लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

हबक्कूक एक अशा माणसाची कहाणी आहे ज्याला प्रश्न पडले होते परंतु ज्याने शंकांपासून खात्रीपर्यंत प्रवास केला. त्याने संशयाने सुरुवात केली, “हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस."(हबक्कूक १:२) पण त्याचा संशय खात्रीत संपतो: "परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो."(हबक्कूक ३:१९)

जेव्हा हबक्कूकने प्रभूला पाहिले, तेव्हा त्याचे अंतःकरण स्तुतीने भरून गेले: “परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो."(हबक्कूक २:२०) त्याच्या विश्वासाचा झगडा विश्वासाच्या विजयात संपला. तो म्हणतो, “प्रभू मी तुझ्या थोरवीसमोर गप्प बसलो आहे. मला आणखी प्रश्न नाहीत.” जेव्हा ईयोबाने देवाचे गौरव पाहिले तेव्हा तोही म्हणाला, “आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे; मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. (ईयोब ४२:५;४०:४) जेव्हा ईयोबाने प्रभूला पाहिले तेव्हा त्याला आणखी प्रश्न पडले नाहीत. देव तुमच्या सर्व १०,००० प्रश्नांची उत्तरे देणार नाही कारण जर त्याने ती दिली तर तुम्हाला आणखी १०,००० प्रश्न पडतील! उत्तर (ईयोब आणि हबक्कूकच्या बाबतीत) स्वतः प्रभूला पाहणे आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे. तुम्ही त्याला पाहिले आहे का?तर तुमचा देह त्याच्यापुढे शांत राहील आणि तुम्हाला आणखी प्रश्न पडणार नाहीत!

जेव्हा हबक्कूकने देवाला पाहिले तेव्हा त्याने विश्वासाने जीवन जगण्याचे पारितोषिक पाहिले. देव-केंद्रित जीवन एक विजयी जीवन आहे. देव वाईट लोकांना शिक्षा करण्यासाठी काही करत नाही असा विचार करणारा हबक्कूक आता प्रार्थना करतो की देव क्रोधामध्ये असताना दयाळू होईल (हबक्कूक ३:२). ज्याने अशी कल्पना केली होती की देवाने आपल्या लोकांचा त्याग केला आहे तो आता स्तुतीचे गीत गातो. तो म्हणतो, “हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे; तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस. (हबक्कूक ३:२‭-‬१४)

हबक्कूकने आता देवाला प्रथम पाहिले बाबेलच्या लोकांना नाही. अंत:करणाचे शुद्ध असणारे देवाला सर्वत्र आणि सर्व वेळ पाहतील. (मत्तय ५: ८) आतापर्यंतची हबक्कूकची समस्या अशी होती की त्याने बाबेलच्या दुष्ट लोकांची फक्त भरभराट होताना पाहिले. आता त्याने पाहिले की सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणात आहे. “दुष्ट घराण्याचा प्रमुख” हे सैतानाला लागू होऊ शकते ज्याला येशूने वधस्तंभावर ठेचले. जेव्हा हबक्कूकने देवाला त्याच्या गौरव आणि महानतेमध्ये पाहिले तेव्हा त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. जेव्हा त्याने देवाला पाहिले तेव्हा त्याचे काळीज थरथरले आणि म्हटले, “ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.(हबक्कूक ३:१६). जेव्हा तुम्हाला शंका असेल तर त्याबद्दल देवाशी बोला, मनुष्याशी नाही. देवाचा हबक्कूक आणि आमच्यासाठी अंतिम शब्द आहे “वाट पहा!”. जेव्हा हबक्कूकने वाट पाहिली आणि देवाचे ऐकले, तेव्हा त्याची तक्रार गाण्यात रूपांतरित झाली. आपल्या बाबतीतही असेच होईल. सर्वांत कठीण काम म्हणजे प्रतीक्षा करणे.

हबक्कूकचे अद्भूत असे स्तुतीपर गान संपूर्ण जुन्या करारातील विश्वासाच्या सर्वांत सुंदर गाण्यांपैकी एक आहे. तो येथे एका नवीन कराराच्या संताप्रमाणे गातो: "अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्‍या देवाविषयी मी उल्लास करीन."(हबक्कूक 3:17-18) ईयोबाप्रमाणेच त्याचाही व्यवसाय उद्ध्वस्त झाला असेल आणि कदाचित त्याने सर्व काही गमावले असेल. परंतु तो अजूनही आनंदित होईल कारण त्याचा आनंद परमेश्वरामध्ये आहे आणि पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीत त्याला तो आढळत नाही. जरी आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी अपयशी झाल्या, तरीही आपण आपल्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करू. स्तुतीचे गाणे म्हणजे विश्वासाच्या अंतर्गत विजयाची बाह्य अभिव्यक्ती. "तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला; त्यांनी त्याची स्तोत्रे गाइली."(स्तोत्रसंहिता १०६:१२) हबक्कूक पुढे म्हणतो, “परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो." (हबक्कूक ३:१९). हा संदेष्टा ज्याला सुरुवातीस खूप शंका आणि भीती होती तो आता सांगतो की प्रभू त्याला प्रत्येक शंकेच्या डोंगरावरून सुरक्षितपणे नेईल आणि निश्चितपणे खडकाळ सुळक्यावर पाय न घसरणाऱ्या हरणासारखे करेल. हबक्कूक शेवटी एक चित्तवेधक छोटीशी टीप जोडतो : “[मुख्य गवयासाठी, माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे]" (हबक्कूक ३:१९) तो म्हणत आहे की सर्व काही हरवले तरी, हे गाणे शोकगीतासारखे गाऊ नका! हे आनंददायक संगीतासोबत गायले जाणे आवश्यक आहे - आणि अनेक संगीत वाद्ये देखील वापरण्यात येतील याची खात्री करा! आपण मनापासून परमेश्वराची स्तुती करायला शिकले पाहिजे. कधीही स्तोत्रे नीरसपणे आणि कंटाळवाणे गाऊ नका. या विश्वात काहीही घडले तरी प्रभू सिंहासनावर आहे आणि येशू विजेता आहे. म्हणूनच आपण आपली वाणी आणि देवाने दिलेली सर्व वाद्ये त्याची स्तुती करण्यास व त्याच्या नावाला गौरव देण्यासाठी वापरू या. आमेन.