परमेश्वराने आईची रचना केली

लेखक :   डॉ एनी पुनन श्रेणी :   महिला घर
  Download Formats:

धडा
एक वैयक्तिक पत्र जे तुम्ही वाचलेच पाहिजे

प्रिय मातांनो,

मागील काही वर्षांपासून अनेक मातांनी मला जे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हे पुस्तक लिहीत आहे.

हे पुस्तक आईसाठी लिहिलेले आहे, जिला आत्मिक मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज आहे.

परमेश्वराच्या एका सेवकाची पत्नी म्हणून गेल्या ३० वर्षांपासून त्याने मला कृपा पुरवली आहे. सुवार्ता सांगण्यासाठी माझे पती बऱ्याचदा घरापासून दूर असायचे. परमेश्वराच्या कार्यासाठी तडजोड न करणारा, असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे आमचे कुटुंब कायम सैतानाच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु आज आम्ही साक्ष देऊ शकतो कि आम्ही सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यावर मात केलेली आहे, आणि हे केवळ परमेश्वराच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे. परमेश्वर तुमच्यासाठी ही असेच करेल ह्यावर तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी हे तुम्हाला प्रोत्साहीत करण्यासाठी सांगत आहे.

परमेश्वराने माझ्यावर अनुग्रह केला आहे, मी चार मुलांची आई आहे. आता ती सगळी मोठी झाली आहेत. फक्त परमेश्वराच्या कृपेमुळेच त्यांनी येशूला प्रभू आणि त्यांचा तारणारा म्हणून स्विकारले आहे आणि आज ते सगळे परमेश्वराच्या मार्गात चालत आहेत.

एक तज्ञ (Expert) म्हणून मी हे लिहीत नाही परंतु एक अशी आई जिने संघर्ष केला आहे, अनेकदा अयशस्वी सुद्धा झाले, पण पुन्हा उठून ह्या शर्यतीत पुढे निघाले आणि माझ्या लक्षात आले आहे कि जीवनातील सर्व कठिण प्रसंगी परमेश्वर खरोखर " संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो" (स्त्रोत्रसंहिता ४६:१)

एक मेडिकल डॉक्टर असल्यामुळे मी ह्या पुस्तकाच्या शेवटी काही व्यावहारिक सल्लेही दिले आहेत.

एक सर्वात महान गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांकरिता करु शकता आणि ती म्हणजे तुम्ही त्यांना परमेश्वराच्या मार्गात चालायला शिकवू शकता. जेणेकरुन ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्विकारतील. आणि ह्यामुळे हे सुनिश्चित होऊ शकेल कि तुम्ही आणि तुमची मुले एकत्रितपणे सार्वकालिक जीवन व्यतित करु शकाल. जेंव्हा तुमची मुले लहान असतात तेंव्हाच तुम्ही तारण प्राप्त करण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले पाहिजे. कारण एकदा का ती मोठी झाली कि कदाचित ती लहान असताना जसा प्रतिसाद देण्यास तयार असत, तसा प्रतिसाद देणार नाहीत.

एका लहान लेकराला नेहमीच रात्रीच्या वेळी त्याची आई जवळ हवी असते. म्हणून जेंव्हा आपण आपल्या लेकराला बिछान्यावर झोपवतो तेंव्हा लगेच तिथून निघून जाण्याची घाई करु नये. प्रत्येक लेकरासोबत व्यक्तिगतरीत्या काही वेळ व्यतीत करावा किंवा सगळ्या लेकरांना एकत्र घेऊन त्यांच्याशी परमेश्वराच्या बाबतीत बोलावे.

झोपायच्या वेळी लहान लेकरे नेहमीच आत्मिक गोष्टींसाठी खूप छान प्रतिसाद देतात.

त्यांच्यासाठी प्रभूची गीते गा उदहारणार्थ:- ("जसा मी आहे निराधार... देवाच्या प्रिय कोकरा")

नंतर त्यांना एक लहान गोष्ट सांगावी, येशूने सांगितलेला एखादा दृष्टांत किंवा गोष्टीच्या पुस्तकातील काही गोष्टी सांगाव्यात आणि मग त्यांच्या सोबत ह्या प्रकारे प्रार्थना करावी:

"प्रिय प्रभू येशू, आजच्या दिवसासाठी मी तुझे आभार मानतो की तू आम्हाला जेवण दिलेस, चांगले आरोग्य दिलेस, चांगले आई - वडील, भाऊ बहिण दिलेस आणि खूप काही चांगल्या गोष्टी देऊन आशिर्वादित केले आहेस. कृपा करुन माझ्या सर्व पापांची क्षमा कर आणि तुझ्या रक्ताने, जे तू कालवरीच्या क्रुसावर माझ्यासाठी सांडले आहेस त्याने माझे हृदय शुद्ध कर. प्रभू येशू माझ्या हृदयात ये, आणि आज पासून मला तू तुझे मूल बनव, माझी प्रार्थना ऐकलीस म्हणून धन्यवाद देतो.

येशूच्या नावाने मागतो आमेन".

जी लहान लेकरे परमेश्वराचे भय मानणाऱ्या परिवारात वाढतात, ती अशी प्रार्थना बऱ्याच वेळा करतात. परंतु कधीतरी जेंव्हा त्यांची स्वतःची काही गरज असेल तेंव्हा ते ती प्रार्थना मनापासून करतील आणि मग त्यामुळे ते परमेश्वराशी जोडले जातील आणि त्यानंतर ती फक्त तुमची मुले नसतील तर ती परमेश्वराचीही मुलं होतील आणि तो तुमचा सगळ्यात मोठ्ठा आनंद असेल.


