WFTW Body: 

"आणि या जगाशी समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या ; यासाठी की देवाचा मनोदय, जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण, तो काय आहे याची तुम्ही पारख करावी."(रोमकरांस पत्र १२:२).

"परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे (प्रभू येशू ख्रिस्त याचेs)ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला अजिबात प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा. (यशया ५०:१० - लिविंग बायबल ).

जुन्या करारानुसार, देव बऱ्याचदा स्वर्गातून वाणीद्वारे आपल्या सेवकांना आपली इच्छा कळवत असे. पण नव्या करारात, देव आपल्या अंतःकरणातील पवित्र आत्म्याच्या आंतरिक साक्षीद्वारे आपले मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. हा विश्वासाचा मार्ग आहे आणि जुन्या कराराच्या, दृष्टीने पाहून चालण्याच्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ आहे.

आणि म्हणूनच, एखाद्या बाबतीत देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करताना, कधीकधी आपण गोंधळून जाऊ शकतो. आपला विश्वास मजबूत व्हावा यासाठी देव याला अनुमती देतो. आपण प्रयत्नपूर्वक त्याच्या जवळ यावे आणि अशा प्रकारे त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखावे अशी त्याची इच्छा आहे. अशा अनिश्चिततेच्या काळाचा उपयोग देव आपले हेतू चाळण्यासाठीही करतो.

म्हणूनच जेव्हा आपल्याला गोंधळाचा सामना करावा लागतो तेव्हा आपण आश्चर्यचकित किंवा निराश होता कामा नये. प्रेषित पौलसुद्धा बऱ्याचदा गोंधळला, पण तो कधीही निराश झाला नाही किंवा त्याने हार मानली नाही (पाहा २ करिंथ ४:८). कधीकधी आपल्याला निर्णय घेण्याच्या थोड्या वेळापूर्वीच देव आपल्याला त्याची इच्छा दर्शवतो - आणि त्यापूर्वी बराच काळ आपल्याला वाट पाहायला लावू शकतो.

कोणत्याही परिस्थितीत, तो आपल्याला प्रत्येक टप्प्यावर फक्त पुढचीच पायरी दाखवेल. तो आपल्याला पावला-पावलाने पुढे नेतो कारण आपण प्रत्येक दिवस त्याच्यावर विसंबून राहावे आणि दृष्टीने पाहून नव्हे तर विश्वासाने चालावे अशी त्याची इच्छा आहे. जेव्हा तो आपल्याला एका वेळी एकच पायरी दाखवतो, तेव्हा आपल्याला त्याच्यावर विसंबून राहणे भाग पडते. यास्तव, आपल्या जीवनाकरता देवाची इच्छा शोधण्याकरता कोणत्याही वेळी आपण फक्त देवाने आपल्याला दाखविलेले पुढचे पाऊल उचलले पाहिजे. असे करत असताना, देवाची योजना हळूहळू उलगडताना आपल्याला दिसून येईल.

परमेश्वराचे अभिवचन असे आहे की, "जसे तुम्ही पावला-पावलाने पुढे जाता, मी तुमच्यासमोरचा मार्ग मोकळा करीन" (नीतिसूत्रे ४:१२- अन्य शब्दांत).

एखाद्या बाबतीत देवाच्या इच्छेविषयी खात्री नसेल तर, आपण स्वतःला बारा प्रश्न विचारणे चांगले. जसजसे आपण या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देऊ तसतसे देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला अधिकाधिक स्पष्ट होईल.

●माझ्या माहितीप्रमाणे, येशू व प्रेषित यांच्या कोणत्याही शिकवणुकीच्या किंवा नव्या कराराच्या आत्म्याच्या हे विरुद्ध आहे का?
● स्पष्ट विवेकबुद्धीने मी हे करू शकतो का?
● देवाच्या गौरवासाठी मी हे करू शकतो का?
● येशूच्या सहभागितेत मी हे करू शकतो का?
● हे करत असताना मी देवाला विनंती करू शकतो का, की त्याने मला आशीर्वाद द्यावेत?
● मी असे केल्याने माझी आध्यात्मिक धार कोणत्याही प्रकारे बोथट होईल का?
● माझ्या ज्ञानानुसार ते आध्यात्मिकरीत्या फायदेशीर व बोधपूर्ण ठरेल का?
● येशू पृथ्वीवर परत येईल त्या क्षणी मी हे करताना सापडलो तर मला आनंद होईल का?
● सुज्ञ व अधिक प्रौढ बांधवांना याविषयी काय वाटते?
● माझे हे करणे इतरांना कळल्यावर देवाच्या नावाचा अनादर होईल किंवा माझी साक्ष नाश पावेल का?
● मी असे केल्यामुळे इतरांना ही गोष्ट कळली तर ते त्यांच्यासाठी अडखळण होईल का?
● हे करण्यास मला माझ्या आत्म्याने मोकळीक वाटते का?

