट करणे हीच असली पाहिजे - आणि स्वतःसाठी किंवा या जगात महान बनण्यासाठी जगू नये. सैतानाने या जगाच्या वैभवाने येशूलाही मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. तर, तो आम्हालाही नक्कीच तसेच करेल. पण आपण ते सतत नाकारले पाहिजे (जसे येशूने केले होते), कारण सैतानाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नमन करण्याद्वारेच आपण हे वैभव मिळवू शकतो. पैशाबद्दल प्रेम आपल्याला आपल्या जीवनाकरता देवाची योजना पूर्ण करण्यापासून परावृत्त करणार नाही याची आपण खासकरून काळजी घेतली पाहिजे. आजपासून २००० वर्षांनंतर आपल्या निवडीबद्दल आपल्याला कसलाही पस्तावा होता कामा नये.