WFTW Body: 

चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यात, येशूने आपला एखादा बंधू ज्याला आपण गरजेत असल्याचे पाहतो त्याला मदत करण्याचे महत्त्व शिकवले.(लूक १०:२५-३७).

तेथे आपण एका शास्त्र्याला येशूला सार्वकालिक जीवनाचा वारसा कसा मिळवावा याबद्दल प्रश्न विचारताना पाहतो. येशूने, देवावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती करून आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रीती करून हे उत्तर दिले. पण त्या शास्त्र्याने (आजच्या पवित्र शास्त्राच्या अनेक विद्वानांप्रमाणे) "काही प्रकारच्या लोकांवर प्रेम न करण्याचे समर्थन करण्याची इच्छा" (लूक १०:२९ - लिव्हिंग बायबल) धरत येशूला विचारले की, 'शेजारी' या शब्दाचा उल्लेख कोणासाठी आहे . येशूने त्याच्या प्रश्नाला दाखल्याने उत्तर दिले.

लुटारुंनी मारहाण केलेल्या, रस्त्यावर पडलेल्या एका व्यक्तीबद्दल येशूने सांगितले. एका याजकाने (देवाच्या घरातील एक वडील) त्याला पाहिले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्या काळात इस्राएलमधील सर्वजण अब्राहम,इसहाक आणि याकोब यांच्याच वंशातले होते. तर ते सर्व भाऊ-बहीण होते, जसे आपण विश्वासणारे आहोत. त्यामुळे रस्त्यावर पडलेला हा माणूस याजकाचा भाऊ होता. पण याजकाने त्याला पाहिले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने कदाचित त्याचा न्याय असा केला असेल की , त्याने रात्री एकाकी रस्त्यावर एकटे चालता कामा नये. कधीकधी आपण सह-विश्वासणाऱ्या लोकांना त्रास होताना पाहतो, त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा न्याय करण्यात तत्पर असू शकतो.

प्रभूला एक दिवस आम्हाला म्हणावे लागेल का, "मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’(मत्तय २५:४२-४३) तुम्ही फक्त माझ्यासाठी गीते गायली आणि मला उपदेश केला पण माझ्या गरजेच्या वेळी मला कधीही मदत केली नाहीत. तो याजक आपल्या गरजू भावाला मदत करण्यापेक्षा यरुशलेममधील सभेला वेळेवर जाण्यासाठी जास्त उत्सुक होता. येशूने आपल्याला असा इशारा दिला आहे की, नियमितपणे सभांमध्ये उपदेश करणारेही अनेक लोक शेवटी नरकात जाऊ शकतात. (मत्तय ७:२२,२३)

मग, एक लेवीसुद्धा (देवाच्या घरातला भाऊ) तिथून गेला आणि त्यानेही आपल्या गरजू भावाकडे दुर्लक्ष केले. तो ही परिक्षेत अपयशी ठरला. त्यालाही सभेला वेळेवर जायचे होते. या दोघांना सभेला, देव त्यांच्याशी बोलत असल्याचे ऐकण्यासाठी जायचे होते. पण गरजू भावाला मदत करण्यासाठी देव आधीच त्यांच्याशी बोलला होता हे सभेला जाताना त्यांना समजले नाही. पण प्रभू काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे कान नव्हते. आणि म्हणून, त्या सकाळची त्यांची गीते आणि प्रार्थना हे सर्व देवासाठी व्यर्थ होते. देव बऱ्याचदा देवभीरु लोकांच्या दुःखाचा वापर त्यांना त्रास होताना पाहणाऱ्यांच्या अंतःकरणाची परीक्षा घेण्यासाठी करतो. ईयोबाच्या कथेचा विचार करा. देवाने ईयोबाच्या दुःखातून त्याच्या तीन मित्रांच्या अंतःकरणाची परीक्षा घेतली. आणि तिघेही परिक्षेत अपयशी ठरले.

येशूने सांगितलेल्या कथेत आपण स्वतःला त्या याजकात आणि लेवीमध्ये पाहतो का? तसे असेल तर आपण पश्चात्ताप करू या आणि येत्या काही दिवसांत पूर्णपणे वेगळे होण्याचा प्रयत्न करूया. याजक आणि लेवी हे जुन्या कराराचे लोक होते. पण नवीन कराराचे ख्रिस्ती म्हणून आपण अधिक उंचीवर पोहोचल्याचा दावा करतो. असे असेल तर आपल्याला स्वतः येशूचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलावले आहे . आणि आपण स्वत: ला विचारण्याची गरज आहे की आपण त्याचे योग्य प्रतिनिधित्व करीत आहोत का?

शेवटी, तो एक तुच्छ लेखलेला शोमरोनी होता (आजच्या अशा एका भावाचे प्रतीक आहे, एक भाऊ जो अनेक चुकीच्या धर्मसिद्धांतांसह बाबेलच्या पंथाचा आहे), ज्याने त्या गरीब, जखमी माणसाला मदत केली. तो शोमरोनी वडील किंवा उपदेशक नव्हता. तो त्या शांत लोकांपैकी एक होता जे कोणत्याही गरजूला मदत करण्यास नेहमीच तयार असतात - कोणालाही त्यांच्या कृतींबद्दल कळू न देता. त्या जखमी माणसाला पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, अशी आपत्ती त्याच्याबाबतीतही घडू शकली असती. म्हणून त्याने स्वत: ला नाकारले आणि आपल्या गरजू भावाला मदत करण्यासाठी आपला वेळ आणि पैसे खर्च केले.

तेथे आपण पाहतो की, प्रभू येशूचा खरा शिष्य होण्याचा अर्थ काय आहे. आपण आपल्या धर्मसिद्धांतांनी नव्हे तर जीवनाच्या मार्गात भेटणाऱ्या गरजू बांधवांबद्दलच्या आपल्या वृत्तीवरून ख्रिस्ताचे स्वरूप प्रतिबिंबित करतो. याचा अर्थ प्रत्येकासाठी आणि सर्वांसाठी चांगले, प्रेमळ आणि दयाळू असणे.

प्रभू आपल्या सर्वांना नेहमी अशा मार्गाने जाण्यास मदत करो. आमेन.