लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

"कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे." (योहान.६:३८). इथे येशू आपल्याला त्याच्याच शब्दांत तो पृथ्वीवर काय करायला आला हे सांगतो. आणि हे एक वाक्य येशूच्या पृथ्वीवरील संपूर्ण जीवनाच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन करते. नासरेथमधील येशूच्या जीवनाच्या तीस वर्षांना छुपी वर्षे असे म्हणतात. पण त्या ३० वर्षांच्या प्रत्येक दिवसात त्याने काय केले हे येशू सांगतो. त्याने स्वत:ची इच्छा नाकारली आणि त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली.

येशू अनंत काळापासून स्वर्गात पित्यासोबत होता तेव्हा त्याला स्वतःची इच्छा कधीच नाकारावी लागली नाही, कारण त्याची स्वतःची आणि त्याच्या पित्याची इच्छा सारखीच होती. पण जेव्हा तो आपल्या शरीरात पृथ्वीवर आला तेव्हा त्या देहाची एक स्व-इच्छा होती जी प्रत्येक टप्प्यावर पित्याच्या इच्छेच्या अगदी विरुद्ध होती. येशूला आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे सतत स्व-इच्छेचा नाकार. येशूने त्याच्या पृथ्वीवरील संपूर्ण जीवनात हाच क्रूस वागवला होता- त्याच्या स्वत:च्या इच्छेला वधस्तंभी खिळणे - आणि आज जर आपल्याला त्याच्या मागे जायचे असेल तो आपल्यालाही हा क्रूस वागवायला सांगतो. स्वतःच्या इच्छेचा सातत्याने नकार केल्यामुळेच येशू आध्यात्मिक मनुष्य बनला. आणि आपल्या स्व-इच्छेच्या नकारामुळेच आपणही आध्यात्मिक बनू.

देवाशी झालेल्या एका भेटीतून आध्यात्मिकता मिळत नाही. स्व-इच्छेचा नाकार करून दिवसेंदिवस, आठवड्यानंतर आठवडे आणि वर्षानुवर्षे सातत्याने देवाची इच्छा पाळण्याचा परिणाम म्हणजे आध्यात्मिकता होय. दोन भावांचा, त्यांचे परिवर्तन झाल्याच्या दहा वर्षांनंतर आध्यात्मिक स्थितीचा विचार करा (दोघेही एकाच दिवशी ख्रिस्ताकडे आले). एक आता आध्यात्मिक समजूतदार असलेला एक परिपक्व बंधू आहे, ज्याच्यावर देव मंडळीमध्ये जास्त जबाबदारी सोपवू शकतो. दुसरे अद्याप एक विवेकबुद्धी नसलेले मूल आहे, आणि सतत इतरांकडून त्याला आध्यात्मिक आहार आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. काय आहे ज्यामुळे या दोघांमध्ये असा फरक झाला आहे? उत्तर असे आहे: त्यांनी आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या दहा वर्षांच्या प्रत्येक दिवसात घेतलेले लहानसहान निर्णय.जर अशाच प्रकारे पुढे चालू राहिल्यास, आणखी १० वर्षांमध्ये, त्यांच्यामधील फरक आणखी स्पष्ट होईल. आणि अनंतकाळपर्यंत, त्यांचे वैभवाचे भिन्न अंश २०००-वॅट बल्ब आणि ५-वॅट बल्बद्वारे उत्सर्जित केलेल्या प्रकाशाइतके भिन्न असतील !! "ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात" (१ करिंथकरांस पत्र १५: ४१).

अशा परिस्थितीचा विचार करा जिथे तुम्ही एखाद्या घरी जाता आणि उपस्थित नसलेल्या एका विशिष्ट बांधवाबद्दल (जो तुम्हांला आवडत नाही) तुम्हांला काहीतरी नकारात्मक बोलण्याचा मोह होतो. तुम्ही काय करता? तुम्ही त्या प्रलोभनांना व एखाद्याच्या पाठीमागे बोलण्याला बळी पडाल, की तुम्ही स्वतःला नाकारून तोंड बंद ठेवाल? एखाद्याबद्दल वाईट बोलल्यामुळे देव कोणालाही एकाएकी कुष्ठरोग किंवा कर्करोगाने ग्रासत नाही. नाही. आणि म्हणूनच पुष्कळांना असे वाटते की अशा पापामुळे आपले जीवन उद्ध्वस्त होणार नाही. अरेरे, पुष्कळ बंधुभगिनींना हे सार्वकालिकतेमध्येच कळेल की जेव्हा जेव्हा त्यांनी स्वतःला संतुष्ट केले तेव्हा त्यांनी स्वतःचा थोडा थोडा नाश केला. मग त्यांनी पृथ्वीवर आपले जीवन ज्या प्रकारे वाया घालवले त्याबद्दल त्यांना पस्तावा होईल.

