लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

आपण शास्तेच्या सहाव्या अध्यायात वाचतो की देवाने गिदोनाला इस्राएलाची सुटका करण्यासाठी तयार केले. "परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला" (शास्ते ६:३४). पवित्र आत्मा गिदोनावर त्याने परिधान केलेल्या कपड्यासारखा आला. मग गिदोनाला बळ मिळाले आणि त्याने रणशिंग फुंकले व तो लढायला गेला आणि प्रभूने त्याला विजय मिळवून दिला. पण गिदोन देवाप्रतीच्या विश्वासूपणात टिकून राहिला नाही. जुन्या करारातील काळात व आजही - चांगली सुरुवात करणाऱ्या अनेकांची ही दुःखद कहाणी आहे. गिदोनाने त्यांच्यावर राज्य करावे अशी इस्राएली लोकांना इच्छा होती आणि तो म्हणाला, "मी तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही; माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही. परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवील" (शास्ते ८:२२, २३). हे किती आध्यात्मिक वाटते. पण त्याच्या पुढच्याच वाक्यात तो काय म्हणाला हे ऐका. तो म्हणाला, "तुम्ही प्रत्येकाने आपल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावीत" (शास्ते ८:२४). त्यामुळे सर्व इस्राएल लोकांनी त्याला कर्णभूषणे दिली आणि गिदोनाने १७०० शेकेल (सुमारे २० किलो) सोने तसेच इतर अनेक दागिने आणि महागडे कपडे गोळा केले (शास्ते ८:२६). गिदोन एकाच दिवसात करोडपती बनला- जसे अनेक प्रचारक आपल्या कळपाकडून दशमांश आणि दान गोळा करून करोडपती बनतात आणि ते सर्व घरी घेऊन जातात! गिदोनाने काही सोन्याचा उपयोग करून एफोद बनवला, जी इस्राएल लोकांसाठी उपासनेची मूर्ती बनली (शास्ते ८:२७). त्यामुळे हा महान माणूस पापाकडे वळला. माणूस ज्या पद्धतीने आपले आयुष्याची सुरूवात करतो ते नव्हे तर ज्या पद्धतीने शेवट करतो, ते महत्त्वाचे असते. प्रत्येक शर्यतीतील बक्षीस चांगली सुरुवात करणाऱ्यांसाठी नाही तर चांगला शेवट करणाऱ्यांसाठी असते (१ करिंथकरांस पत्र ९:२४). "लोकांनी आपले जीवन कशाप्रकारे शेवटास नेले" याचा विचार करण्याची आज्ञा आपल्याला दिली आहे (इब्री लोकांस पत्र १३:७). सुरुवातीच्या काळात देवाने ज्यांचा वापर केला असे अनेक प्रचारक गिदोनासारखे पापाकडे वळले आहेत आणि पैसा व मालमत्ता यांच्या मागे लागून त्यांनी आपले आयुष्य संपवले आहे! अभिषेक गमावला असता ते त्यांचे शेवटचे दिवस आपल्या मुलांसाठी सोने व कर्णभूषणे गोळा करण्यात घालवतात! ज्यांनी चांगली सुरुवात केली आहे त्यांना मी सांगू इच्छितो: गिदोनाकडून धडा शिका, नाहीतर तुमच्याबाबतीतही असेच घडू शकते. तुम्ही देव आणि पैसा या दोन्हींची सेवा करू शकत नाही.

