WFTW Body: 

"सर्व काही त्याच्यापासून आहे "(रोमकरांस पत्र ११:३६) येशूने म्हटले की, स्वर्गाचे राज्य आत्म्याने दीन असलेल्यांचे आहे (मत्तय ५:३). त्याने असेही म्हटले की, जे पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, तेच त्या राज्यात प्रवेश करतील (मत्तय ७:२१). स्वर्गाचे राज्य सार्वकालिक आहे, आणि तेथे केवळ तेच आढळेल जे देवाच्या इच्छेनुसार केले गेले आहे. आत्म्याने दीन ते आहेत जे आपल्या मानवी अपुरेपणाची जाणीव ठेवतात आणि म्हणूनच देवाच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित होतात. या अर्थाने, येशू आत्म्याने सतत दीन होता.

देवावर सतत अवलंबून राहून, देवाशिवाय आपल्या मनाच्या शक्तींचा वापर न करता - देवाने मानवाला जसे जगायला सांगितले होते, तसे तो जगला. त्याच्या शब्दांचा विचार करा:"पुत्र (स्वतःहून) काहीही करू शकत नाही......मी माझ्या स्वतःच्या इच्छेने काहीही करत नाही, तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी बोलतो.....मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आलो नाही, तर त्याने मला पाठवले आहे.....मी माझ्या स्वतःच्या इच्छेने बोललो नाही, तर ज्या पित्याने मला पाठवले आहे, त्यानेच मला काय सांगावे आणि काय बोलावे याची आज्ञा दिली आहे.... जी वचने मी तुम्हाला सांगतो ती मी माझ्या स्वतःच्या इच्छेने बोलत नाही, तर माझ्यात वास करणारा पिता त्याचे कार्य करतो" (योहान ५:१९,३०; ८:२८,४२; १२:४९; १४:१०).

येशूने केवळ गरज दिसल्यामुळे कधीही कृती केली नाही. त्याने गरज पाहिली, त्याला काळजीही होती, पण जेव्हा त्याच्या पित्याने त्याला सांगितले तेव्हाच त्याने कृती केली. त्याने स्वर्गात किमान चार हजार वर्षे वाट पाहिली, जेव्हा जगाला एका तारणहाराची नितांत गरज होती, जेव्हा त्याच्या पित्याने त्याला पाठवले तेव्हा तो पृथ्वीवर आला (योहान ८:४२). "जेव्हा योग्य वेळ आली, देवाने ठरवलेली वेळ, तेव्हा त्याने आपला पुत्र पाठवला" (गलतीकरांस पत्र ४:४). देवाने प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ नेमून दिली आहे (उपदेशक ३:१). ती वेळ केवळ देवालाच माहीत आहे, आणि म्हणून, येशूने जसे केले तसे आपण प्रत्येक गोष्टीत पित्याची इच्छा शोधल्यास आपण चूकणार नाही. जेव्हा येशू पृथ्वीवर आला, तेव्हा त्याला जे योग्य वाटले ते तो करत फिरला नाही. त्याचे मन पूर्णपणे शुद्ध असूनही, मनात आलेल्या कोणत्याही चांगल्या कल्पनेनुसार त्याने कधीही कृती केली नाही. नाही. त्याने आपले मन पवित्र आत्म्याचे सेवक बनवले.

वयाच्या बाराव्या वर्षी त्याला पवित्र शास्त्र पूर्णपणे माहीत असूनही, त्याने पुढची अठरा वर्षे सुतार म्हणून, आपल्या आईसोबत राहून, टेबले आणि खुर्च्या इत्यादी बनवण्यात घालवली. त्याच्या सभोवतालच्या मरणासन्न माणसांना ज्या संदेशाची गरज होती, तोच संदेश त्याच्याकडे होता, तरीही तो प्रचाराच्या सेवेसाठी बाहेर पडला नाही, का? कारण पित्याची वेळ अजून आली नव्हती.

येशू वाट पाहण्यास घाबरला नाही. "जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही" (यशया २८:१६). आणि जेव्हा त्याच्या पित्याची वेळ आली, तेव्हा तो आपल्या सुतार कामातून बाहेर पडला आणि उपदेश करू लागला. त्यानंतर अनेकदा, तो एखाद्या कृतीविषयी म्हणायचा, "माझी वेळ अजून आली नाही" (योहान २:४; ७:६). येशूच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट पित्याच्या वेळेनुसार आणि इच्छेनुसार चालत होती. केवळ माणसांची गरज ही येशूसाठी कृती करण्याचे आवाहन कधीच नव्हती, कारण तसे करणे म्हणजे स्वतःच्या आत्म्यातून - स्वतःच्या इच्छेतून कार्य करण्यासारखे झाले असते. माणसांच्या गरजेचा विचार करायचा होता, पण देवाची इच्छा पूर्ण करायची होती. येशूने योहान ४:३४, ३५ मध्ये हे अगदी स्पष्ट केले आहे. गरज (वचन ३५):" नजर वर टाकून शेते पाहा ! आपल्या सभोवती मानवी आत्म्यांची विशाल शेते पिकली आहेत आणि आता कापणीसाठी तयार आहेत....." कृतीचे तत्त्व (वचन ३४): "ज्या देवाने मला पाठवले आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे करावे आणि त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे." येशूने त्याच्या मित्रांनी सुचवलेल्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या नाहीत, कारण त्याला माहीत होते की जर त्याने माणसांचे ऐकून वरवर चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी केल्या तर त्याच्या पित्याने त्याच्यासाठी जे सर्वोत्तम योजले आहे ते तो गमावून बसेल.

