WFTW Body: 

दावीद स्तोत्र २७:४ मध्ये म्हणतो, "परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन."

दावीद हा एक महान राजा होता. तो श्रीमंत होता, त्याने अनेक लढाया जिंकल्या होत्या आणि त्याची ख्याती मोठी होती. तरीही तो म्हणाला, "मी समाधानी नाही. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. मी संपूर्ण जगाचा राजा बनलो पाहिजे, किंवा मी एक महान उपदेशक बनलो पाहिजे, किंवा मी खूप प्रसिद्ध झालो पाहिजे असे नाही. पण मला परमेश्वराच्या एका गोष्टीची इच्छा आहे की मी माझ्या परमेश्वराचे मनोहर रूप पाहावे आणि आयुष्यभर मी त्याच्या मनोहर रूपाला अधिकाधिक निरखत राहावे". आपल्याही जीवनाची हीच एक इच्छा आहे का?

योहान अध्याय २० मध्ये आपण आणखी एका व्यक्तीबद्दल वाचतो जिला ही एकच इच्छा होती. ती मरीया मग्दालीया होती. ती त्या रविवारी सकाळी खूप लवकर कबरेकडे गेली. त्यावेळी ती का झोपली नव्हती? अंधार असतानाच इतक्या लवकर ती का उठली आणि कबरेकडे का गेली? कारण तिच्या आयुष्यात एक इच्छा होती आणि ती म्हणजे तिच्या प्रभूला पाहणे. आपण वाचतो की जेव्हा ती कबरेकडे आली तेव्हा तिला ती रिकामी सापडली. म्हणून ती धावत गेली आणि तिने इतर काही शिष्यांना सांगितले. तेही आले आणि त्यांनी कबरेत पाहिले आणि नंतर ते त्यांच्या घरी परतले, कदाचित पुन्हा झोपण्यासाठी.

पण मरीया मग्दालीया रडत कबरेच्या बाहेर उभी राहिली होती. तुम्ही पहा, शिष्यांची प्रभूवर मरियेप्रमाणे प्रीती नव्हती. शिष्यांनी रिकामी कबर पाहिली तेव्हा ते पुन्हा झोपी गेले. पण मरिया असे करू शकली नाही, कारण येशू तिच्यासाठी सर्वकाही होता. देवाला आज, मंडळीमध्ये अशा लोकांची गरज आहे. जेव्हा प्रभू येशू मरीया मग्दालीयेकडे आला तेव्हा तिला वाटले की तो माळी आहे आणि म्हणून ती त्याला म्हणाली, "दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन." (योहान २०:१५) मृतदेह वाहून नेण्याचीही तिची तयारी होती. आता तुम्हाला माहीत आहे की, एखाद्या स्त्रीला मृतदेह वाहून नेणे जवळजवळ अशक्यच असेल. पण प्रभुवरची तिची प्रीती इतकी मोठी होती की, ती त्याच्यासाठी कोणतेही कष्ट सोसण्यास तयार होती. "परमेश्वराचे मुख शोधणे" याचा हाच अर्थ आहे. याचा अर्थ एकच इच्छा असणे - परमेश्वराचे मनोहर रूप पाहणे - आणि दुसरे काही नाही. माझ्यासाठी या जगात मी श्रीमंत माणूस असणे किंवा महान माणूस असणे यात मला रस नाही, तर दिवसेंदिवस माझ्या प्रभूचे मनोहर रूप अधिकाधिक पाहत राहणे यात मला रस आहे.

मला एका विधवेच्या घरी भेट देणाऱ्या एका माणसाची गोष्ट आठवते. ती खूप गरीब स्त्री होती, पण ती परमेश्वरावर प्रीती करत होती. तिला चार-पाच मुले होती आणि ती एका अगदी लहानशा मातीच्या झोपडीत राहत होती. त्या माणसाने तिला विचारले, तुमचे घर इतके आनंद आणि शांतीने भरलेले आहे हे कसे काय ? तुमच्याकडे तर फार पैसे नाहीत. तुमची सर्व मुले अर्धी उपाशी आहेत, तरीही ते नेहमीच हसतमुख असतात. तुमच्या घरात खूप अडचणी आणि आजार आहेत आणि तरीही तुम्ही नेहमीच आनंदी आहात. तुमच्या जीवनाचे गुपित काय आहे? तिने उत्तर दिले, "येशू ख्रिस्त हा माझ्यासाठी सर्व काही आहे. मला या जगात आणखी कशाचीही गरज नाही."

प्रियांनो,जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी सर्व काही झाला तर आपणही तिच्यासारखे होऊ.