लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना मत्तय २४ मध्ये त्याच्या परत येण्याविषयी सांगितले तेव्हा त्याने एकापेक्षा जास्त वेळा यावर जोर दिला की त्यांनी जागृत असले पाहिजे (मत्तय २४:४२,४४; २५:१३). आध्यात्मिकदृष्ट्या जागृत राहणे आणि नेहमी तयार असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे - भविष्यसूचक वस्तुस्थितीचे ज्ञान असणे हे नव्हे. मत्तय २५ मध्ये (जे मत्तय २४ च्या भविष्यवाणीच्या पुढे येते) येशू तीन क्षेत्रांकडे आपले लक्ष वेधतो जेथे तो आपल्याला जागृत आणि विश्वासू राहण्यासाठी व त्याच्या येण्याबाबत तयार राहण्यासाठी आपल्याला बोलावत आहे.

१. गुप्त जीवनातील विश्वासूपणा
(मत्तय २५:१-१३). या दाखल्यामध्ये येशूने दहा कुमारिका विषयी सांगितले. लक्षात घ्या की त्यांच्यापैकी कोणीही व्यभिचारिणी नव्हत्या (आध्यात्मिक व्यभिचारिणीची व्याख्येसाठी याकोब ४:४ पहा). त्या सगळ्या कुमारिका होत्या. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, लोकासमोर त्यांची चांगली साक्ष होती. त्यांचे सर्व दिवे जळत होते (मत्तय ५:१६). त्यांची चांगली कामे इतरांनी पाहिली होती. तरीही या सर्व कुमारींमध्ये फक्त पाचच शहाण्या होत्या. पण सुरुवातीला हे सर्वांना स्पष्ट झाले नव्हते. फक्त पाचजणीनी त्यांच्या भांड्यामध्ये त्यांच्याबरोबर तेल घेतले होते (मत्तय २५:४).

भांड्यामधील ते तेल रात्री दिसत नव्हते, जसा प्रकाश दिसत होता आणि ते देवासमोरच्या आपल्या गुप्त जीवनाबद्दल बोलते जे लोकांना या जगाच्या अंधारात दिसत नाही. आपल्या सर्वांकडे एक भांडे आहे. प्रश्न असा आहे की आपल्याकडे त्यात काही तेल आहे की नाही. संपूर्ण शास्त्रवचनांमध्ये पवित्र आत्म्याचे प्रतीक म्हणून तेलाचा संदर्भ दिला जातो आणि पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी संवाद साधत देवाचे जीवन सांगतो. त्या जीवनाचे बाह्य प्रकटीकरण म्हणजे प्रकाश आहे (योहान. १:४). आतील सामग्री तेल आहे. अनेकांना केवळ त्यांच्या बाह्य साक्षीने ग्रासले आहे. हा त्यांचा मूर्खपणा आहे. कसोटी आणि परीक्षेच्या वेळेस आपल्याला असे आढळते की केवळ बाह्य प्रकाश अपुरा आहे. आपल्याला विजयाकडे नेण्यासाठी दैवी जीवनातील आंतरिक सामग्रीचीही आवश्यकता असते.

"जर तुम्ही संकटात कमकुवत असाल, तर तुम्ही वास्तवात कमकुवत आहात" (नीतिसूत्रे २४:१०). आपण किती मजबूत किंवा कमकुवत आहोत हे जीवनाची संकटे आपल्याला दाखवतात. या दाखल्यात संकट हे होते की, नवरदेवाने त्याच्या येण्याला उशीर केला. काळच आपल्या अध्यात्मिकतेची वास्तविकता सिद्ध करतो. ज्याचा विश्वास आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो आणि तो तारला जातो. काळ हे ही ठरवतो की कोणाच्या जीवनात आंतरिक समाधान आहे की नाही. अनेकजण ताबडतोब उगवलेल्या बियांसारखे असतात, पण त्यांना आंतरिक जीवन नसते. त्यांच्या हृदयात खोल माती नसते (मार्क ४:५). म्हणूनच नवीन विश्वासणार्‍या लोकांचे मूल्यांकन त्यांच्या अध्यात्मिकतेवरुन किंवा त्यांच्या मनःपूर्वकतेकडून करणे कठीण आहे. जर आपल्याकडे वाट पाहण्याचा धीर असेल तर काळ सर्व काही उघड करेल. मग, ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार होण्याचा मार्ग म्हणजे देवाच्या मुखासमोर शुद्धता आणि विश्वासूपणाचे आंतरिक जीवन असणे - आपल्या विचारांमध्ये, मनोवृत्तीत आणि हेतूंमध्ये, जे आपल्या सभोवतालच्या लोकांना दिसत नाही. जर आपल्याकडे हे नसेल, तर ख्रिस्ताच्या येण्यासाठी आपण तयार आहोत असे समजून आपण स्वतःलाच फसवत आहोत.