एकदा, जेव्हा लोकांनी त्याला एका विशिष्ट ठिकाणी राहण्याची विनंती केली, तेव्हा तो म्हणाला की तो राहू शकत नाही, कारण त्याने आपल्या पित्याचा आवाज ऐकला होता, जो त्याला दुसरीकडे जाण्यास सांगत होता. मानवी दृष्ट्या, तो जिथे होता तिथे राहण्याची खूप चांगली कारणे होती, कारण लोकांनी त्याच्या संदेशाला तिथे विलक्षण प्रतिसाद दिला होता. परंतु देवाचे विचार माणसाच्या विचारांसारखे नाहीत आणि देवाचे मार्ग माणसाच्या मार्गांसारखे नाहीत (यशया ५५:८). त्या दिवशी सकाळी पेत्र आणि इतरांनी सुचवलेल्या गोष्टी ऐकण्यापूर्वीच, येशू एकटा बाहेर गेला, त्याने प्रार्थना केली, आणि आपल्या पित्याचा आवाज ऐकला (मार्क १:३५-३९). येशू मानवी तर्कावर अवलंबून राहिला नाही. त्याने वचनाचे पालन केले, ज्यात म्हटले आहे, "तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल "(नीतिसूत्रे ३:५,६). तो प्रत्येक बाबतीत मार्गदर्शनासाठी आपल्या पित्यावर अवलंबून राहिला. यशया ५०:४ मध्ये प्रभू येशूविषयीच्या एका भविष्यसूचक उल्लेखात आपण वाचतो, "दररोज सकाळी, तो (पिता) मला जागे करतो आणि त्याची इच्छा समजून घेण्यासाठी माझे कान उघडतो." ही येशूची सवय होती. तो पहाटेपासून दिवसभर आपल्या पित्याचा आवाज ऐकत असे आणि त्याचा पिता त्याला जे करायला सांगत असे, तेच तो करत असे. काय करावे हे ठरवण्यासाठी तो माणसांशी चर्चा करत नसे, तर आपल्या पित्याबरोबर प्रार्थना सभा घेत असे. भावनिक ख्रिस्ती माणसांशी चर्चा करून योजना आखतात. आत्मिक ख्रिस्ती देवाकडून ऐकण्यासाठी वाट पाहतात.

येशू आपल्या पित्याच्या अधीन राहून जगत होता (योहान ६:५७). येशूसाठी देवाचे वचन अन्नापेक्षाही अधिक महत्त्वाचे होते (मत्तय ४:४). त्याला ते दिवसातून अनेक वेळा, थेट पित्याकडून प्राप्त करावे लागत असे. ते प्राप्त झाल्यावर, तो त्याचे पालन करत असे. आज्ञापालनसुद्धा त्याच्या रोजच्या अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचे होते (योहान ४:३४). येशू पित्यावर अवलंबून राहून जगत होता. दिवसभर त्याची वृत्ती अशी होती, "बोल, पित्या, मी ऐकत आहे." त्याने मंदिरातून सराफांना हाकलून लावल्याच्या घटनेचा विचार करा. असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा येशू मंदिरात सराफांसोबत होता, पण त्याने त्यांना हाकलून लावले नाही. त्याने असे तेव्हाच केले, जेव्हा त्याच्या पित्याने त्याला तसे करण्यास सांगितले. एक भावनिक ख्रिस्ती व्यक्ती सराफांना कायमचे हाकलून लावणे पसंत करेल किंवा तो ते कधीच करणार नाही. पण जो देवाकडून मार्गदर्शन मिळवतो, त्याला केव्हा, कुठे आणि कसे कार्य करायचे हे माहीत असते. येशू अनेक चांगल्या गोष्टी करू शकला असता, पण त्याने त्या कधीच केल्या नाहीत, कारण त्या त्याच्या पित्याच्या इच्छेच्या कक्षेबाहेर होत्या. तो नेहमी सर्वोत्तम गोष्टी करण्यात व्यस्त असे. आणि तेवढेच पुरेसे होते. तो पृथ्वीवर चांगल्या गोष्टी करण्यासाठी नव्हे, तर आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता.

वयाच्या बाराव्या वर्षी त्याने योसेफ आणि मरीया यांना विचारले, “माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही का ?” (लूक २:४९). केवळ त्याच गोष्टी पूर्ण करण्यात त्याला रस होता. जेव्हा पृथ्वीवरील साडेतेहतीस वर्षांचा त्याचा काळ संपला, तेव्हा तो खऱ्या समाधानाने म्हणू शकला, “पित्या, जे काम तू मला करावयास दिले, ते मी पूर्ण केले आहे” (योहान १७:४). त्यानी जगभर प्रवास केला नव्हता, त्यानी कोणतेही पुस्तक लिहिले नव्हते, त्याचे अनुयायी थोडेच होते, जगाच्या अनेक भागांमध्ये अजूनही बऱ्याच गरजा अपूर्ण होत्या, इत्यादी, इत्यादी. पण पित्याने त्याच्यासाठी नेमलेले कार्य त्यानी पूर्ण केले होते. अंतिमतः, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे.

क्रमशः