लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर शिष्य
WFTW Body: 

ख्रिस्ताच्या शरीराची तुलना रुग्णालयाशी केली जाऊ शकते. जेव्हा एखादा माणूस आजारी असतो आणि रुग्णालयात जातो, तेव्हा त्याला मदत करण्यासाठी रुग्णालयात विविध विभाग असतात. कदाचित त्याला इंजेक्शन किंवा फिजिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेची गरज असते. त्याला नेत्रतज्ञ किंवा कानाच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज असू शकते. त्यामुळे रुग्णालयाचे विविध विभाग असतात. डोळ्यांचा डॉक्टर आपला सगळा वेळ फक्त लोकांच्या डोळ्यांकडे तपासण्यात घालवतो आणि इतर काही नाही. मानवी शरीराचे इतर भाग महत्त्वाचे नाहीत असे त्याला वाटते म्हणून नाही, तर डोळा या क्षेत्रातच तो तज्ञ असतो म्हणून. ख्रिस्ताच्या शरीरातही प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला एक वेगळे दान आणि पाचारण असते. आणि प्रत्येकजण स्वत:मध्ये असंतुलित असतो. या पृथ्वीवर झालेला एकमेव पूर्णपणे संतुलित माणूस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आपल्यापैकी बाकीचे सर्व - अगदी आपल्यातील सर्वोत्तम देखील - असंतुलित आहेत. प्रभूच्या रुग्णालयात सुद्धा इतर विभागांबरोबर - इतर बंधू-भगिनींबरोबर एकत्र काम करूनच आपण आपला समतोल साधू शकतो. त्यामुळे या रुग्णालयामध्ये व्यक्तिवादाला जागा नाही!

लोकांच्या विविध गरजा भागविण्यासाठी चांगल्या रुग्णालयात अनेक विभाग असतील. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या शरीरातही विविध प्रकारची सेवाकार्ये आणि लोकांना मदत करण्यासाठी अनेक आध्यात्मिक दाने आहेत. कोणत्याही मंडळी किंवा गटाकडे आत्म्याची सर्व दाने नाहीत. पण ख्रिस्ताच्या एकूण शरीरात ते सर्व आहेत. शरीरात आपले स्वतःचे विशिष्ट पाचारण काय आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे.

जग आध्यात्मिकदृष्ट्या आजारी लोकांनी भरलेले आहे. आणि कोणाचेही प्रकरण आशाहीन नाही. प्रभू प्रत्येकाला पूर्णपणे बरे करू शकतो. आपण जाहीर केलेल्या शुभवर्तमानाची ही चांगली बातमी आहे. सर्वात वाईट पापी आणि सर्वात विपरीत बुद्धीची व्यक्ती प्रभूच्या रुग्णालयात बरी होऊ शकते. चांगले रुग्णालय गंभीर आजारी व्यक्तीला कधीही दूर करणार नाही. निकृष्ट रुग्णालये असे करतात कारण ते गंभीर प्रकरणे हाताळण्यास सुसज्ज नाहीत. त्याचप्रमाणे एक चांगली मंडळी जगातील सर्वात मोठ्या पापी माणसालाही कधीही सांगणार नाही की त्याचे प्रकरण आशाहीन आहे!

एक चांगली मंडळी सर्वात वाईट पापी माणसाला सर्वात महान संतामध्ये बदलू शकेल - जर पापी दिलेले उपचार घेण्यास तयार असेल. आपण मंडळीची तुलना मानवी शरीराशीही करू शकतो. मानवी शरीरात प्रत्येक भागाचे विशिष्ट कार्य असते; आणि तो भाग केवळ स्वत:चे कार्य पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. परंतु तो वेगवेगळी कार्ये असलेल्या इतर भागांचे कौतुक करतो , किमंत जाणतो आणि त्या भागांना सहकार्य करतो. ख्रिस्ताच्या शरीरातील इतर सेवा करणाऱ्यांबरोबर एकत्र काम करताना देखील असेच असले पाहिजे. १ करिंथ१२ मध्ये पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या शरीरात आत्म्याची दाने कशा प्रकारे वापरली जातात याचे चित्रण करण्यासाठी डोळे, कान, हात आणि पाय यांचे उदाहरण वापरतो.

मी पवित्र शास्त्रामधील काही गोष्टींवर वारंवार भर देतो. कारण प्रभूने मला हेच ओझे दिले आहे. मी मला ज्या सेवेसाठी बोलावले आहे त्या सेवेला चिकटून राहिलो आहे, कारण मला माहित आहे की ही एकमेव सेवा आहे ज्यात मी परमेश्वराला उपयुक्त ठरू शकतो. मी आणखी काही करण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्यासाठी असलेल्या परमेश्वराच्या योजनेला निष्फळ करेन. पण मी इतर सेवांच्या विरोधात नाही. मी त्यांना खूप महत्त्व देतो. पोट हाताला खूप किमंत देते, पण हात जे करतो ते करण्याचा प्रयत्न ते कधीच करत नाही. उदाहरणार्थ, ते ताटातून अन्न उचलण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. ते हाताला करू देते आणि नंतर हाताने उचललेले आणि खाली पाठवलेले अन्न पचवण्याचे स्वतःचे काम करते! ख्रिस्ताच्या शरीरात आपण एकमेकांना कसे पूरक आहोत याचे हे चित्र आहे. बहुतेक विश्वासणाऱ्यांनी शरीरातील विविध सेवांचे हे सत्य पाहिले नाही. पण जर तुम्हाला हे सत्य दिसले नाही, तर देवाला जे काही साध्य करायचे आहे ते तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही. देवाने आपल्याला कशासाठी बोलावले आहे हे आपल्या सर्वांच्या मनात स्पष्ट असणे चांगले आहे. परमेश्वर आपल्याला आपल्या हृदयात जे ओझे देतो ते सहसा त्याच्या शरीरात आपल्यासाठी असलेल्या सेवेचे द्योतक असते. ख्रिस्ताच्या शरीरात तुमची एक वेगळी आणि अद्वितीय सेवा आहे जी इतर कोणीही पूर्ण करू शकत नाही. आणि ती सेवा कधीही संतुलित नसेल. ती असमतोल असेल. शरीरात वेगवेगळ्या सेवा असलेल्या इतरांसोबत सहभागितेमध्ये काम करून आपल्याला आपला समतोल शोधावा लागेल. देव आपल्याला नम्र ठेवतो - आपल्याला इतरांवर अवलंबून ठेवून. परमेश्वराची स्तुती करा! आपण सर्व जण आपल्या आयुष्यातील काही क्षेत्रांमध्ये मजबूत आहोत, परंतु इतर क्षेत्रांमध्ये कमकुवत आहोत - जसे एखादा विद्यार्थी इंग्रजीत चांगला आणि गणितात कमकुवत असू शकतो. परंतु आपण कोठे कमकुवत आहोत हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि ती क्षेत्रे मजबूत केली पाहिजेत. आपली मंडळी धर्मप्रचारावर भर देण्यात मजबूत असू शकते परंतु पवित्रतेवर भर देण्यात कमकुवत असू शकते. जर असे असेल, तर आपल्या मंडळीने स्वत: ला कोणत्या प्रकारच्या सेवेसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे हे आपल्याला माहित आहे.