लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रकटीकरण २२:२ मध्ये आपण वाचतो – “नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात.” आपल्याला उत्पत्ति २ आणि प्रकटीकरण २२ यांच्यात बरेच साम्य आढळते. जीवनाचे झाड स्वतः देवाच्या जीवनाचे प्रतीक आहे - सार्वकालिक जीवन किंवा दैवी स्वभाव ज्याचे आपण आता भागीदार होऊ शकतो. सार्वकालिक जीवन, याचा अर्थ "कायम अस्तित्वात असणे" असा नाही कारण अग्नीच्या सरोवरात जाणारेही कायम अस्तित्वात असतात. पण त्यांना सार्वकालिक जीवन नसते. सार्वकालिक जीवन म्हणजे असे जीवन ज्याला सुरुवात नव्हती आणि ज्याचा अंतही नाही. ते स्वतः देवाचे जीवन आहे. तेच जीवनाच्या झाडाचे प्रतीक आहे. आदाम मूर्खपणे जीवनाच्या झाडाऐवजी ज्ञानाच्या झाडाकडे गेला ज्याप्रमाणे आजही अनेकजण जीवनापेक्षा पवित्र शास्त्राच्या ज्ञानाचा शोध घेतात. बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाड प्रकटीकरण २२ मध्ये आढळत नाही. ते नाहीसे झाले आहे. जीवनाच्या झाडासमोर देवाने एक ज्वालारूपी तलवार ठेवली (उत्पत्ति ३:२४). हे आपल्याला शिकवते की, जर आपल्याला जीवनाच्या झाडाचे सहभागी व्हायचे असेल तर प्रथम आपल्या स्वतःच्या जीवनावर तलवार पडली पाहिजे. म्हणूनच बहुतेक ख्रिस्ती लोक ज्याच्यासमोर तलवार नाही अशा ज्ञानाच्या झाडाकडे जाणे पसंत करतात. पवित्र शास्त्राचे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला स्वजीवनाला मरण्याची किंवा दररोज क्रूस उचलण्याची गरज नाही. पण देवाच्या दैवी स्वभावाचे भागीदार होण्यासाठी आपल्याला सर्वदा "येशूचे मरण आपल्या शरीरात वागवावे लागते" (२ करिंथकरांस पत्र ४:१०).आपल्याला तलवार आपल्यावर पडू दिली पाहिजे. क्रूसाचा मार्ग म्हणजे जीवनाच्या झाडाकडे जाणारा मार्ग आहे. ही तलवार येशूवर पडली आणि त्याला क्रूसावर चढवण्यात आले. आम्हीही त्याच्याबरोबर क्रूसावर चढलो , त्यामुळे आमच्यावरही तलवार पडणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण जीवनाच्या झाडात सहभागी होऊ शकतो, जे दर महिन्याला एक नवीन प्रकारचे फळ धारण करते आणि ज्याची पाने आरोग्य आणतात.

प्रकटीकरण २२:७ मध्ये आम्ही वाचतो - ‘पाहा, मी त्वरेने येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो सुखी. प्रभू इथे म्हणत नाही की तो लवकरच येणार आहे. नाही. तो म्हणतो की तो त्वरेने येत आहे - अचानक- रात्री चोरासारखा, कोणताही इशारा न देता.

प्रकटीकरण २२:८,९ मध्ये आम्ही वाचतो - हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्‍या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला,“असे करू नकोस;मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.” ज्या व्यक्तीचा उपयोग देवाने ही सर्व सत्ये शिकवण्यासाठी केला होता , त्या व्यक्तिला समजण्यास योहाना कडून चूक झाली. तो या सर्व गोष्टी दाखवणाऱ्या देवदूताच्या भक्तिभावाने पाया पडला. पण देवदूत पटकन म्हणाला, "तसं करू नकोस. मी फक्त तुझा सोबतीचा दास आहे. फक्त देवाला नमन कर". देवाच्या खऱ्या सेवकाची ही एक खूण आहे की, जेव्हा जेव्हा तो कोणालाही त्याच्याशी जोडलेला पाहतो, तेव्हा तो त्या व्यक्तीपासून त्याच वेळी स्वत:ला अलिप्त करतो, जेणेकरून ती व्यक्ती परमेश्वराला चिकटून राहू शकेल आणि माणसाला नाही! स्वर्गात ते फक्त एकच गाणे गातात - नवीन गाणे - म्हणत,"फक्त तू योग्य आहेस". या देवदूताने ते गाणे शिकले होते आणि म्हणून त्याने योहानाला झटकन बाजूला केले आणि त्याला फक्त देवाला गौरव देण्यास सांगितले.