शास्तेच्या पुस्तकात अध्याय १३ - १६ मध्ये आपल्याला असे आढळून येते की शमशोन एक शक्तिशाली असा सुटका करणारा होता, पण तो स्वतःच्या वासना व इच्छांचा गुलाम होता. १ करिंथकरांस पत्र ९:२७ मध्ये पौल म्हणतो "तर मी आपले शरीर कुदळतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसर्‍यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन." द लिव्हिंग बायबल मध्ये या वचनाचा असा अनुवाद करण्यात आला आहे की, "माझ्या शरीराने जे करायला पाहिजे ते मी करतो आणि त्याला जे करायला हवे ते नव्हे." याचा अर्थ असा आहे की, आपण आपल्या शरीराने जे खायला पाहिजे ते आपण खावे आणि त्याला जे खायचे आहे ते नाही; जेवढी झोप घ्यायला पाहिजे तेवढीच घ्यावी आणि त्याला किती झोपायचे आहे तेवढे नाही. आपण आपल्या डोळ्यांवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून त्यांनी काय पाहायला पाहिजे तेच पाहावे आणि त्यांना काय पाहावेसे वाटते ते नव्हे . आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून जे बोलायला पाहिजे तेच ती बोलेल आणि जे बोलावेसे वाटेल ते नव्हे. जर आपण आपल्या दैहिक वासनांवर नियंत्रण आणले नाही तर आपण कदाचित अद्भुत संदेशांनी प्रचार करू शकू आणि तरीही शेवटल्या दिवशी आपल्याला देवाकडून बाहेर काढले जाऊ शकते. आपल्या दैहिक वासनांना शिस्त लावण्यावर बरेच काही अवलंबून असते. एक अद्भुत आणि अनेक लोकांना आशीर्वाद देणारी सेवा असलेल्या शमशोनाच्या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो, पण अखेर तो स्वत: अपात्र ठरला. अनेक महान प्रचारक सुंदर स्त्रियांना बळी पडले आहेत. अशा माणसांच्या दैवी दानांनी किंवा त्यांच्या संस्थांच्या विशालतेने प्रभावित होऊ नका!! एका पापात पडणाऱ्या सामान्य विश्वासणाऱ्यापेक्षा पाप करणारा पुढारी ही कितीतरी पटीने अधिक गंभीर गोष्ट आहे. ज्यांना अधिक दिले जाते, त्यांच्याकडून अधिकाची अपेक्षा केली जाते. जर तुम्ही विरुद्धलिंगी व्यक्तीसोबतच्या तुमच्या नातेसंबंधात विश्वासू नसाल तर वडील किंवा पुढारी होण्याचा प्रयत्न करून देवाच्या नावाचा अनादर करू नका. तुम्ही पापात राहत असताना तुम्ही देवाचे पवित्र मनुष्य आहात असे दाखवून लोकांना मूर्ख बनवू नका. जर तुम्ही असेच जगत राहिलात तर एक दिवस देव तुमची पापे जाहीरपणे उघडकीस आणेल. तुम्हांला वाटेल की तुम्ही तुमचे पाप लपवण्याइतके हुशार आहात. पण तुम्ही देवासाठी पुरेसे हुशार नाहीत. आतापर्यंत उघडकीस आले असेल त्यापेक्षा तो तुमची पापे अधिक प्रकारे उघडकीस आणेल.

शास्ते १६ मध्ये, शमशोनाने त्याची शक्ती कशी गमावली आणि त्याचे डोळे कसे आंधळे झाले हे आपण वाचतो. जेव्हा प्रचारक स्त्रियांच्या मागे जातात तेव्हा हेच घडते: ते आपली आध्यात्मिक दृष्टी गमावून बसतात. आता ते काही स्पष्टपणे पाहू शकत नाही. ते अजूनही त्यांच्या शिकवणीत तत्वनिष्ठ असू शकतील आणि ते परिणामकारक वक्तृत्वाने प्रचार करू शकतील, पण त्यांची आत्मिक दृष्टी गेलेली असेल. शमशोन गुलाम बनला ; पण देवाची स्तुती असो, जीवनाच्या अखेरीस त्याला त्याचे पाप कबूल करण्याइतपत पुरेशी जाणीव होती. त्याने पश्चात्ताप केला आणि शेवटी त्याच्या मृत्यूसमयी अनेक पलिष्ट्यांचा नाश केला (शास्ते १६:२३-३१). शमशोनाची कथा दोन सिंहांची कथा आहे- एक बाहेरील आणि एक त्याच्या हृदयातील. तो बाह्य सिंहावर मात करू शकला, पण तो अंतर्गत सिंहावर विजय मिळवू शकला नाही. यावरून आपल्याला हे शिकता येते की लैंगिक वासनेचा सिंह कोणत्याही बाह्य सिंहापेक्षा कितीतरी शक्तीशाली आणि ज्याची आपण अधिक भीती बाळगावी असा आहे. जंगलात सिंह तुमच्या दिशेने धावताना दिसला तर तुम्ही काय कराल? तुम्ही मागे वळाल आणि पळाल. वासनेचा सिंह तुमच्याकडे येताना पाहून तुम्हीही तेच करता का? पवित्र शास्त्र आपल्याला असा बोध करते की "जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा." (१ करिंथकरांस पत्र ६:१८) त्यावर मात करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे - अशा प्रलोभनांच्या जवळ कुठेही जाऊ नका. तुम्हाला मोहात पाडणाऱ्या कुठल्याही स्त्रीजवळ जाऊ नका. भुकेल्या सिंहांला जसे तुम्ही टाळाल तसे भुलवणार्‍या स्त्रीला टाळा. शमशोन जुन्या कराराच्या आधिपत्त्याखाली होता. त्यामुळे आज कोणीही शमशोनाचे उदाहरण अनैतिकतेत पडण्यासाठी कारण असे देऊ शकत नाही. शमशोनाकडे नवा करार नव्हता, तो कालवरीच्या क्रूसाच्या आधी राहत होता, आज आपल्याला येशूमध्ये जसे उदाहरण आहे तसे त्याला कोणतेही उदाहरण नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जसा आपल्याला आपल्यामध्ये सहाय्य करणारा पवित्र आत्मा मिळतो तसा त्याला मिळू शकला नाही. परमपवित्र स्थानात पित्याबरोबरच्या सहभागितेत घेऊन जाणारा मार्ग अद्याप खुला नव्हता. शमशोनाला दैवी सहभागितेचे आशीर्वादही मिळाले नाही. हे सर्व आज आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला पापात राहण्याचे कोणतेही कारण देता येणार नाही.