२. आपल्या सेवाकार्यातील विश्वासूपणा
(मत्तय २५:१४-३०). दुसऱ्या दाखल्यात देवाकडून आपल्याला मिळालेल्या रूपयांच्या विश्वासू वापरावर भर दिला आहे. हे रुपये संपत्ती, पैसा, नैसर्गिक क्षमता, जीवनातील संधी, आध्यात्मिक कृपादाने इत्यादींचे प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी सर्व एक समान नाहीत - कारण आपण दाखल्यात पाहतो की एकाला पाच, एकाला दोन आणि आणखीन एकाला फक्त एक रुपया मिळाला. पण सर्वांना जे मिळाले होते त्याच्याशी विश्वासू राहण्यासाठी समान वेळ मिळाला होता. ज्याला जास्त देण्यात आले , त्याच्याकडून अधिक अपेक्षा ही करण्यात आली. म्हणून ज्याने आपल्या दोनाचे चार केले त्याला ज्याने पाचाचे दहा केले तसेच पारितोषिक मिळाले. पण ज्याने आपल्या रुपयाला 'जमिनीत' पुरले त्याच्यावर शिक्षा आली (मत्तय २५:१८) - हा तो आहे ज्याने देवाने दिलेले रुपये देवासाठी नव्हे तर या जगासाठी वापरले. त्याला काहीच मिळाले नाही असे कोणीही म्हणू शकत नाही - कारण सर्वांना देवाकडून काहीतरी दाने मिळालेलीच आहेत. प्रश्न असा आहे की आपण या दानांचा कशासाठी वापर करतो. आपण स्वत: साठी जे वापरतो ते दान जमिनीत पुरलेल्या रुपया समानच आहे. आपण केवळ देवाच्या वैभवासाठी जे दान वापरतो तेच सर्वकाळचे वैभव म्हणून गणले जाईल. या मापदंडानुसार आपण बहुसंख्य विश्वासू लोकांचे दारिद्र्य पाहू शकतो. आपले ब्रीदवाक्य "सर्व देवासाठी आणि स्वत: साठी काहीही नाही" हे असले पाहिजे. मग आपण ख्रिस्ताच्या आगमनासंबंधांने तयार असू. जर आपण आपल्याकडे जे काही आहे ते सर्व सोडले नाही तर आपण येशूचे शिष्य होऊ शकत नाही. जो देवाने दिलेली मालमत्ता आणि कृपादाने देवासाठी वापरत नाही, तर ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या संबंधांने तयार असल्याचा दावा करणारा स्वत:चीच फसवणूक करतो.

३. आपल्या सहविश्वासू बांधवांची सेवा करण्यात विश्वासूपणा
(मत्तय २५:३१-४६). शेवटच्या भागात, येशू आपल्या सहविश्वासणार्‍यांच्या गरजांकडील आपला दृष्टिकोनाबद्दल सांगतो. ती गरज आध्यात्मिक किंवा भौतिक असू शकते. येथे आपण पाहतो की काहींना राज्याचा वारसा मिळाला आहे कारण त्यांनी आपल्या सहविश्वासू लोकांची प्रभूला म्हणून सेवा केली. त्यांची सेवा इतकी गुप्त होती की त्यांचा उजवा हात काय करत आहे हे त्यांच्या डाव्या हाताला माहित नव्हते (मत्तय ६:३). इतके की, प्रभू जेव्हा त्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टीची आठवण करून देतो, तेव्हा त्यांना ते आठवतही नाही! (मत्तय २५:३८). येशूने येथे असेही शिकवले की, आपल्या बांधवांपैकी लहानात लहान बांधवांची आपण जी सेवा करतो ती त्याला केल्यासारखी मानली जाते (मत्तय २५:४०) .हे महत्त्वपूर्ण आहे की तो येथे लहानात लहानाबद्दल बोलतो, कारण आपली मनोवृत्ती गरीब आणि तुच्छ लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि सर्वात महत्वाच्या विश्वासणार्‍यांची सेवा करण्याकडे असते! जे लोक खाण्या-पिण्यात, खरेदी-विक्रीत आणि स्वत:साठीच बांधकाम आणि लागवडीच्या व्यापात आहेत, ते येशू परत आल्यावर नक्कीच मागे राहतील (लूक. १७:२८,३४). ज्यांच्या प्रभूच्या सेवेमध्ये, आपल्या सहविश्वासणार्‍या लोंकांची प्रेमळपणाने घेतलेल्या काळजीचा समावेश होतो, त्यांनाच उचलून घेतले जाईल. दुसऱ्या एका उताऱ्यात येशूने आणखी एका लोकसमूहाबद्दल सांगितले - जे या गटाच्या विरुद्ध आहेत. परमेश्वराच्या नावाने त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. ते ही न्यायासाठी उभे राहणार आहेत आणि ते प्रभूला आठवण करून देतात की त्यांनी भुते काढली, प्रचार केला ,आजार्‍यांना येशूच्या नावाने बरे केले, इत्यादी. पण या सर्व गोष्टी जरी त्यांनी केल्या असल्या तरी त्यांना प्रभूने नाकारले, कारण पहिली गरज ती म्हणजे देवासमोर असलेले गुप्त पवित्र जीवन त्यांच्यात नव्हते. त्यांना त्यांच्या आत्म्याच्या दानांच्या महानतेने ग्रासले होते.