लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर शिष्य
WFTW Body: 

आपण इतर धर्मांच्या आणि त्यांच्या मूर्तींच्या विरोधात त्यांचे नाव घेऊन बोलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण त्यांची चेष्टाही करू नये. येशू अशा गोष्टींबद्दल कधीच बोलला नाही. तो बरेचदा खऱ्या देवाला जाणण्याचा दावा करणाऱ्यांच्या ढोंगीपणाविषयी बोलत असे.

प्रेषित पौलाचे उदाहरण विचारात घ्या: इफिसमध्ये असताना आणि त्याने तडजोड न करता जेव्हा सत्याचा प्रचार केला तेव्हा शहरात मोठा गोंधळ उडाला. शेवटी शहराच्या महापौरांनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, "कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत." (प्रेषितांची कृत्ये १९:३७). पौलाने ख्रिस्ताचा प्रचार केला. परंतु इफिसमधील लोक ज्या खोट्या देवांची उपासना करत होते त्यांचा त्याने धिक्कार केला नाही. त्याचा संदेश सकारात्मक होता - की ख्रिस्त त्यांना त्यांच्या पापांपासून वाचवू शकेल. त्यांच्या खोट्या दैवतांवर आणि त्यांच्या मूर्तींवर टीका करणारा हा नकारात्मक संदेश नव्हता. ते दैवी शहाणपण होते. एकदा का एखादी व्यक्ती ख्रिस्ताकडे आली की, त्यांना त्यांच्या मूर्तींपासून मुक्त करण्याचे काम स्वतः परमेश्वर करील.

हेच शहाणपण आपल्यालाही हवे आहे. आपण कोणत्याही धर्मावर, त्याच्या श्रद्धांवर किंवा त्याच्या प्रथांवर टीका करू नये. हा आमचा संदेश नाही. आम्ही फक्त ख्रिस्ताचा प्रचार करतो - येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी वधस्तंभावर चढला, मेलेल्या लोकांमधून उठला, आज स्वर्गात जिवंत आहे आणि लवकरच जगाचा न्याय करण्यासाठी परत येणार आहे. हाच आमचा संदेश आहे - आणि आम्ही प्रत्येकाला त्यांच्या पापांपासून दूर जाण्याचे आणि ख्रिस्ताला आपला प्रभु आणि तारणारा म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करतो. पण आम्ही कोणालाही तसे करायला भाग पाडत नाही. हाच उपदेश आपण केला पाहिजे - अगदी लहान मुलांनाही. आपण त्यांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे आमंत्रण दिले पाहिजे, त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. देव प्रत्येकाला स्वातंत्र्य देतो. आपण लोकांनाही स्वातंत्र्य दिले पाहिजे. जेव्हा लोक ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात स्वीकारतील तेव्हा त्यांच्या जीवनातील इतर खोट्या गोष्टी कालांतराने हळूहळू नष्ट होतील, कारण पवित्र आत्मा त्यांना पापाबद्दल खात्री करील.

ख्रिस्ताला जगाचा एकमेव तारणारा म्हणून घोषित करणे हे आपले पाचारण आहे. आपणही पापाविरुद्ध बोलले पाहिजे आणि स्वत:चा न्याय केला पाहिजे आणि सर्वात आधी आपल्यातील ढोंगीपणा उघड केला पाहिजे. आवेशी पण अविचारी अशा पुष्कळ बंधुभगिनी कधीकधी आपल्या शब्दांतून व त्यांच्या प्रार्थनांमधून इतर धर्मांची नावे विनाकारण घेतात. अशा लोकांना ते जे बोलतात त्यात सावधगिरी बाळगण्याचा इशारा आपण दिला पाहिजे. कोणत्याही विशिष्ट धर्माचे नाव वापरण्यापेक्षा "ख्रिस्तीतर" असे बोलणे चांगले आहे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा धिक्कार करण्यासाठी नव्हे तर त्याचे तारण करण्यासाठी जगात पाठविले (योहान ३:१७). येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणे हे आपले पाचारण आहे आणि म्हणून आपण नेहमी इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचा धिक्कार करण्याचा नव्हे.