लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

लूक १०: ४२ मध्ये येशूने मार्थेला उच्चारलेले शब्द किती चित्तवेधक आहेत: "एक गोष्ट आवश्यक आहे!" पुष्कळ चांगल्या गोष्टी करायच्या असतील आणि पुष्कळ गोष्टी खरोखरच अत्यावश्यक समजल्या जाऊ शकतात. पण येशूने पुष्टी दिली की, इतरांपेक्षा एक गोष्ट अगत्याची होती. ती एक गोष्ट काय होती?

येशू आणि त्याचे शिष्य नुकतेच बेथानीला पोहोचले होते. मार्थेने त्यांना पाहताच तिने आनंदाने त्यांचे तिच्या घरी स्वागत केले, त्यांना बसवले आणि लगबगीने काही अन्न तयार करण्यासाठी सरळ स्वयंपाकघरात गेली. दरम्यान, येशूने उपस्थित लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली. तिची बहीण मरीया तिच्या मदतीला धावून येण्याऐवजी त्याचे शब्द ऐकण्यासाठी बसल्याचे मार्थेला समजले तेव्हा ती रागाने स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि येशूकडे वळून तिने त्याला थोड्याफार अशा शब्दांत विनंती केली : "प्रभू , मी स्वयंपाकघरात तुम्हां सर्वांसाठी जेवण तयार करण्यासाठी श्रम घेत आहे. आणि माझी बहीण काही न करता नुसती बसली आहे. तिला उठून माझी मदत करायला सांग!" पण आश्चर्य म्हणजे येशूने खुद्द मार्थेलाच फटकारले. मरियेची नाही तर तिची स्वतःची चूक आहे असे तो तिला म्हणाला.

आता आपण हे लक्षात घेऊ या की, मार्थेला अशा प्रकारे संबोधित करण्यात आले होते ते कोणत्याही पापासाठी नव्हते. तिने येशूचे आनंदाने आपल्या घरी स्वागत केले होते. त्यावेळी तिने स्वयंपाकघरात जे काम केले ते स्वत:साठी नव्हे, तर त्याच्यासाठी आणि त्याच्या शिष्यांसाठी होते. ती आज एका विश्वासणाऱ्या व्यक्तीचे चित्र आहे, ज्याने प्रभूचे हृदयात स्वागत केले आहे आणि तो निःस्वार्थपणे प्रभूची व इतरांची सेवा करू इच्छित आहे. ती उत्साही असूनही येशूने तिला फटकारले. इथे आपण स्वतःला विचारतो की मुद्दा काय आहे? तिच्या कृतीत काय गैर होते? आणि याचे उत्तर येशूच्या त्या चार शब्दांत आहे: "एक गोष्ट आवश्यक आहे." मार्थेला तिच्या सेवेबद्दल नाही, तर प्रथम गोष्टीला प्रथम प्राधान्य न दिल्याबद्दल मार्थेला फटकारण्यात आले .

प्रभूने म्हटले, मरियेने चांगला वाटा निवडला आहे. तो काय होता? ती फक्त येशूच्या पायाशी बसली आणि तिने त्याचे शब्द ऐकले. आणखी काही नाही. पण तो चांगला वाटा आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा ही एकच गोष्ट आवश्यक आहे. ऐकण्याला आपल्या जीवनात किती स्थान आहे? प्रभूच्या चरणी बसण्यात, त्याचे वचन वाचण्यात आणि त्यातून तो आपल्याशी बोलताना ऐकण्याचा प्रयत्न करण्यात आपण किती वेळ घालवतो? कदाचित फारसा नाही. इतर गोष्टींच्या गर्दीमुळे आपण अनेकदा मार्थेने जी चूक केली तशाच चुकीबद्दल दोषी आढळतो. केवळ ऐहिक गोष्टींच्या कारभारामुळेच आपण व्यस्त असतो असे नाही. ते ख्रिस्ती सेवेमुळेही होऊ शकते. प्रार्थना, उपासना किंवा साक्षीसाठी सभांमध्ये आपण सक्रियपणे सहभागी होत असू आणि तरीही प्रभू मार्थेप्रमाणे आपल्याला फटकारत आहे असे आपल्याला आढळेल.

