लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

इब्री लोकांस पत्र ३:७,८ मध्ये आपल्याला ताकीद देण्यात आली आहे: "आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर तुम्ही आपली मने कठीण करू नका." आणि मग इब्री लोकांस पत्र ३:१२ मध्ये असे दिले आहे, "बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा." लेखक पवित्र बांधवांना जे स्वर्गीय पाचारणात सहभागी झाले आहेत त्यांना इशारा देत आहे की त्यांचा शेवट, येशू अगदी त्यांच्यासारखाच आला असे विश्वास न धरणाऱ्या दुष्ट, अविश्वासू अंतःकरणात होऊ नये यासाठी भय बाळगले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या पराभूत जीवनाला कंटाळला असाल तेव्हाच देव तुम्हांला हे प्रकटीकरण देईल की तुमचे उदाहरण होण्यासाठी येशू तुमच्यासारखा होऊन आला. एके काळी मी पूर्णपणे पराभूत झालेला ख्रिस्ती होतो. पण मी अस्वस्थ होतो आणि माझ्या पराभूत आयुष्याला कंटाळलो होतो. मी रात्रंदिवस देवाचा धावा करायचो, "प्रभुजी, उत्तर काय आहे मला माहीत नाही. मी प्रचारक आहे, पण माझ्या आंतरिक जीवनात पापामुळे माझा पराभव झाला आहे. माझ्या विचारांमध्ये, शब्दांत आणि माझ्या कौटुंबिक जीवनात माझा पराभव झाला आहे. माझा नवा जन्म झाला आहे आणि मी पाण्याने बाप्तिस्मा घेतला आहे. तरीही मी पराभूत झालो आहे. मला काय जाणून घ्यायला हवे ते मला दाखव." मग प्रभूने मला देवभिरुपणाचे रहस्य दाखवले- ख्रिस्त देहात आला आणि त्याला माझ्यासारखेच मोहाला सामोरे जावे लागले आणि तरीही तो शुद्ध जीवन जगला. मी त्यावर मनापासून विश्वास ठेवला - आणि त्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. आपल्याला इथे ताकीद देण्यात आली आहे की जर आपल्यात विश्वास न ठेवणारे हृदय असेल तर आपण देवापासून दूर जाऊ शकतो (इब्री लोकांस पत्र ३:१२).

पण दूर जाण्याऐवजी पुढचे वचन आपल्याला आणखी एक पर्याय देते: "जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा." (इब्री लोकांस पत्र ३:१३) उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आज आपण काहीतरी करू. आज आपण एखाद्याला प्रोत्साहन देऊ. आज कोणाला तरी बोध करू. या अध्यायाच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपल्यासारखे बनलेल्या येशूचा विचार करण्याचे प्रोत्साहन देणे होय.

दररोज येशूला उंचावणे हे आमचे पाचारण आहे. आपले वर्तन आणि आपले शब्द यांनी नेहमी म्हटले पाहिजे, "येशूकडे बघा. तो किती अद्भुत तारणारा आहे! त्याने माझ्या पापांची क्षमा तर केलीच, पण माझे आयुष्यही बदलून टाकले. त्याने माझे कौटुंबिक जीवन बदलले आहे, त्याने मला प्रभूच्या आनंदाने भरून टाकले आहे, जेणेकरून मी नेहमीच आनंद करू शकतो. त्याने माझ्याकडून मृत्यूची भीती हिरावून घेतली आहे. येशूचा विचार करा." आपले जीवन हे दररोज इतरांना एक आव्हान आणि प्रोत्साहन असले पाहिजे. जेव्हा लोक तुमच्या चेह-याकडे पाहतात तेव्हा तेथे त्यांना देवाचे काहीतरी वैभव दिसले पाहिजे.

इब्री लोकांस पत्र ३:१३ आपल्याला असा इशारा देते की जुन्या मार्गाकडे वळायला फक्त २४ तास लागतात. म्हणूनच आपण दररोज एकमेकांना बोध आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. ख्रिस्ताच्या शरीरात आपल्यावर एकमेकांची जबाबदारी आहे. काईन म्हणाला, "मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”(उत्पत्ती ४:९) पण ख्रिस्ताच्या शरीरात आपण आपल्या भावाचे रखवालदार आहोत, आपण आपल्या बहिणीचे रखवालदार आहोत. जर तुम्हांला कोणी घसरताना दिसले तर त्याला प्रोत्साहन द्या. जर तुम्हांला कोणी पडताना दिसले तर त्याला वर उचला.

तुम्हांला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा बोध करण्यासाठी तुमच्याकडे कोणी नसेल तर तुमच्याकडे पवित्र आत्मा आणि पवित्र शास्त्र आहे. प्रेषित पौलाने पवित्र शास्त्रामधील त्याच्या शब्दांद्वारे मला अनेक दिवस वैयक्तिकरित्या प्रोत्साहन दिले आहे व बोध केला आहे. पेत्र, याकोब आणि योहान यांनीही मला बोध केला आहे आणि प्रोत्साहन दिले आहे. अनेकदा मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या जवळ बांधव नव्हते तेव्हा हे प्रेषित पवित्र शास्त्राच्या पानांमधून माझ्याकडे आले आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिले. दररोज आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या खोलीत पेत्र, पौल आणि योहान आपल्यासोबत असू शकतात हे अद्भुत नाही का? तुम्ही त्यांना तुम्हांला प्रोत्साहित का करू देत नाही? तुम्ही त्यांना त्या पुस्तकात का कोंडून ठेवता?

पवित्र शास्त्राविषयी बोलणाऱ्या इतर सर्व पुस्तकांपेक्षा तुम्हांला पवित्र शास्त्र वाचण्याची गरज आहे. सर्व महान पवित्र शास्त्राच्या विद्वानांना पेत्र, पौल आणि योहानाच्या लिखाणाबद्दल काय म्हणायचे आहे हे मला जाणून घ्यायचे नाही. मला ते थेट ऐकायचे आहे. म्हणून मी पवित्र शास्त्रच वाचतो - आणि पवित्र शास्त्राबद्दलची पुस्तके नव्हे.