WFTW Body: 

"तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली…. आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.(मलाखी ३:१६-१८).

वरील वचने आपल्याला लोकांच्या दोन गटांविषयी सांगतात - नीतिमान आणि दुष्ट. तेथे असे म्हटले आहे, की देवाकडे "स्मरणवही " आहे ज्यात केवळ अशा ख्रिस्ती लोकांची नावे आहेत जे देवाचे खरोखर भय बाळगतात आणि जे त्याच्या नावाचा आदर करतात. आणि देव म्हणतो, की खऱ्या नीतिमानांना दुष्टांपासून वेगळे केले जाईल.

मत्तय २३:२५, २६ मध्ये येशूने जे म्हटले त्याच्याशी या शब्दांचा संबंध जोडला जाऊ शकतो. तो तेथे म्हणतो , दुष्ट परूश्यांनी वाटीच्या बाहेरील भागच स्वच्छ ठेवला; तर खरे नीतिमान लोक वाटीचा आतील भाग व बाहेरील भाग स्वच्छ ठेवतात . अशा प्रकारे आपण नीतिमानांना दुष्टांपासून वेगळे करतो.

जे विश्वासणारे देवाचे खरोखर भय बाळगतात ते देवासमोर आपली अंतःकरणे नेहमी शुद्ध ठेवतील आणि आपला प्रकाश (त्यांच्या जीवनाची बाह्य साक्ष) लोकांसमोर चमकू देतील. जो आपल्या आंतरिक जीवनाला सर्वार्थाने महत्त्व देतो, त्यालाच पापावर खरा विजय मिळवून देण्याचे जीवन जगणे शक्य आहे.

स्वच्छ विवेक आणि शुद्ध अंतःकरण असणे यातही खूप फरक आहे. स्वच्छ विवेक म्हणजे जो सर्व ज्ञात पापांपासून मुक्त असतो; तर शुद्ध अंतःकरण असे आहे जे केवळ सर्व ज्ञात पापांपासून मुक्त असते इतकेच नाही, तर स्वतः देवाशिवाय इतर सर्व गोष्टींच्या आसक्तीपासून मुक्त आहे. ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे तोच फक्त देवाला पाहतो आणि इतर काहीही नाही आणि इतर कोणीही नाही. येशूने म्हटले, "‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील." (मत्तय ५:८). शुद्ध अंतःकरणाचे लोकच प्रत्येक परिस्थितीत देवाला पाहतात. त्यांचे मन (चांगल्या किंवा वाईट) लोकांत किंवा त्यांच्या (चांगल्या किंवा कठीण) परिस्थितीत गढून जाणार नाही. ते स्वतः केवळ देवातच गढून गेलेले असतील.

ज्याची दुसऱ्याविरुद्ध तक्रार आहे, तो त्यायोगे हे सिद्ध करतो की त्याचे अंतःकरण शुद्ध नाही, कारण तो केवळ देवामध्ये नाही, तर तो दुसऱ्यात पाहत असलेल्या दुष्टाईत मग्न आहे. जर त्याचे अंतःकरण शुद्ध असते, तर त्याला फक्त देवच दिसला असता - अगदी कठीण लोकांनी निर्माण केलेल्या कठीण परिस्थितीतही! अशा व्यक्तीला देव केवळ त्याच्या भल्यासाठीच (रोम ८:२८) नव्हे तर देवाच्या गौरवासाठीही त्या कठीण परिस्थितीत काम करत आहे असे दिसेल . मग तो प्रत्येक गोष्टीसाठी देवाची स्तुती करत असेल.

जर तुमचे अंतःकरण खरोखरच शुद्ध असेल, तर जगातील सर्व लोक आणि विश्वातील सर्व दुरात्मे मिळून तुमच्या जीवनासाठी देवाची योजना पूर्ण होण्यापासून रोखू शकणार नाहीत - कारण प्रत्येक परिस्थितीत देव तुमच्यासाठी कार्य करील. मग तुम्ही प्रत्येक परिस्थितीत विजयी व्हाल आणि तुम्ही तुमच्या जीवनाकरता देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करू शकाल.

पवित्र शास्त्र म्हणते, "जसे पाणी मुखाला मुखाचे प्रतिबिंब दाखवते, तसेच हृदय मनुष्याला मनुष्य दाखवते." (नीतिसूत्रे २७:१९). या वचनाचा एक अर्थ असा आहे की, जेव्हा तुम्ही इतरांच्या काही गोष्टींसाठी वाईट हेतू व्यक्त करता, तेव्हा त्या खरोखरच तुमच्या स्वत:च्या हृदयाची स्थिती प्रकट करतील - कारण तुम्ही असे गृहीत धरत आहात की,जर तुम्ही त्याच गोष्टी केल्या असत्या तर त्या ज्या वाईट हेतूने केल्या असत्या त्याच हेतूने ते करत असतील. पण येशूने आपल्याला लोकांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या फळांद्वारे (बाह्य कृतींद्वारे) करण्यास सांगितले ("त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल." — मत्तय ७:१६) - आणि त्यांच्या मुळांवरून नव्हे (त्यांचे हेतू, जे पाहिले जाऊ शकत नाहीत!) जर आपण स्वत:चे सतत शुद्धीकरण करत जगत असू, तर आपण केवळ स्वत:चाच न्याय करू, इतर लोकांच्या हेतूंचा नव्हे. मग आपण आपली अंतःकरणे नेहमी शुद्ध ठेवू शकू. मग देव स्वतः आपल्याला इतरांबद्दल समज देईल, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. येशूचे अंतःकरण नेहमी शुद्ध होते, कारण त्याने कधीही कोणाचाही न्याय केला नाही (योहान ८:१५), परंतु तो सर्वांना ओळखून होता (योहान २:२४,२५).

आपले अंतःकरण शुद्ध ठेवणे म्हणजे काय, याचे उदाहरण येथे आहे. बंधू जुनिपर हे १३ व्या शतकात इटलीत राहणारे एक देवभीरू पुरुष होते . ते नेहमी अतिशय साधे कपडे घालत. एके दिवशी त्यांनी आपल्या एका बंधूला अतिशय महागडे कपडे घातलेले पाहिले. पण जुनिपरने त्यासाठी त्या बंधुचा न्याय केला नाही. त्याऐवजी ते स्वत:शीच म्हणाले , "कदाचित त्या महागड्या कपड्यांखाली असलेले माझ्या भावाचे अंतःकरण, या साध्या कपड्यांखाली असलेल्या माझ्या अंतःकरणापेक्षा नम्र असेल." अशा निर्मळ व नम्र वृत्तीने त्याने आपल्या भावाचा न्याय करण्याच्या पापापासून स्वत:ला जपले. हे त्यांच्या देवभिरूपणाचे एक रहस्य होते - आणि आपल्या सर्वांसाठी हे अनुकरण करण्यासाठी एक चांगले उदाहरण आहे. देव करो आणि आपण नेहमी असेच असावे. आमेन.