लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

इब्री लोकांस पत्र ४:१३ मध्ये लिहिले आहे - "ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे, त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत".

हा एक सुंदर वाक्यांश आहे: "ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे." याचा अर्थ असा की, विश्वात अशी एकच व्यक्ती आहे जिला माणूस या नात्याने आपल्याला हिशेब द्यायचा आहे, जिला उत्तर द्यायचे आहे, फक्त एकच व्यक्ती आहे- स्वतः देव. हे ओळखून तुम्ही तुमचे जीवन जगलात तर तुम्ही अधिकाधिक चांगले व्हाल. पण जर तुम्ही नेहमी तुमच्याबद्दलच्या इतरांच्या मताचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल.

जर तुम्हांला देवाचा सेवक बनायचे असेल तर नेहमी हे ओळखा की "ज्याला तुम्हांला हिशेब द्यायचा आहे तो देवच आहे." तुम्हांला चांगली व्यक्ती म्हणणारे दहा हजार लोक तुम्हांला चांगली व्यक्ती बनवणार नाहीत. त्याचप्रमाणे, तुम्हांला वाईट माणूस म्हणणारे दहा हजार लोक तुम्हांला वाईट बनवणार नाहीत.

मनुष्यांची प्रमाणपत्रे निरर्थक आहेत. त्यामुळे ती सर्व कचराकुंडीत फेकून द्या. इतरांना तुमचे खाजगी आयुष्य, तुमचे विचार आणि तुमचे पैशाचे व्यवहार इत्यादींबद्दल खूप थोडी माहिती असते. त्यांना तुमच्या आयुष्याबद्दल फक्त १% माहिती आहे आणि त्यांचे मत फक्त त्या १% ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे त्यांची मते निरर्थक आहेत- मग ती चांगली असो वा वाईट. चांगली आणि वाईट दोन्ही मते कचराकुंडीत टाकण्यास योग्य आहेत. त्यांना तिथे फेकून द्या. मी स्वत: अनेक वर्षांपासून हेच केले आहे. अशाप्रकारे मला देवाची सेवा करण्यासाठी मोकळीक मिळाली आहे.

देवाची सेवा करण्यासाठी तुम्हांला मोकळे व्हायचे असेल तर म्हणा, "प्रभू, मला ज्याला हिशेब द्यायचा आहे तो तूच आहेस. मला दररोज तुझ्यासमोर उभे राहायचे आहे. तुझ्या डोळ्यांपासून काहीही लपलेले नाही. माझ्या आयुष्यातले सगळे तुला स्पष्ट आहे आणि तुझ्यासमोर उघड आहे. मी आध्यात्मिक आहे असे लोकांना दाखवून फसवू शकतो, पण मी तुला फसवू शकत नाही." जर तुम्ही असे जगलात तर तुमच्या आयुष्यात अधिक चांगल्या प्रकारे बदल होताना दिसेल. अशा प्रकारे तुम्ही नव्या कराराच्या जीवनात प्रवेश करायला सुरुवात कराल.