लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

देवाचे वचन तीन काळांमध्ये "तारण" याविषयी सांगते - भूतकाळ (इफिस २:८), वर्तमान (फिलिप्पै २:१२) आणि भविष्य (रोम. १३:११) - किंवा दुस-या शब्दांत, न्यायी ठरणे , पवित्रीकरण आणि गौरवीकरण यांविषयी.

१. न्यायी ठरणे:
तारणाला पाया आणि डोलारा आहे. पाया म्हणजे पापांची क्षमा आणि न्यायी ठरणे. न्यायी ठरणे हे आपल्या पापांची क्षमा होणे यापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ, ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणाच्या आधारावर आपल्याला देवाच्या नजरेत न्यायी घोषित करण्यात आले आहे. हे आपल्या कृत्यांच्या आधारावर नाही (इफिस २:८,९), कारण आपली नीतिची कृत्येही देवाच्या नजरेत घाणेरड्या वस्त्रांसारखी आहेत (यशया ६४:६). आपण ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वाने परिधान झालेले आहोत (गलती ३:२७). क्षमा प्राप्त करण्यासाठी आणि न्यायी ठरण्यासाठी पश्चात्ताप आणि विश्वास या दोन अटी आहेत (प्रेषितांची कृत्ये २०:२१). खरा पश्चात्ताप आपल्यात भरपाईचे फळ उत्पन्न करतो - पैसा, वस्तू आणि कर परत करणे, जे आपल्या ताब्यात असणे चुकीचे आहे (ते इतरांच्या मालकीचे आहे) आणि शक्य होईल तितके आपण ज्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांची माफी मागितली पाहिजे. देव आपल्याला क्षमा करतो तेव्हा आपण इतरांनाही त्याच प्रकारे क्षमा केली पाहिजे. जर आपण असे केले नाही तर देव त्याची क्षमा मागे घेतो (मत्तय १८:२३-३५). पश्चात्ताप आणि विश्वासापाठोपाठ पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, ज्याद्वारे आपण देवाला, माणसांना आणि दुरात्म्यांना जाहीरपणे साक्ष देतो की आपल्यातला जुना मनुष्य खरोखरच गाडला गेला आहे (रोम ६:४,६). मग आपला पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा होऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाद्वारे आणि आपल्या ओठांद्वारे ख्रिस्ताचे साक्षीदार होण्याचे सामर्थ्य मिळते (प्रेषितांची कृत्ये १:८). पवित्र आत्म्यातील बाप्तिस्मा हे देवाच्या सर्व मुलांनी विश्वासाने प्राप्त करण्याचे अभिवचन आहे (मत्तय ३:११, लूक ११:१३). आत्म्याची साक्ष देणे हा प्रत्येक शिष्याचा बहुमान आहे की तो खरोखरच देवाचे मूल आहे (रोम ८:१६) आणि त्याला खरोखरच पवित्र आत्मा मिळाला आहे हे समजणेदेखील प्रत्येक शिष्याचा बहुमान आहे (प्रेषितांची कृत्ये १९:२).

