लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

स्तोत्र ५० - स्तोत्र ५०:२३ मध्ये अशांसाठी एक अद्भुत अभिवचन आढळते, जे आपल्या जिभेचा उपयोग वायफळ गोष्टी करण्याऐवजी प्रभूची स्तुती करण्यासाठी करतात: "जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन." जेव्हा आपण प्रभूची स्तुती करतो तेव्हा आपण तो आपला सार्वभौम देव आहे असा विश्वास व्यक्त करतो आणि विश्वासाच्या या अभिव्यक्तीमुळे तो आपल्याला त्याने सिद्ध केलेले तारण दाखवू शकतो.

स्तोत्र ६५:१ म्हणते: "हे देवा, सीयोनात (मंडळीत) स्तवन तुझी वाट पाहत आहे ." आपल्या मंडळ्या अशी ठिकाणे असली पाहिजेत जिथे स्तुती नेहमीच देवाची वाट पाहते. देव आपल्यात उपस्थित असतो तेव्हा त्याला त्याची स्तुती वाट पाहत असलेली सापडायला हवी. देव अशा लोकांना त्याच्या जवळ आणतो. स्तोत्र ६५:४ म्हणते: "तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य." हे स्तोत्र पुढे पृथ्वीवर देवाच्या चांगुलपणाविषयी बोलते.

स्तोत्र १०० हे प्रभूची स्तुती करण्याचे आणि त्याची सेवा करण्याचे आमंत्रण आहे. आपण "हर्षाने प्रभूची सेवा" करणार आहोत (स्तोत्र १००: २). मी अशा लोकांना भेटलो आहे की जे प्रभूची सेवा करत आहेत असे म्हणतात ,पण ते बहुतेक वेळा या ना त्या गोष्टीबद्दल कुरकुर करत असतात. जो आनंदाने देवाची सेवा करत नाही त्याने त्याची सेवा करावी अशी देवाची इच्छा नाही.

देवाच्या इस्राएलबद्दलच्या चांगुलपणाचे वर्णन स्तोत्र १०६ मध्ये चालू राहते . स्तोत्र १०६: ११, १२ मध्ये आपण असे वाचतो: "त्यांचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातला कोणीही उरला नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला; त्यांनी त्याची स्तोत्रे गाइली." तिथे दोन गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे, विश्वासाचा पुरावा स्तुती आहे. अंत:करणात जे भरले आहे तेच मुख बोलते. मुख ही अंत:करणातील गोष्टी बाहेर आणणारी झडप आहे. जर आपल्या अंत:करणात विश्वास असेल तर ते स्तुतीने ओसंडून वाहते. जेव्हा प्रेषित पवित्र आत्म्याने भरून गेले तेव्हा ते देवाची स्तुती करू लागले (प्रेषितांची कृत्ये २:११,४७) जर आपण देवाची स्तुती केली नाही तर हे सिद्ध होते की आपला देवावर विश्वास नाही. दुसरे म्हणजे, जुन्या करारानुसार ते विश्वासाने नव्हे तर दृष्टीला दिसते त्याने जगले. आपले शत्रू बुडालेले पाहूनच ते देवाची स्तुती करू शकत होते. आज आपल्या शत्रूंचा पराभव होण्याआधीच आपण देवाची स्तुती करू शकतो. म्हणजे विश्वासाने चालणे, दृष्टीला दिसते त्याने नव्हे.

स्तोत्र १४९ आपल्याला नेहमी प्रभूची स्तुती करण्याचे आमंत्रण देते. "तो दीनांना तारणाने सुशोभित करतो." (स्तोत्र १४९: ४). प्रभूने तुम्हांला सुंदर करावे असे तुम्हांला वाटत असेल तर तुम्ही नम्र असले पाहिजे. आपल्याला अगदी आपल्या अंथरुणातही हर्षघोष करणे, नेहमीच मुखाने देवाची परमश्रेष्ठ स्तुती करणे आणि देवाचे वचन आपल्या हातात घेणे ज्यामुळे सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचे सामर्थ्य व कार्ये बांधली जातात,यांसाठी बोलावले आहे, (स्तोत्र १४९: ५-८). देवाची स्तुती आणि सैतानाचे सामर्थ्य बांधून टाकणे या दोन गोष्टी नेहमीच एकत्र असतात.

स्तोत्र १५०: तेरा वेळा आपण या स्तोत्रात "स्तुती" हा शब्द वाचतो आणि शेवट "ज्याला श्वास आहे तो प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो." असा होतो (स्तोत्र १५०:६). एकच अशी व्यक्ती आहे ज्याला देवाची स्तुती करण्याची गरज नाही- ज्याला श्वास घेता येत नाही- मृत. बाकीच्या सर्वांनी नेहमी प्रभूची स्तुती करत राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यातही तसेच असो. आमेन.