WFTW Body: 

देवाचे वचन सांगते की, पतींनी आपल्या पत्नींवर कसे प्रेम करावे हे समजण्यासाठी, येशूच्या मंडळीवरील प्रेमाला त्यांनी एक आदर्श म्हणून पाहावे (इफिसकरांस पत्र ५:२५). कोणताही पती ज्याच्यामध्ये निदान दहा टक्के तरी प्रामाणिकपणा आहे तो हे मान्य करेल की, त्या वचनाचे पालन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. असा एकही माणूस नाही ज्याला हे साध्य झाले आहे. खेदाची गोष्ट अशी आहे की, बहुसंख्य विश्वासणारे ते साध्य करण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. जर आपण प्रयत्नच करत नसू, तर आपण त्या वचनाचे पालन कधीच करू शकणार नाही. जेव्हा पवित्र शास्त्र "परिपूर्णतेकडे वाटचाल” करा असे म्हणते, तेव्हा त्याचा नेमका हाच अर्थ असतो. पतींचे एकच कर्तव्य आहे: ख्रिस्ताने मंडळीवर जसे प्रेम केले, तसेच त्यांनी आपल्या पत्नींवर प्रेम करणे. या बाबतीत त्यांनी परिपूर्णतेकडे वाटचाल केली पाहिजे; जेणेकरून दरवर्षी त्यांचे आपल्या पत्नीवरील प्रेम अधिकच परिपूर्ण होत जाईल अगदी तसेच, जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केले आणि तिला पवित्र करण्यासाठी स्वतःचा प्राण दिला.

जेव्हा ख्रिस्ताला मंडळीमध्ये काही चुका दिसून आल्या, तेव्हा त्याने त्यांच्या चुका कश्या सुधारल्या? बहुतेक पती जसे करतात, तसे त्याने केले नाही. बहुतेक पती आपल्या पत्नीमधील चुका सुधारण्यासाठी कठोर आणि तीव्र शब्दांचा वापर करतात; जसे की,"तू नीट वागत नाहीस," किंवा अशाच प्रकारचे इतर काही सैतानी शब्द वापरतात. येशूने मात्र तसे केले नाही. जेव्हा त्याला मंडळीला 'डाग किंवा सुरकुती नसलेली', 'पवित्र' आणि 'निर्दोष' अशी परिपूर्ण बनवायचे होते, तेव्हा त्याने काय केले? तिला पवित्र करण्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला. तुम्ही कधी तुमच्या पत्नीसाठी असे करण्याचा विचार केला आहे का? हाच देवाचा मार्ग आहे. संपूर्ण मानवजात उलट दिशेने जात आहे; ती पूर्णपणे विरुद्ध दिशेने वाटचाल करत आहे. जर तुम्ही देवाच्या मार्गाचे अनुसरण केले तर तुमचे वैवाहिक जीवन 'चांगल्याकडून' 'उत्कृष्टतेकडे' वाटचाल करेल. जेव्हा एक पती म्हणून तुम्हाला तुमच्या पत्नीमध्ये एखादी उणीव किंवा दोष दिसून येईल, तेव्हा तुम्ही येशूचेच अनुसरण केले पाहिजे. तुमच्या सभोवतालचे इतर सर्व लोक जसे वागत आहेत, तसे तुम्ही वागता कामा नये.

सोडून देण्यास सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपला 'अहंकार' आहे – त्याला "मी" असे म्हणतात —तो असा एक महत्त्वाचा माणूस आहे जो सिंहासनावर विराजमान झालेला असतो. सिंहासनावर बसलेल्या त्या 'राजाच्या' अपेक्षेप्रमाणे जेव्हा त्याची पत्नी गोष्टी करत नाही, तेव्हा त्याला खूप राग येतो आणि खूप दुःखही होते. हेच तुमचे 'स्वत्व' आहे, ज्याचा त्याग करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या पत्नीला पवित्र करू शकाल. दुर्दैवाने, या मार्गाने जाण्यास इच्छुक असलेले पती फारच थोडे आहेत. जर तुम्ही या मार्गाने गेला नाहीत, तर मग साहजिकच तुमचे वैवाहिक जीवन केवळ अधोगतीकडेच वाटचाल करेल. पण जर तुम्हाला खरोखरच या मार्गाने जायचे असेल, तर तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते गांभीर्याने घेतले पाहिजे. प्रेमाचा अर्थ शब्दकोशात शोधू नका. त्याऐवजी, प्रेमाचा अर्थ ख्रिस्ताच्या उदाहरणात शोधा – ज्याप्रमाणे ख्रिस्ताने केले, त्याप्रमाणे तुमच्या नातेसंबंधात स्वतःचा प्राण देण्यासाठी तयार असा. पती म्हणून हेच आपल्याला ईश्वरी आवाहन आहे.

