लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

जेव्हा देव आपल्यामध्ये उपस्थित असतो तेव्हा सभेंमध्ये मोठ्या सामर्थ्याने संदेश दिला जातो. ह्यालाच संदेष्टीय संदेश वा भविष्यवाणी म्हणावी. जुन्या कराराच्या काळामध्ये भविष्यवाणी म्हणजे केवळ भविष्यात घडणार्या गोष्टींविषयी भविष्य सांगणे होते. त्याद्वारे लोकांना मार्गदर्शन केल्या जाई की त्यांनी काय करावे. परंतु,नवीन कराराच्या काळात भविष्यवाणी म्हणजे आव्हान देणे, चूक सुधारणे व दटावणे होय.त्याचप्रमाणे धीर देणे व प्रोत्साहन देणे तसेच मंडळीला सुसज्जीत करणे म्हणजे भविष्यवाणी होय (1 करिंथ 14:3). भविष्यवाणी हे आत्म्याचे प्रमुख दान आहे ज्याद्वारे मंडळीची उभारणी होते. संदेष्टीय शब्द पुढीलप्रमाणे वापरला आहे, ''...ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे...'' (2 पेत्र 1:19). मंडळीमध्ये दिव्याचा प्रकाश सतत प्रज्वलीत नसल्यास मंडळी काळोखाच्या अधिपतींपासून दूर राहू शकत नाहीत. मंडळी देखील काळोखात जाईल. अनेक ख्रिस्ती गट चांगल्याप्रकारे सुरू झालेत; परंतु, कालांतराने त्यांची अधोगती होत गेली, कारण हळूहळू त्यांच्यातील भविष्यवाणीचे वा संदेष्टीय दान नाहीसे होत गेले.

जुन्या कराराच्या काळामध्ये जेव्हा इस्राएलातून देवाची उपस्थिती निघून गेली तेव्हा त्याचे एक प्रमाण म्हणजे त्या दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये कोणीही संदेष्टा नव्हता (स्तोत्र 74:1,9). ज्या दिवसांमध्ये इस्राएलात संदेष्टा नव्हता त्या दिवसांमध्ये इस्राएलाची अधोगती झाली. एलीयाच्या काळात देखील तसेच घडले (1 शमुवेल 3:1 पाहा). ज्या दिवसांमध्ये इस्राएलात संदेष्टा होता त्या दिवसांमध्ये इस्राएलाची उन्नती होत गेली. असे शमुवेलाच्या काळात घडले (1 शमुवेल 3:20). शमुवेलाद्वारे दाविदाचा अभिषेक झाला की त्याने इस्राएलाचा राजा व्हावे. इस्राएलाच्या इतिहासामध्ये ही वैभवी सुरुवात होती. शमुवेलाने भविष्यवाणी केली, '्यरमेश्वराने त्याचे कोणतेही वचन वाया जाऊ दिले नाही'' (1 शमुवेल 3:19).

मंडळीमधील सामर्थ्यवान अशा भविष्यवाणीच्या सेवेकरिता आपण देखील मनापासून प्रार्थना करावी, जेणेकरून आपला प्रत्येक शब्द लोकांच्या अंतःकरणात बाणाप्रमाणे छेदून जावा. भविष्यवाणीच्या दानाद्वारे, ''त्याच्या अंतःकरणांतील गुप्त गोष्टी प्रगट होतात'' (1 करिंथ 14:25). अशाप्रकारे मंडळीतील प्रत्येकाला पापाची लबाडी प्रकाशाद्वारे कळून येईल.

आपल्याला पुढीलप्रमाणे आज्ञा केली आहे, ''तुम्ही एकमेंकाना प्रतिदिवशीं बोध करा; हेतु हा कीं, पापाच्या फसवणुकीनें तुम्हांतील कोणी 'कठीण होऊं' नये'' (इब्री 3:13). काही पापे उघड दिसतात व काही पापे गुप्त राहतात. परंतु, भविष्यवाणीचा आत्मा दोन्ही प्रकारच्या पापांना उघड करितो. त्याद्वारे सैतानाचे षडयंत्र उघड होतात आणि आपण सावध होतो.

