लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

इब्री लोकांस पत्र १:९ हे एक असे वचन आहे ज्यात येशू, मनुष्य या नात्याने पृथ्वीवर कसा जगला हे दाखवते : "तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.”

येशू पृथ्वीवर राहत होता तेव्हा तो आपल्या मानवांच्या सर्व मर्यादांसह जगला. त्यामुळे त्याला अभिषिक्त होण्याची गरज होती. पित्याला अभिषेकाची गरज नाही. आणि स्वर्गात असताना येशूला अभिषेकाची गरज नव्हती. पण जेव्हा तो पृथ्वीवर राहत होता तेव्हा आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून त्याला अभिषिक्त व्हावे लागले. देवाने येशूला आपल्यापेक्षा, त्याच्या सोबत्यांपेक्षा अधिक हर्षाच्या (आनंदाच्या) तेलाने अभिषिक्त का केले हे या वचनात आपल्याला सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने एका कारणामुळे - त्याला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट होता. त्याला शुद्धता प्रिय होती आणि त्याला पापाचा वीट होता.

न्यायीपणाने वागणे आणि न्यायीपणावर प्रीती करणे यांत फरक आहे. मूल आपल्या वडिलांच्या आज्ञा, आज्ञापालनाची आवड नसतानाही पाळू शकते. येशू केवळ न्यायाने वागला नाही, तर त्याला न्यायीपणाची आवड होती. त्याचप्रकारे, येशूने केवळ पाप टाळले नाही. त्याने पापाचा द्वेष केला.

आजकाल लोकांना लैंगिक पापातून होणारा एड्स हा एक जीवघेणा रोग आहे. त्यामुळे एड्स होण्याच्या भीतीने अनेकजण जारकर्म करत नाहीत. ते लैंगिक पापाचा द्वेष करतात असे नाही ; त्यांना फक्त एड्स होण्याची भीती वाटते. त्याचप्रमाणे चोरी करू इच्छिणारे अनेक जण असे करत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की ते पकडले जाऊ शकतात- ते चोरीचा द्वेष करतात म्हणून नाही. त्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणतेही पाप त्याचा द्वेष न करता टाळू शकता.

पण जर तुम्हांला आनंदाच्या तेलाने अभिषिक्त व्हायचे असेल तर तुम्हांला न्यायीपणावर प्रीती आणि पापाचा द्वेष करावा लागेल. वरील वचनात असे म्हटले आहे की, याच कारणामुळे येशूला इतरांपेक्षा अधिक, हर्षरुपी तेलाने अभिषिक्त करण्यात आले.

देवाजवळ पक्षपातीपणा नाही. एक चांगला पिता आपल्या मोठ्या मुलाला इतर मुलांपेक्षा जास्त अनुकूल वागणूक देणार नाही- त्याच्याशी पक्षपातीपणा करणार नाही. तो आपल्या मोठ्या मुलासाठी जे करेल तेच तो आपल्या सर्व मुलांसाठी करेल. देवपिताही तसाच आहे. येशूला अनेक बांधवांचा ज्येष्ठ बंधू म्हटले जाते. आपण नवा जन्म झालेले त्याचे धाकटे भाऊ आहोत. येशू थोरला पुत्र आहे. देव पक्षपाती नसल्यामुळे त्याने आपला थोरला पुत्र येशू याच्यासाठी जे काही केले ते तो आपल्यासाठीही करेल.येशूने ज्या अटींची पूर्तता केली त्याच अटींची मी पूर्तता केली तर देवाने येशूसाठी जे काही केले ते तो माझ्यासाठीही करेल. ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाविषयी जाणून घेताना सापडलेले हे एक महान सत्य आहे.

येशू देवाचा पुत्र असल्यामुळे येशूला हर्षरुपी तेलाने अभिषिक्त करण्यात आले असे लिहिले असते तर त्याने आपल्याला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन किंवा आव्हान दिले नसते. पण न्यायीपणावर प्रीती केल्यामुळे आणि पापाचा द्वेष केल्यामुळे त्याला अभिषेक करण्यात आला हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला अशी आशा मिळते की, जर आपण न्यायीपणावर प्रीती केली आणि पापाचा द्वेष केला तर आपणही त्याच पद्धतीने अभिषिक्त होऊ शकतो. म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे, "प्रभू , पवित्र आत्म्याद्वारे माझ्या अंतःकरणात काम कर, जेणेकरून मी केवळ न्यायीपणाने वागेन इतकेच नव्हे तर त्यावर प्रीती करेन; आणि मी केवळ पाप टाळेन असे नाही तर त्याचा द्वेष करेन."

आपल्या जीवनात आपण न्यायीपणावर जितकी जास्त प्रीती करू आणि पापाचा द्वेष करू तितके आपण पवित्र आत्म्याच्या आनंदाने भरून जाऊ. पवित्र आत्म्यात नीतिमत्त्व व आनंद असलेले देवाचे राज्य येऊन आपले हृदय भरेल (रोमकरांस पत्र १४:१७). मग आपल्याला "प्रभूमध्ये सर्वदा आनंद" (फिलिप्पैकरांस पत्र ४:४) या आज्ञेचे पालन करण्यास सक्षम केले जाईल.