WFTW Body: 

नीतिसूत्रे ४:१२ (परिभाषित) म्हणते की, देव आपल्यासमोर टप्प्याटप्प्याने मार्ग मोकळा करेल. तुमच्या पुढच्या दोन पावलांवर काय आहे हे तुम्हांला जाणून घेण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला दिसणारे पाऊल उचला आणि मग पुढची पायरी तुम्हाला दिसेल. देव तुम्हाला असेच मार्गदर्शन करेल. तुमच्यासमोर दरवाजे बंद असल्याचे दिसून येऊ शकते. पण जसजसे तुम्ही त्यांच्याजवळ जाल तसतसे ते आपोआप उघडतील. पण तुम्ही त्यांच्या जवळ येईपर्यंत ते उघडणार नाहीत. देव तुम्हाला असेच पुढे नेईल. त्यामुळे तुमच्यासमोर दरवाजा बंद दिसला तर संकोच करू नका किंवा घाबरू नका. देव तुम्हाला दाखवतो ते पाऊल उचला आणि पुढे जा. प्रभू म्हणतो, "पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही" (प्रकटीकरण ३:८)

नीतिसूत्रे ४:१८ मध्ये असे लिहिले आहे की देव आपला मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोउत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा करेल. नवीन जन्माची तुलना येथे सूर्योदयाशी आणि ख्रिस्ताच्या येण्याची तुलना मध्यान्हाच्या सूर्याशी केली आहे . देवाची तुमच्यासाठी परिपूर्ण इच्छा अशी आहे की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, नवीन जन्मापासून ख्रिस्ताच्या परत येण्यापर्यंत ख्रिस्तासारखे बनले पाहिजे. हा नीतिमानांचा मार्ग आहे - आणि या मार्गावर, देवाच्या वचनावर अधिकाधिक प्रकटीकरण, आपल्या स्वतःच्या जीवनाच्या भ्रष्टतेवर अधिकाधिक प्रकाश आणि व्यावहारिक परिस्थिती, ज्याचा आपल्याला सामना करावा लागेल त्यासाठी अधिकाधिक शहाणपण मिळेल. या मार्गावरून चालत गेलात तर सूर्य जसा आकाशात कधीच मागे फिरत नाही, तसेच तुम्हीही कधी मागे फिरणार नाही.

देवाने आपल्याला सर्वप्रथम त्याचे उपासक होण्यासाठी बोलावले आहे - आणि याचा अर्थ त्याची एकट्याचीच इच्छा धरणे. त्यानंतर यशयाने जसे पाहिले तसे देवाचे वैभव तुम्ही पाहाल. त्यानंतर यशयाने स्वत:चा पापीपणाही पाहिला - आणि तुम्हीही पाहाल (यशया ६:१-५) तेव्हा उपासक व्हा आणि देव तुम्हाला, तुमच्या जीवनात ख्रिस्तासारखे नसणारे भाग प्रकट करतो ते धुवून टाका. देव मग तुम्हाला दररोज स्वत:च्या स्वभावात अधिकाधिक सहभागी करेल. जेव्हा आपण येशूचे गौरव देवाच्या वचनात पाहतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला वैभवाच्या एका अंशातून दुसऱ्यात बदलतो जेणेकरून आपल्यातील त्याचे वैभव दिवसेंदिवस वाढेल (२ करिंथ ३:१८). दुस-या शब्दांत सांगायचे तर, जर आपण स्वतःला पूर्णपणे आत्म्याला सादर केले, तर आपल्या जीवनावर अभिषेक काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज जास्त असेल आणि ३० वर्षांपूर्वीच्या तुलनेत कितीतरी अधिक असेल.

देवाची इच्छा रोज पूर्ण करायची असेल तर देवाचे रोज ऐकायची सवय आपण विकसित केली पाहिजे. येशूने मरियेबद्दल (लूक १०:४२) म्हटल्याप्रमाणेआपल्याला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा एक गोष्ट जास्त हवी आहे ती म्हणजे त्याचा शब्द ऐकणे. पवित्र शास्त्राच्या पहिल्याच अध्यायात आपण वाचतो की देव दररोज आपला शब्द बोलला - आणि परिणामी पृथ्वीचे दररोज थोडे थोडे रूपांतर झाले. या वर्षी ख्रिस्ताच्या समानतेत रूपांतरित व्हायचे असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे. पवित्र शास्त्र समजून घेण्याचे रहस्य म्हणजे सर्वप्रथम परमेश्वराशी जिव्हाळ्याचे संबंध असणे. पवित्र आत्मा देवाच्या वचनात त्याने काय प्रेरित केले याचा अर्थ स्पष्ट करू शकतो. म्हणून येशूबरोबर चाला, जसे सुरुवातीच्या शिष्यांनी केले आणि त्याला तुमच्याशी बोलताना ऐकण्याची तीव्र इच्छा धरा . मग तुमचे डोळे त्यांच्यासारखे उघडले जातील आणि तुमची अंतःकरणे त्यांच्यासारखी पेटतील.

आपण दररोज सर्वात जास्त वापरत असलेला आपल्या शरीराचा भाग म्हणजे आपली जीभ. येशूने आपल्या जिभेचा उपयोग इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी केला आणि अशा प्रकारे ती देवाच्या हातातील जीवनाचे साधन बनली. शिणलेल्यांना शांत करणारे सुखदायक शब्द तो बोलला ज्यामुळे त्यांची दुःखी अंतःकरणे उंचावली. आणि यशया ५०:४ आपल्याला सांगते की येशूने दररोज आपल्या पित्याचा आवाज ऐकल्यामुळेच त्याच्या मार्गामध्ये आलेल्या प्रत्येक थकलेल्या आत्म्यासाठी त्याच्याकडे असे योग्य शब्द होते. दररोज देवाचे ऐकण्याची सवय लागली तर आपल्या सभोवतालच्या थकलेल्या आत्म्यांना आपणही इतकी आशीर्वादित सेवा देऊ शकतो. जर आपण सर्व निरर्थक शब्दांचा त्याग केला आणि आपल्या दैनंदिन संभाषणात केवळ मौल्यवान शब्द बोलण्याचा निर्णय घेतला, तर देव आपल्याला त्याचे शब्द देईल आणि आपल्याला त्याचे मुख बनवेल - जसे त्याने यिर्मयाला बनवले (यिर्मया १५:१९).