येशूच्या पायाजवळ बसलेल्या मरीयेकडून किमान तीन आध्यात्मिक सत्ये शिकता येतील.

१. बसणे - चालणे, धावणे किंवा उभे राहणे यापेक्षा प्रामुख्याने विश्रांतीचे चित्र आहे. हे आपल्याला शिकवते की देव आपल्याशी बोलताना ऐकण्याआधी आपले हृदय स्वस्थ व आपले मन स्थिर असले पाहिजे. कबूल न केलेले पाप हृदयाला स्वस्थ होण्यापासून रोखेल , तर या जगाच्या चिंता आणि संपत्तीचे सततचे विचार मन स्थिर होण्यास अडथळा करेल. विवेक अशांत असेल किंवा मन चिंता किंवा भीतीने भरलेले असेल देवाचा "शांत लहान आवाज" ऐकण्याची आपण कशी आशा करू शकतो? स्तोत्र ४६:१० आपल्याला सांगते की जर आपल्याला देवाला ओळखायचे असेल तर आपण शांत असले पाहिजे.

२. एखाद्या व्यक्तीच्या पायाजवळ बसणे हे नम्रतेचेही चित्र आहे. मरीया खुर्चीवर येशूच्या स्तरावर बसली नव्हती, तर खालच्या स्तरावर बसली होती. न्याय वगळता देव कधीही गर्विष्ठ मनुष्याशी बोलत नाही. पण तो सदैव नम्र आत्म्यांबरोबर बोलायला, त्यांच्यावर आपली कृपा ओतायला तयार असतो जे त्याच्या समोर बालकासारखे होतात.(मत्तय ११:२५)

३. मरीयेप्रमाणे बसणे हे अधीनतेचे चित्र आहे. आपल्या धन्याच्या उपस्थितीत शिष्याची ही मनोवृत्ती असते. देवाच्या वचनाच्या आज्ञापालनातून आपली अधीनता प्रकट होते. आपली जिज्ञासा तृप्त करण्यासाठी किंवा आपल्याला माहिती देण्यासाठी देव आपल्या वचनातून बोलत नाही. त्याचे वचन हे त्याच्या हृदयाच्या इच्छेची अभिव्यक्ती आहे. आपण आज्ञा पाळाव्यात म्हणून तो बोलतो. येशूने, योहान ७:१७ मध्ये स्पष्ट केले की जर आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यास तयार असलो तरच आपल्याला ती इच्छा समजेल.

पुष्कळ ख्रिस्ती लोक कित्येक महिने आणि वर्षे पवित्र शास्त्र वाचतात आणि त्याद्वारे देवाचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करत नाहीत. तरीही ते खूप समाधानी दिसतात. मी तुम्हांला विचारतो, तुम्हांला दररोज प्रभूचा आवाज ऐकू येतो का? नसेल तर याचे कारण काय आहे? जे ऐकतात त्यांच्याशीच तो बोलतो. असे काय आहे ज्यामुळे तुमच्या आत्म्याचे कान ऐकेनासे झाले आहेत? तो शांततेचा अभाव आहे का, आत्म्याच्या नम्रतेचा अभाव आहे की त्याने तुम्हांला आधीच जे सांगितले आहे त्याप्रमाणे त्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा अभाव आहे का? की कदाचित हा त्या इच्छेचाच अभाव आहे? काहीही असो, देव करो आणि ते एकदाच व कायमचे दुरुस्त होवो. शमुवेलाची प्रार्थना म्हणा, "प्रभू, बोल कारण तुझा सेवक ऐकत आहे." (१ शमुवेल ३:१०) मग तुमचे पवित्र शास्त्र उघडा आणि कळकळीने प्रभूचा चेहरा शोधा आणि तुम्हांलाही त्याचा आवाज ऐकू येईल.