येशूही नासरेथमध्ये ३० वर्षे अशाच परिस्थितीत मोहाला सामोरा गेला. त्या छुप्या वर्षांबद्दल असे लिहिले आहे की, "कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही." (रोमकरांस पत्र १५:३). तो नेहमीच स्वत:ला नाकारत असे. अशा प्रकारे त्याने पित्याला सदैव संतुष्ट केले. स्वत:ला जीवनाच्या अनेक क्षेत्रांत संतुष्ट करता येते - उदाहरणार्थ, खाण्याच्या क्षेत्रात. अशा परिस्थितीचा विचार करा जेव्हा तुम्हांला भूक लागली नसली तरी खाण्यासाठी काही चविष्ट नाश्ता विकत घेण्यासाठी तुम्ही काही पैसे खर्च करण्याचा निर्णय घेता. त्यात नक्कीच पाप किंवा चुकीचे काहीच नाही. पण ते एका विशिष्ट जीवनशैलीबद्दल सांगते. तुमच्याकडे पैसे असल्यामुळे तुम्हांला जे आवडते ते तुम्ही विकत घेता, मग त्याची तुम्हांला गरज असो वा नसो. स्वत:ला जे खूष करते ते तुम्ही करता. जर तुम्हांला एखादी वस्तू विकत घ्यावीशी वाटत असेल तर तुम्ही ती विकत घेता. जर तुम्हांला कुठेतरी जावे असे वाटत असेल तर तुम्ही जाता. जर तुम्हांला उशिरा झोपावे वाटत असेल तर तुम्ही उशिरा झोपता. जरी तुम्ही नियमितपणे सभांना जात असाल आणि दररोज पवित्र शास्त्र वाचत असाल तरी असे जगण्याचा शेवटी काय परिणाम होतो? तुम्ही कदाचित तुमचे तारण गमावणार नाही, पण देवाने तुम्हांला त्याच्यासाठी जगण्यासाठी दिलेले एक जीवन तुम्ही नक्कीच वाया घालवाल.

आणखी एक बांधव मात्र वेगळ्या पद्धतीने वागतो. तो आपल्या शरीराला शिस्त लावण्याचा निर्णय घेतो. जेव्हा त्याला भूक लागलेली नसताना विनाकारण काहीही न खाण्याचा निर्णय घेतो. तो स्वतःसाठी कधीही अनावश्यक वस्तू विकत न घेण्याचा निर्णय घेतो. देवासोबत वेळ घालवण्यासाठी तो दररोज १५ मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय घेतो. जेव्हा कोणी त्याच्याशी रागाने बोलतो तेव्हा तो सौम्यपणे उत्तर देण्याचा निर्णय घेतो. तो नेहमी प्रेमात आणि चांगुलपणात राहायचे ठरवतो. आपल्या वासना उत्तेजित करणारी वर्तमानपत्रांतील काही सदरे न वाचण्याचा निर्णय तो घेतो. प्रत्येक परिस्थितीत तो स्वतःला लीन करण्याचा निर्णय घेतो आणि स्वत:चे समर्थन न करण्याचा निर्णय घेतो. काही मैत्रीसंबंधांचा जे त्याला जगाकडे वळवतात त्यांचा तो त्याग करण्याचे ठरवतो. सतत स्वतःची इच्छा (ज्यामुळे त्याला आनंद होतो) नाकारण्याचा निर्णय घेण्याद्वारे केवळ देवाला संतुष्ट करण्याच्या त्याच्या इच्छेत तो खंबीर बनतो. ती अनावश्यक वस्तू विकत न घेतल्याने किंवा १५ मिनिटे आधी अंथरुणातून बाहेर पडण्याद्वारे किंवा आपली मानवी प्रतिष्ठा सोडून क्षमा मागितल्याने त्याने काय गमावले? काही नाही. पण त्याला काय मिळाले आहे याचा विचार करा! अशा प्रकारचा माणूस, जो काही वर्षांत लहान गोष्टींमध्ये सातत्याने विश्वासू असतो तो देवाचा विश्वासू माणूस बनेल- त्याच्याजवळ असलेल्या पवित्र शास्त्राच्या ज्ञानामुळे नव्हे, तर जीवनात घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांतील विश्वासूपणामुळे जे स्वतःला नव्हे तर देवाला संतुष्ट करण्यासाठी घेतले.त्यावेळी कमजोर होऊ नका. तुमच्या इच्छेचा देवाला सदैव संतुष्ट करण्यासाठी वापर करा.

परिपक्व ख्रिस्ती असे आहेत "ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.(अनेक वर्षे त्यांच्या इच्छेचा योग्य दिशेने वापर करण्याने)" (इब्री लोकांस पत्र ५:१४). तुम्ही देवाचे खरे पुरुष/स्त्री बनाल हे पक्के ठरवा.