येशू आपला नेता आहे, पण जगाला नेतृत्वाची जी संकल्पना समजते, त्या अर्थाने नाही. पृथ्वीवरील त्याच्या शेवटच्या दिवसांत येशू आपल्याला कुठे आढळतो, हे तुम्हाला माहित आहे का? तो आपल्या वधूच्या पायांजवळ, तिचे पाय धुताना आढळतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जर एखादा पती परिपूर्णतेच्या शिखरावर पोहोचला असेल, तर तो आपल्या पत्नीच्या पायांजवळ, तिचे पाय धुताना, तिला मदत करताना आणि तिला पवित्र करण्यासाठी शुद्ध करताना आढळेल. तिचे पाय धुणे म्हणजे काय? याचा अर्थ ' कष्टाची – घाणेरडी ' कामे करणे हा आहे. अर्थात, काही मूर्ख पत्नी असतात ज्या याचा गैरफायदा घेतात आणि आपल्या पतींवर हुकमत गाजवतात. येशू काही अस 'पायपुसण' नव्हता, ज्याच्यावरून लोकांनी चालत जावे; तो असा होता का ? जेव्हा आम्ही म्हणतो की पतीने आपल्या पत्नीचे पाय धुतले पाहिजेत आणि 'कमी दर्जाची' कामे केली पाहिजेत, तेव्हा काही स्त्रिया त्याचा चुकीचा अर्थ लावतात. परिणामी, त्यांचे पती केवळ नोकर बनून राहतात आणि सर्व प्रकारची कष्टाची – घाणेरडी कामे करत राहतात. मला तसे म्हणायचे नाही. येशू काही पायपुसण नव्हता. जर तुम्ही येशूला त्याच्या शिष्यांसोबत बसलेले पाहिले असते, तर नेता कोण आहे याबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका असली नसती. तिथे नेतृत्व अत्यंत स्पष्ट दिसत होते. पेत्र किंवा मत्तय हे नेते आहेत, असा विचार तुमच्या मनात कधीच आला नसता. पतींचा स्तर देखील तसाच असला पाहिजे. प्रमुख आणि सेवक या दोन्ही भूमिकांमधील तो नाजूक समतोलच आपण येशूकडून शिकला पाहिजे. अशा प्रकारच्या नेतृत्वासाठी तुम्हाला सुज्ञतेची गरज असते; आणि ती सुज्ञता केवळ प्रभूच तुम्हाला देऊ शकतो – जर तुम्ही प्रार्थनेद्वारे ती त्याच्याकडे मागितली तर.

येशू हा असा मेंढपाळ आहे, जो आपल्या कळपाच्या पुढे चालतो. तो त्यांना मागून लाथा मारत नाही. येशूने केवळ तोंडी उपदेशांचा भडिमार केला नाही. आपल्या वधूने अनुकरण करावे, यासाठी तो स्वतःच एक आदर्श उदाहरण बनला. पतीने देखील तसेच असले पाहिजे – येशूसारखेच एक आदर्श उदाहरण – आपल्या पत्नीला योग्य मार्गावर नेणारा एक मेंढपाळ. माझ्या प्रिय बंधू, जेव्हा तुमची पत्नी अडखळते किंवा चुकते, तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा की : 'देवाने माझ्या स्वाधीन केलेल्या माझ्या मेंढीला – माझ्या पत्नीला – मी योग्य मार्गाने नेत आहे का?' तुमच्या पत्नीच्या मागोमाग इतर लहान कोकरे येतात – म्हणजेच तुमची मुले. ती सर्वच्या सर्व एकाच माणसावर – त्या मेंढपाळावर – अवलंबून असतात. जर पतीमध्येच आत्मसंयम नसेल, तर मेंढ्या आणि कोकरांचे आचरण चांगले असण्याची तुम्ही अपेक्षा कशी करू शकता? जर तो स्वतःच्या तारणासाठी 'भीतीने आणि थरथर कापत' प्रयत्न करत नसेल आणि जर तो येशूचे अनुसरण करत नसेल, तर ते घर कोणत्या दिशेने वाटचाल करेल ? ती दिशा, देवाने योजलेल्या दिशेच्या अगदी विरुद्ध असेल—अगदी उर्वरित मानवजातिच्या दिशेने .

म्हणून, जर आपल्याला आपला विवाह 'चांगल्याकडून उत्कृष्टतेकडे' नेयचा असेल, तर आपल्याला अशा पतींची गरज आहे, जे येशूचे अनुसरण करण्याच्या या बाबीला अत्यंत गांभीर्याने घेतात. ही गोष्ट त्यांचा छंद, त्यांच्या संपूर्ण आयुष्याची उत्कट ओढ, किंबहुना त्यांचा पूर्णवेळचा 'व्यवसाय'च असायला हवी — केवळ मंडळीच्या सभेत अधूनमधून केली जाणारी एखादी कृती नव्हे. अशा प्रकारचा विवाह केवळ शिष्यांसाठी असतो; केवळ मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी नव्हे.