लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

येशू बद्दल असे लिहिले आहे की त्याने आपल्या पित्याला नेहमी त्याच्यासमोर ठेवले होते आणि त्यामुळे त्याचे हृदय नेहमीच आनंदी होते. त्याच्याकडे "पूर्णांनंद" होता आणि पिता येशूला आधार देण्यासाठी नेहमीच त्याच्या उजव्या हाताकडे होता. (प्रेषितांची कृत्ये २:२५,२६ जे स्तोत्र १६:१०,११ उद्धृत करते). त्यामुळे प्रभूला नेहमी तुमच्यासमोर ठेवा आणि मग पूर्णांनंद हा तुमचा सततचा भाग असेल आणि प्रभू तुम्हांला नेहमी आधार देण्यासाठी तुमच्या उजव्या हाताला असेल. त्यामुळे लोकांना किंवा परिस्थितीला तुमच्या आणि प्रभूच्यामध्ये येऊ देऊ नका.

जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील (मत्तय ५:८) - आणि ते सर्व परिस्थितीत फक्त देवाला पाहतील आणि लोकांना व परिस्थितीला नाही. जेव्हा येशूचे सौंदर्य तुमची पकड घेईल तेव्हा तुम्हांवरील मोहाचे प्राबल्य कमी होईल. आणि जेव्हा तुम्ही प्रभूच्या माध्यमातून लोकांकडे व परिस्थितीकडे पहाल तेव्हा ह्या खात्रीत "विसावा पावाल" की देव त्या सर्व परिस्थितीमधून आणि त्या सर्व लोकांमधून, तुमच्यासाठी सर्वोत्तम असे कार्य करेल. (रोम ८:२८). तुम्ही सर्व परिस्थितीत आणि तुमच्या दैनंदिन जीवनात येणार्‍या लहान लहान परिक्षांमध्ये विसावा पावण्याची सवय विकसित केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या मोठ्या परिक्षांवर तुम्ही मात करू शकाल.

कोणत्याही माणसाची किंवा कोणत्याही माणसाच्या लिखाणाची आपल्यासाठी मूर्ती तयार करू नका. खरे भक्त आणि खरी आध्यात्मिक पुस्तके तुम्हाला नेहमीच येशू (जिवंत शब्द) आणि पवित्र शास्त्राकडे (लिखित शब्द) दर्शवतील. अशाच माणसांचे अनुकरण करा आणि अशीच पुस्तके वाचा.

देवाच्या सामर्थ्याचे सर्वांत मोठे प्रकटीकरण सृष्टीच्या उत्पत्तित नव्हे तर प्रभू येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानात होते, जेव्हा सैतानाचा पराभव झाला (इफिस १:१९,२०). येशूला वधस्तंभावर खिळणे ही मानवी इतिहासातील सर्वांत भयंकर दुष्टाई होती. या पृथ्वीवर घडलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम गोष्टही होती. जर देव इतिहासातील सर्वांत वाईट घटनेचे सर्वोत्तम घटनेत रूपांतर करण्याइतका शक्तिशाली असेल तर तो तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे तुमच्यासाठी काहीतरी गौरवशाली गोष्टीत रूपांतर करेल याची तुम्ही खात्री करू शकता (रोम.८:२८).

देव अदृश्य पद्धतीने काम करणे पसंत करतो, कोणताही दिखावा, भपका न करता किंवा शिंग न फुंकता. परिणामस्वरूप, कधीकधी तुम्ही कल्पना करू शकता की काही गोष्टी योगायोगाने किंवा चुकून घडल्या, परंतु ते प्रार्थनेचे विशिष्ट उत्तर होते - तुमच्या स्वतःच्या प्रार्थना आणि तुमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या इतरांच्या प्रार्थना. "तो स्वतःला लपवणारा देव आहे" तो ज्या पद्धतीने काम करतो. (यशया ४५:१५) "त्याच्या पद्धती समजून घेणे आपल्याला किती अशक्य आहे" (रोम.११:३३).

आपल्याला जितके उत्तम जमेल तितके करा - आणि बाकीचे देवावर सोपवून द्या. तुमच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक बाबतीत तो सार्वभौमपणे राज्य करेल. तुमच्या चुका आणि अपयशही प्रभूद्वारे आध्यात्मिक लाभाचे ठरतील. आपण ज्याची उपासना करतो तो हा देव आहे - जो या पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर राज्य करतो. त्यामुळे तुम्ही केलेल्या कोणत्याही चुकांबद्दल तुम्हाला खेदाने जगण्याची गरज नाही. अशा खेदामुळे सैतानाला तुमचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका. देव इतका सार्वभौम आहे की त्याच्या गौरवासाठी आणि आपल्या भल्यासाठी काम करण्यासाठी तो आपल्या चुकांचाही वापर करतो. तुम्हाला एकाच गोष्टीचे दुःख वाटण्याची गरज आहे ते म्हणजे अभिमान आणि कबूल न केलेले पाप. सैतान तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकांची आठवण करून देत राहील- निराशेने तुम्हाला खाली पाडण्यासाठी. पण जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील अपयशांमुळे निराश झालात तर सैतानाला तुम्हाला पुन्हा अडखळवून पाडणे सोपे जाईल.

जेव्हा लाटा उसळतात तेव्हा तुमच्या सभोवतालच्या लाटांवर नव्हे तर पेत्राप्रमाणे स्वतः येशूवर तुमची दृष्टी निश्चित करणे महत्त्वाचे आहे (मत्तय १४:३०). तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या आजूबाजूला गोंधळ असू शकतो, पण जर तुम्ही फक्त येशूकडे पाहिले तर तुम्ही अशांत समुद्रावर विजयाने चालत जाल.