पुष्कळ प्रसंगी, देवाच्या इच्छेविषयी आपल्याला पूर्ण खात्री नसली तरीसुद्धा आपल्याला एक पाऊल पुढे टाकावे लागेल. हे देखील विश्वासाने चालण्याच्या शिस्तीचा एक भाग आहे - कारण निश्चितता कधीकधी "दृष्टीने पाहून चालणे" याच्या समतुल्य असू शकते. देव कधीकधी आपल्याला त्याच्या इच्छेची स्पष्ट खातरी देतो. परंतु इतर वेळी त्याच्या इच्छेची स्पष्ट माहिती न घेता आपण पुढे जावे, अशी त्याची अपेक्षा असते. एकदा जर आपण प्रार्थनेत परमेश्वरावर अवलंबून राहिलो आणि आपल्या सर्वोत्तम ज्ञानानुसार पवित्र आत्म्याची खात्री करून घेतली, तर आपण अनिश्चित काळासाठी वाट न पाहता पुढे जायला हवे.

पवित्र शास्त्र म्हणते, " आपण योजना आखल्या पाहिजेत- आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी देवाला जमेस धरून" (नीतिसूत्रे १६:९ - लिविंग बायबल). अशा निर्णयांकडे नंतर मागे वळून पाहताना आपल्याला असे दिसून येईल की, आपली दृष्टी अंधुक असूनही देवाने आपल्याला भटकू दिले नाही. दुस-या शब्दांत सांगायचे झाले तर, सुरुवातीला जरी बरीच अनिश्चितता निर्माण झाली असली, तरी शेवटी अधिक निश्चिती आणि आनंद मिळेल.

आणि प्रामाणिकपणे पण अनिश्चिततेत एखादे पाऊल उचलताना, देवाच्या परिपूर्ण इच्छेचा मार्ग चुकला, तर आपण देवावर भरवसा ठेवू शकतो की तो आपल्याला योग्य मार्गावर परत आणू शकतो. यशया ३०:२१ (लिविंग बायबल) मधील अभिवचन असे आहे, "जर तुम्ही देवाचे मार्ग सोडून भरकटलात तर , एक वाणी तुमच्या मागून कानी पडेल, “नाही, हाच मार्ग आहे; ह्याने चला”.

जेव्हा आपण त्याच्या इच्छेपासून भटकतो तेव्हा देव परिस्थितीला आपला मार्ग बदलण्याची आज्ञा देईल. परंतु प्रत्येक हालचालीसाठी नेत्रदीपक मार्गदर्शनाची वाट पाहत आपण सतत निष्क्रियतेत राहू नये. एखादे जहाज स्थिर असण्यापेक्षा ते हलताना अधिक वेगाने वळवले जाऊ शकते. तसेच आपल्याही बाबतीत घडेल.

प्रेषितांची कृत्ये १६:६-१० मध्ये आपण वाचतो, की पौल व सीला यांनी आशियात जाण्याचा प्रयत्न केला— प्रभूकडून कोणत्याही स्पष्ट मार्गदर्शनामुळे नव्हे, तर तरीही ते त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची इच्छा बाळगून होते म्हणून . त्यांना अडथळा निर्माण झाला होता— कदाचित देवाने परिस्थितीला आज्ञा दिल्यामुळे. पुढे जेव्हा त्यांनी बिथुनियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा मार्ग पुन्हा एकदा बंद झाला. पण ते सक्रियपणे देवाच्या इच्छेचा शोध घेत असल्यामुळे आणि मार्गदर्शनाची निष्क्रियपणे वाट पाहत नसल्यामुळे शेवटी त्याने त्यांना त्याच्या पसंतीच्या ठिकाणी - मासेदोनियाकडे नेले.

दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या तपशिलात मार्गदर्शन हा सतत जाणीवपूर्वक चौकशीचा प्रश्न असेलच असे नाही. ही आत्म्याने चालण्याची गोष्ट आहे. परमेश्वराशी योग्य संबंध ठेवल्याने योग्य कृती घडेल. अशा छोट्या छोट्या तपशिलात ईश्वराचे मार्गदर्शन ही अशी गोष्ट नाही की, ज्याची आपल्याला सतत जाणीव झाली पाहिजे. आपण कदाचित त्यापासून अजाण असू शकतो. केवळ परमेश्वराशी असलेला आपला मूलभूत संबंध हा महत्त्वाचा घटक आहे, कारण मार्गदर्शन ही यांत्रिक तंत्राची नव्हे, तर आध्यात्मिक बाब आहे.