ह्याचे उदाहरण आपल्याला जुन्या करारात पहायला मिळते. अरामाचा राजा ज्या ज्या वेळी इस्राएलाविरुद्ध गुप्तरीतीने षडयंत्र आखत असे त्या त्या वेळी त्यांच्या योजना उघड होत असत कारण अलीशा त्याविषयीची भविष्यवाणी करीत असे व इस्राएलाच्या राजाला आरामाचे षडयंत्र माहीत होत असे (2 राजे 6:8-12). मग तो योग्य ठिकाणी आपले सैनिक लावून आपल्या राष्ट्राला सुरक्षीत करीत असे.

अशाप्रकारे आज देखील मंडळीमध्ये व सभेंमध्ये भविष्यवाणीद्वारे लोकांना जागृत करण्यात येते जेणेकरून सैतानाच्या षडयंत्रांपासून त्यांनी सावध राहावे व सुरक्षीत राहावे. अशाप्रकारे आपण स्वतःला सुरक्षीत करून घेतो.

पौलाने तीमथ्याला चांगले युद्ध लढण्यास सांगितले. सैतानाविरुद्ध चांगले युद्ध लढण्यास त्याने सांगितले. याकरिता तीमथ्याने त्याच्याविषयीच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष देणे फार गरजेचे होते (1 तीमथ्य 1:18).

बंगलोरमधील मंडळीमध्ये आम्ही बघितले की पुष्कळ वेळा भविष्यवाणीचा आत्मा उतरला व त्याने अनेक बंधूभगिणींना सैतानाच्या षडयंत्रांपासून सावध केले जे षडयंत्र तो पुढील दिवसांमध्ये वापरणार होता. संदेष्टीय वचनाद्वारे देवाने मंडळीतील प्रत्येकाला ज्ञान दिले आहे. हे ज्ञान वैयक्तीक जीवनाकरिता, कौटुंबिक जीवनाकरिता व मंडळीच्या जीवनाकरिता आहे. नीतिसूत्रे 24:3,4 मध्ये म्हटले आहे, ''सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते; ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तुंनी भरून जातात.'' मंडळीमध्ये ज्ञानाकरिता जागा आहे. मंडळीत अभिषीक्त शिक्षकांद्वारे देवाचे वचन शिकविल्या जाते. परंतु, ज्ञान हे त्या घरातील मोलवान व मनोरम वस्तुंसारखे आहे जे घर सुज्ञानाने बांधल्या गेले.

आपल्या मंडळीमध्ये केवळ ज्ञान असले परंतु सुज्ञान नसले तर आपण रिकाम्या भूखंडावर राहत आहोत व त्या भूखंडावर मोलवान व मनोरम वस्तू ठेवलेल्या आहेत ज्याठिकाणी भिंती असलेले घर नाही व छत नाही. म्हणून नवीन करारामध्ये आपल्याला सांगितले आहे की आपण सुज्ञान संपादन करावे. ''जर तुम्हांपैकीं कोणी ज्ञानानें उणा असेल तर त्यानें तें देवाजवळ मागावें म्हणजें तें त्यांला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणानें देतो'' (याकोब 1:5). सुज्ञानाद्वारे मंडळी बांधल्या जाते आणि देवाचे सुज्ञान भविष्यवाणीच्या ज्ञानाद्वारे मंडळीला प्राप्त होते.

म्हणूनच आपल्याला, ''संदेश सांगतां यावा अशी उत्कंठा बाळगा'' (1 करिंथ 14:1,5). मंडळीतील प्रत्येक सभेत आपल्याला संदेश सांगता यावा म्हणजेच भविष्यवाणी करता यावी. बायबल अभ्यास व सुवार्ताप्रसार चांगला आहे; परंतु आपल्याला ख्रिस्ताची शुद्ध साक्ष देणारी मंडळी बांधावयाची असल्यास भविष्यवाणीच्या वा संदेष्टीय दानाला प्राधान्य द्यावे.