लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम. (फिलिप्पैकरांस पत्र ३:७-‬१४)

एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीने समृद्ध व पूर्ण जीवनाची समाप्ती जवळ आली असता दिलेली ही साक्ष आहे. पौलाचा पालट होऊन तीस वर्षे उलटून गेली होती. त्या काळात देवाने अनेक मंडळ्या स्थापन करण्यासाठी त्याचा उपयोग केला होता आणि चिन्हे व चमत्कारांनी त्याच्या सेवाकार्यावर शिक्कामोर्तब केले होते. पहिल्यापासून पौलाने स्वतःला शुभवर्तमानाच्या कार्यात अखंडपणे खर्ची घातले होते, सतत प्रवास केला आणि त्याला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते. आपल्या प्रभूसारखे होण्यात तो जसजसा वाढत गेला तसतसे त्याला पापावरील विजयाचे वास्तव कळले होते. आणि त्याच्या अनेक आनंदांपैकी एक, त्याने वर्णन केल्याप्रमाणे आध्यात्मिक सत्याचे उल्लेखनीय खुलासे मिळवण्यासाठी त्याला तिसऱ्या स्वर्गात उचलले गेले.

तरीपण या सगळ्याच्या शेवटी तो म्हणतो की देवाने आपल्या जीवनासाठी जे काही योजले होते ते त्याने अजूनही प्राप्त केले नाही. इथे सर्वकाळच्या महान ख्रिस्ती लोकांपैकी हा एक आहे जो आपल्या जीवनाच्या शेवटास म्हणतो त्याला अजूनही ध्येयापर्यंत जाण्यासाठी झटून प्रयत्न करायचे आहेत. बहुतेक विश्वासणाऱ्या बांधवांसाठी, दुर्दैवाने, तारणाची सुरुवात नव्या जन्माने होते आणि शेवट देवाच्या न्यायदंडापासून सुटका यातच होतो .प्रेषितासाठी तसे नाही किंवा त्याच्यासारखा ख्रिस्ताचा खरा शिष्य बनू इच्छिणाऱ्या इतर कोणासाठीही असे नाही. या उताऱ्यात तो आपला ठाम विश्वास जाहीर करतो की ख्रिस्ताने एका उद्देशाने त्याला कह्यात घेतले होते. त्या बदल्यात त्याने कोणत्याही परिस्थितीत तो उद्देश प्राप्त करण्याचा निश्चय केला होता. हे एक जबरदस्त आणि गंभीर सत्य आहे की, जेव्हा प्रभू आपल्याला परिवर्तनाच्या वेळी कह्यात घेतो तेव्हा त्याचा उद्देश केवळ नरकातल्या अग्नीपासून आपल्या जिवांना वाचवणे आणि स्वर्गात नेणे याच्या कितीतरी पलीकडे असतो. प्रेषित पौलासारख्या परिपक्व माणसाला तीस वर्षांच्या अथक ख्रिस्ती सेवेच्या शेवटी असे म्हणावे लागले की त्याला अद्याप यश मिळाले नव्हते, पण तरीही त्याला आपल्या जीवनासाठी असलेल्या देवाच्या उद्देशातील सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागला, तर तो उद्देश किती मोठा असला पाहिजे.

पौल या उताऱ्यात आणखी पुढे जातो. देवाचा उद्देश समजून घेण्याच्या आणि त्याची पूर्तता करण्याच्या या सर्वोच्च उद्दिष्टाच्या तुलनेत जगाला जे काही मौल्यवान वाटते ते निरर्थक केरकचरा आहे असे पौलाला वाटते. तो याला पुरस्कार समजतो जो जगातील सर्व काही सोडून देण्याजोगा आहे (वचन १४). जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि विश्वासणाऱ्या बांधवांना सांसारिक संपत्तीचा लोभ करताना आणि भौतिक गोष्टींना चिकटून राहताना पाहतो तेव्हा आपल्याला असा निष्कर्ष काढावा लागतो की त्यांचे ख्रिस्तीपण पौलाच्या ख्रिस्तीपणापासून खूप दूर आहे.

केवळ नरकाच्या ज्वालामधून सुटका करून घेण्यासाठी विमा योजनेप्रमाणे तारणाचा विचार करणे हे आध्यात्मिक बालपणाचे लक्षण आहे. आध्यात्मिकरित्या परिपक्व झाल्यावर आपल्याला जाणीव होते की देवाने आपल्याला वाचवले आहे जेणेकरून त्याने आपल्यापैकी प्रत्येकासाठी सर्वकाळापासून नियोजित केलेल्या मार्गावरून आपल्याला दररोज चालता यावे (इफिसकरांस पत्र २:१०). तो मार्ग म्हणजे पौलाने म्हटलेला त्याच्या जीवनासाठी असलेला देवाचा उद्देश होय. जर आपण त्याची कृपा प्राप्त केल्याबद्दल समाधानी असू, पण आपल्या जीवनासाठी त्याची इच्छा पूर्ण करण्यास कटिबद्ध नसलो, तर आपण कितीही धर्मनिष्ठ असलो तरीही आपण कायम टिकेल असे देवासाठी काही न प्राप्त करता आपले जीवन घालवू. अर्थात, सैतानाचा पहिला उद्देश या किंवा त्याप्रकारे लोकांना ख्रिस्त येशूमधील देवाच्या कृपेबद्दल आंधळे करणे हा आहे, ज्यामुळे त्यांना वाचवण्यापासून रोखले जाते (२ करिंथकरांस पत्र ४:४). पण जर तो तिथे यशस्वी झाला नाही तर त्याचे पुढचे ध्येय हे आहे की त्या नव्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला देवाच्या त्याच्याबद्दल असलेल्या एका निश्चित योजनेबद्दल आंधळे करणे. बऱ्याच प्रमाणात तो इथे यशस्वी झाला आहे. असे हजारो खरे विश्वासणारे आहेत जे आपल्या जीवनात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्येही कोणत्याही कळकळीने देवाची इच्छा शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत.

या फिलिप्पैकरांस लिहिलेल्या अध्याय ३मधील उताऱ्यात ख्रिस्ती जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे ज्यात आपल्याला सतत झटून प्रयत्न केले पाहिजे. पृथ्वीवर प्राप्त होणारी आध्यात्मिक परिपक्वता आपल्याला सतत निकडीच्या या गरजेपासून कधीही मुक्त करणार नाही. पुष्कळ विश्वासणाऱ्या बांधवांनी या धड्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही जिवंत साक्ष नाही. त्यांची एकमेव साक्ष दूरच्या भूतकाळातील एका अनुभवाशी संबंधित आहे जेव्हा एका आशीर्वादित दिवशी त्यांनी हात वर केला किंवा एखाद्या सुवार्तिक सभेत निर्णय पत्रावर स्वाक्षरी केली. ते खूप छान होते, पण त्यानंतर काहीही घडले नाही! नीतिसूत्रे २४:३०-३४ मध्ये एका वाया घालवलेल्या बागेचे चित्र आहे जे तारण झाल्यानंतर विश्रांती घेणाऱ्या मनुष्याच्या स्थितीचे वर्णन करते. बागेत सतत तण उपटावे लागतात आणि काळजी घ्यावी लागते, जर तिचे निदण आणि खाजकुयरीपासून संरक्षण करायचे असेल तर - आणि मानवी जीवाचेही तसेच आहे.