२. पवित्रीकरण :
पवित्रीकरण हा इमारतीचा डोलारा आहे. पवित्रीकरण (म्हणजे पाप आणि जगापासून वेगळे होणे) ही एक प्रक्रिया आहे जी नव्या जन्मापासून (१ करिंथ १:२) सुरू होते आणि ती आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील जीवनात (१ थेस्सलनी ५:२३,२४) चालू राहिली पाहिजे. देवाने पवित्र आत्म्याद्वारे त्याचे नियम आपल्या हृदयावर लिहून आपल्यात सुरू केलेले हे कार्य आहे; पण आपल्याला आपली भूमिका भीतीने आणि थरथर कापत पार पाडली पाहिजे (फिलिप्पै २:१२,१३). आत्मा आपल्याला देत असलेल्या सामर्थ्याद्वारे आपल्याला देहाची कृत्ये ठार मारली पाहिजेत (रोम ८:१३). आपल्यालाच देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुध्दतेपासून स्वतःला शुद्ध करावे लागते आणि देवाचे भय बाळगून पवित्रता पूर्ण करावी लागते (२करिंथ ७:१). या कार्यात जेव्हा शिष्य खरोखर मनःपूर्वक पवित्र आत्म्याला सहकार्य करतो तेथे पवित्रीकरणाचे कार्य त्याच्या जीवनात झपाट्याने प्रगती करेल. आत्म्याच्या नेतृत्वाला मंद प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात हे कार्य संथ किंवा स्थिर असेल. मोहाच्या वेळी आपल्या अंतःकरणाची पवित्रीकरणाच्या इच्छेची खरी कसोटी असते. पवित्र असणे म्हणजे आपल्या अंतःकरणात नियमशास्त्राचे नीतिमत्त्व पूर्ण करणे - आणि जुन्या करारानुसार फक्त बाह्य नाही (रोम ८:४). येशूने मत्तय ५:१७-४८ मध्ये यावरच भर दिला होता . देवावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती करणे आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रीती करणे असा येशूने नियमशास्त्राच्या आवश्यकतांचा सारांश केला (मत्तय २२:३६-४०). प्रीतीचा हा नियम देव आता आपल्या अंतःकरणात लिहू पाहतो, कारण त्याचा स्वतःचा स्वभाव प्रीती आहे (इब्री ८:१०; २ पेत्र १:४). याचे बाह्य प्रकटीकरण हे जाणीवपूर्वक केलेल्या सर्व पापावर विजय मिळवलेले आणि येशूच्या सर्व आज्ञांचे पालन करणारे जीवन असेल (योहान १४:१५). येशूने घालून दिलेल्या शिष्यत्वाच्या अटींची पूर्तता केल्याशिवाय या जीवनात प्रवेश करणे अशक्य आहे (लूक १४:२६-३३). यात मूलभूतपणे प्रभूला, आपले सर्व नातेवाईक आणि आपले स्व-जीवन यांऐवजी सर्वप्रथम प्राधान्य देणे आणि आपल्या सर्व भौतिक संपत्तीपासून आणि मालमत्तेपासून अलिप्त राहणे हे आहे. हे अरुंद प्रवेशद्वार आहे जे आपल्याला आधी पार करावे लागते. मग पवित्रीकरणाचा अरुंद मार्ग येतो. जे पवित्रीकरणाचा पाठपुरावा करत नाहीत त्यांना प्रभू कधीही दिसणार नाही (इब्री १२:१४).

३. गौरवीकरण :
इथे आणि आता आपल्या विवेकात परिपूर्ण असणे शक्य असले (इब्री ७:१९;९:९,१४) तरी येशूच्या पुनरागमनाच्या वेळी गौरवशाली शरीर असल्याशिवाय पापहीन परिपूर्ण असणे शक्य नाही १ योहान ३:२). तरच आपण त्याच्यासारखे होऊ शकतो. पण आजही आपण तो जसा चालला तसे आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे (१ योहान २:६). आपले कितीही पवित्रीकरण झालेले असो पण जोपर्यंत आपल्याकडे हे नाशवंत शरीर आहे तोपर्यंत त्यात अजाणपणे केलेले पाप सापडेल (१ योहान १:८). जर आपण एकनिष्ठ असलो (१ करिंथ ४:४) तर आपण आपल्या विवेकात परिपूर्ण बनू शकतो (प्रेषितांची कृत्ये २४:१६) आणि जाणीवपूर्वक घडणाऱ्या पापापासून आताही मुक्त होऊ शकतो (१ योहान २:१अ). अशा प्रकारे आपण ख्रिस्ताच्या दुस-या येण्याची आणि आपल्या गौरवाची वाट पाहतो - आपल्या तारणाचा शेवटचा भाग, जेव्हा आपण पापरहित परिपूर्ण बनू (रोम. ८:२३; फिलिप्पै ३:२१).