लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

योना ३: १ मध्ये असे लिहिले आहे: "परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा योनाला प्राप्त झाले की,". परमेश्वराची स्तुती करा की आपण एकदा अपयशी ठरलो तर प्रभू आपल्याला दुसरी संधी देतो. योनाच्या पुस्तकातून आपल्याकडे येणारा हा एक महान संदेश आहे. तुम्ही परमेश्वरासमोर अपयशी ठरलात? देव तुम्हांला आणखी एक संधी देण्याची वाट पाहत आहे. तुम्ही दुसऱ्या वेळी अयशस्वी झालात? तो तुम्हांला तिसरी संधी देईल. तो केवळ दुसरी संधी देणारा देव नाही - आपल्यातील बर्‍याच जणांनी खूप पूर्वी, आपली दुसरी संधी घालवली आहे. तो आणखी एक संधी देणारा देव आहे, आपण कितीही वेळा अयशस्वी झालात तरीही! जर तुम्ही मनापासून पश्चात्ताप केला तर प्रभू तुम्हाला आतासुद्धा गमावलेली संधी पुन्हा देईल आणि त्याची सेवा करण्यास सक्षम करेल.

४० दिवसांत निनवेचा पाडाव होईल, अशी प्रत्येक रस्त्यावर घोषणा देत योनाला त्या प्रचंड शहरातून जायला तीन दिवस लागले. आश्चर्य म्हणजे, निनवेच्या लोकांनी लगेच पश्चात्ताप केला. जगाच्या इतिहासामध्ये हे आजपर्यंतचे सर्वांत मोठे आणि द्रुत पुनरुज्जीवन होते. येथे मला प्रोत्साहित करणारी एक गोष्ट आहे की जेव्हा निनवेसारख्या दुष्ट शहराने पश्चात्ताप केला तेव्हासुद्धा देव दयाळू होता. देवाला ठाऊक होते की काही वर्षांनंतर हे शहर इतके वाईट होईल की त्या नगराचा नाश करावा लागेल. परंतु देव सर्वांना जसे ते आत्ता आहेत तसेच वागवतो - आणि पूर्वी जसे होता किंवा भविष्यकाळात असाल तसे नाही. त्याचे नाव "मी आहे " आहे, "मी होतो " किंवा "मी असेन" असे नाही. देव आपल्यापेक्षा दयाळू आहे.

जेव्हा निनवेवर देव दया करतो तेव्हा एखाद्याने असा विचार केला असता की योना उत्साहित झाला असेल. पण तो नव्हता. योनाला धडा शिकवण्यासाठी, देवाने त्याच्या डोक्यावर एक वनस्पती वाढू दिली. योना त्या वनस्पतीमुळे खूप आनंदित झाला. परंतु दुसर्‍या दिवशी देवाने एक किडा उत्पन्न केला ज्याने ती वनस्पती खाऊन टाकली, व ती वाळून गेली. पुन्हा एकदा योनाला खूप राग आला कारण त्याला उन्हाच्या झळा लागत होत्या आणि तो म्हणाला, “मी जगण्यापेक्षा मरणे बरे.” मग देव योनाला म्हणाला, “ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस!तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी १,२०,००० पेक्षा अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? " (योना ४: १0, ११).

योना :४:११ या वचनात जुन्या कराराच्या इतर कोणत्याही वचनापेक्षा अधिक - आपण हरवलेल्या आत्म्यांसाठी देवाची प्रचंड करुणा पाहतो. देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये. काय कारण असेल ते असो या बाबतीत योना देवाबरोबर सहभागी झाला नाही. आज असे बरेच उपदेशक आहेत जे पुनरुज्जीवनाचा प्रचार करतात आणि पुनरुज्जीवन झालेले पाहतातही (योनाप्रमाणेच) पण योनाप्रमाणेच तेसुद्धा देवाच्या दयाळू अंतःकरणाचे भागीदार नाहीत. असे उपदेशक ज्याप्रकारे देवाची इच्छा असते त्याप्रकारे आपली सेवा पूर्ण करत नाहीत. तुम्ही कदाचित उपदेश कराल आणि लोकांचे तारण घडेल; आणि तरीही शेवटी, योनाप्रमाणेच, देवाबरोबर सहभागी नसाल. सुवार्तिक सेवा करण्याचा योग्य पाया म्हणजे देवाच्या अंतःकरणाबरोबर सहभागिता. ज्यांच्याकडे प्रकाश नाही अशा लोकांप्रती देवाला अतीव करुणा आहे. पवित्र शास्त्र म्हणते की सर्व माणसांनी पश्चात्ताप करावा, त्यांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या ज्ञानाकडे यावे अशी देवाची इच्छा आहे. तो त्यासाठी उत्कंठित आहे. जितके आपण देवाच्या हृदयाच्या सहभागितेत येऊ तितके आपण त्याचे ओझे उचलू शकू. जर देवाने तुम्हांला सुवार्तिक म्हणून बोलावले असेल तर तो तुम्हांला हरवलेल्या आत्म्यांविषयी कळवळा देईल. जर देवाने तुम्हांला एक शिक्षक म्हणून बोलावले असेल तर तो तुम्हांला, आंधळे केले गेलेले व फसवले गेलेले विश्वासणारे जे विजयाच्या जीवनात प्रवेश करीत नाहीत अशांबद्दल कळवळा देईल. जर आपल्याला आपली सेवा प्रभावीपणे पार पाडायची असेल तर देवाच्या हृदयाशी आपली सहभागिता त्याच्या करुणेसोबत असणे आवश्यक आहे.