प्रकटीकरण २२:११ मध्ये आपण वाचतो - जो अन्याय करणारा आहे तो पुढे अन्याय करो आणि जो मलिन आहे तो पुढे मलिन होवो आणि जो न्यायी आहे तो पुढे न्यायीपन करो, आणि जो पवित्र आहे तो पुढे पवित्र होवो. पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पानावर आपल्याला हा एक आश्चर्यकारक उपदेश आपल्याला सापडतो. हे लोकांना "अन्याय करणे " आणि "मलिन होणे " चालू ठेवण्यास सांगते. याचा अर्थ असा आहे: "जर तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र वाचले असेल आणि शेवटच्या पानावर आला असाल आणि तरीही तुम्हाला पश्चात्ताप करायचा नसेल किंवा पाप सोडायचे नसेल, तर पुढे जा आणि मलिन व्हा आणि अन्याय करीत रहा. तुमच्यासाठी कोणतीही आशा नाही".

प्रकटीकरणाच्या पुस्तकात जर पापाबद्दल देवाचा न्याय वाचून सुद्धा तुम्हाला अजूनही आपल्या वासनेत गुंतायचे आहे आणि पापातून मिळणार्‍या आनंदाच्या मागे जायचे आहे, आणि घाणेरडी पुस्तके वाचायची आहेत आणि अश्लील चित्रपट पाहायचे आहेत, जर तुम्हाला अजूनही एखाद्याविरूद्ध आपली कटुता टिकवून ठेवायची असेल आणि क्षमा करायची नसेल, जर तुम्हाला अजूनही निंदा आणि चहाडी करायची असेल आणि मत्सर वाटत असेल आणि स्वत: साठी व कुजलेल्या जगासाठी जगायचे असेल,तर पुढे जा आणि ते करा. देव तुम्हाला थांबवणार नाही. पण वचन ११ च्या दुसऱ्या भागात नीतिमानांसाठी काय लिहिले आहे ते पहा. "जो न्यायी आहे तो पुढे न्यायीपन करो, आणि जो पवित्र आहे तो पुढे पवित्र होवो.” या पवित्रतेच्या पाठलागाला कधीही अंत नसतो. म्हणून धार्मिकता आणि पवित्रता यांचा अधिक पाठपुरावा करा.ज्या स्थितीत आपण आपले जीवन संपवतो ते आपले अनंतकाळ आपण कसे व्यतीत करू ते निश्चित करेल. जर आपण पाप आणि मालिनते मध्ये राहिलो, तर आपण अग्नीच्या सरोवरात अनंत काळासाठी पाप आणि मालिनते मध्ये आणि चुकीच्या गोष्टींमध्ये राहू. जर आपण या जीवनात नीतिमत्ता आणि पवित्रतेचा पाठपुरावा केला असेल, तर तो अनंतकाळामध्येही आपला पाठपुरावा असेल. जेव्हा आपण मरु तेव्हा आपली स्थिती अनंतकाळासाठी निश्चित केली जाणार आहे. "झाड जर दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे पडले तर ज्या स्थानी झाड पडेल तेथेच ते राहील" (उपदेशक ११:३).

प्रकटीकरण २२:२१ मध्ये आपण वाचतो - "प्रभू येशूची कृपा सर्वाबरोबर असो. आमेन." देवाच्या शब्दाचा शेवट कसा होतो हे पाहणे आश्चर्यकारक आहे. आपण केवळ कृपेनेच नवीन येरूशलेमचा भाग होऊ शकतो. देवाने दिलेल्या सामर्थ्याने आणि मदतीमुळेच आपण इतकी वर्षे आपल्याला गुलाम बनवणाऱ्या बंधनांपासून मुक्त होऊ शकतो .कृपा आपल्या पापांची क्षमा करते! आणि कृपा आपल्याला पाप, जग आणि सैतानावर मात करण्यास मदत करते! या शब्दाचा विरोधाभास जुन्या कराराच्या शेवटच्या शब्दाशी करा - जो "शाप" आहे. मलाखी.४:६ मध्ये देव म्हणतो, "तर कदाचित मी येइन आणि पृथ्वीला शापाने हाणीन". नवीन कराराची सुरुवात येशूच्या जन्माने होते आणि "आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा सर्वांबरोबर असो " या आशीर्वादाने संपते.हे किती आश्चर्यकारक आहे की जुना करार जो शापाने संपतो त्याच्या पासून आपण मुक्त होवू शकतो नव्या करारात अनुग्रहाद्वारे, आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात देवाचा आशीर्वाद अनुभवू शकतो आणि सर्व अनंत काळ देवाच्या निवासस्थानाचा भाग बनू शकतो. हॅलेलुयाह! सर्व गौरव आणि स्तुती आणि सन्मान देवाला आणि आपल्या पापासाठी मारल्या गेलेल्या कोकराला असो. आमेन आणि आमेन!