डॉ. ॲनी झॅक पूनेन

ऑक्टोबर १९९८


धडा 1
एक प्रथम श्रेणीतली आई

हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस, आणि मी आजपर्यंत तुझी अद्भूत कृत्ये वर्णन केली आहेत. पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा मला सोडू नकोस (स्तोत्र ७१:१७, १८)

परमेश्वरासमोर आपल्या सगळ्या मातांवर ही एक महान जबाबदारी आहे कि परमेश्वराने जे काही आपल्याला शिकवले आहे, ते सगळे आपण आपल्या मुलांना सुपूर्त करायचे आहे. असे केल्याशिवाय आपण हे जग सोडता कामा नये. मुले मोठी होईपर्यंत आपली ही जबाबदारी पुढे ढकलणे आपल्याला परवडणार नाही. आपली मुले अगदी लहान असतानाच परमेश्वराने आपल्यासाठी ज्या काही अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांना सांगायला सुरुवात केली पाहिजे. तिमथ्याची आजी लुईस हिने तिचा "निष्कपट विश्वास" नक्कीच तिची मुलगी युनिके हिच्याकडे लहान असतानाच सोपविला. म्हणून युनीकेने तिचा मुलगा तीमथ्थी ह्याच्याकडे तो अगदी लहान असतानाच सोपविला असणार (२ तीमथ्थी १:५) त्याचा परिणाम म्हणून तीमथ्थी मोठा होऊन परमेश्वराचा एक अतिशय उत्कृष्ट सेवक बनला. ह्या दोन विश्वासू मातांनी मंडळीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे महान सेवा पार पाडली.

मुलांचे पालनपोषण करण्याचे असे कोणतेही जादूई सूत्र नसते, कारण प्रत्येक मूल हे दुसऱ्यापेक्षा वेगळे असते. परंतु तुम्ही हे विसरता कामा नये कि तो परमेश्वरच आहे ज्याने तुम्हाला तुमच्या मुलांची आई होण्यासाठी निवडले आहे. तो परमेश्वरच आहे ज्याने प्रत्येक मुलाला तुमच्या गर्भाशयामधे रचले आहे - आणि त्या प्रत्येकाला एका उद्देशासाठी तयार केले आहे. आणि त्याने तुम्हाला त्यांची आई म्हणून नियुक्त केले आहे. आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिलेली ही जबाबदारी तुम्ही खूप गांभीर्याने घेतली पाहिजे आणि परमेश्वरासाठी आणि मुलांसाठी सर्वकाही त्याग करण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

संतती ही आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे, आणि आपण केवळ परमेश्वराच्या सामर्थ्याने आणि त्याच्या बुद्धीनेच त्यांना योग्य रीतीने वाढवू शकतो. आपण असा विश्वास ठेवलाच पाहिजे की परमेश्वर आपल्या मुलांकरिता अद्भुत कार्य करणार आहे.

स्तोत्रासहित १२७:४ हे वचन सांगते की, "तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत ". आणि बाण हे वीरांद्वारे शत्रूंवर सोडण्याकरिता वापरले जातात. आपण जर परमेश्वरामध्ये आपल्या मुलांना योग्य प्रकारे वाढवले तर आपण त्यांच्याद्वारे सैतानाला लज्जित करु शकतो !

दुसरीकडे, जर आपण विश्वासयोग्य नसलो तर आपली मुले मोठी झाल्यावर सैतानाची सेवा करणारे बनतील, कारण स्वाभाविकरित्या त्यांचा भ्रष्ट मानवी स्वभाव ह्याच दिशेकडे वळतो. परंतु जर आपण त्यांना परमेश्वराचा आदर करण्यास शिकविले, आणि त्यांना परमेश्वराच्या वचनाच्या सिद्धांतानुसार मार्गदर्शन केले तर ते परमेश्वराच्या सैन्यातील सैनिक असे तयार होतील. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि आपण कधीही ती सहजरीत्या घेऊ नये.

स्तोत्रसंहिता १२७ पुढे असे सांगते की अशा मुलांचे माता-पिता वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाहीत (वचन ५). पवित्र शास्त्र सांगते की तू बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे, परमेश्वराने आपल्या वैरी आणि सूड घेणाऱ्यांना कुंठीत करावे म्हणून असे केले आहे (स्तोत्रसहित ८:२)

तर आपल्या मुलांच्याद्वारे सैतान लज्जित होवो आणि परमेश्वराच्या नावाला गौरव मिळो !

आणि जेंव्हा आपल्या मुलांचे भले होते, तेंव्हा त्यासाठी आपण सर्व गौरव परमेश्वरालाच मिळावे ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण इतक्या विश्वासू माता आहोत म्हणूनच आपली मुले परमेश्वराला अनुसरत आहेत अशी कल्पना करीत, आपण त्याचे कुठलेही गौरव स्वत:ला घेऊ नये.

आपला अभिमान केवळ परमेश्वरामध्ये, आणि त्याने जे काही केले आहे त्यामध्येच असावा. अगदी आपल्या विचारांमध्ये सुद्धा आपण स्वतःला त्यापैकी कुठलेही गौरव घेऊ नये.

परमेश्वर त्याच्या प्रेमाची तुलना आईचे तिच्या मुलांवर जे प्रेम असते त्याच्याशी करीत आहे (यशया ४९:१५) कारण सर्व स्री - पुरुषांच्या निर्माणकर्त्या अशा परमेश्वराला हे ठाऊक आहे की पृथ्वीवर आईचे प्रेमच त्याच्यासारख्या दैवी, त्यागमय, निस्वार्थी प्रेमाच्या जवळपास जाते.

एक जुनी म्हण आहे कि परमेश्वराने लहान मुलांना तो स्वतः कसा आहे हे दाखविण्यासाठी आईला निर्माण केले आहे.

एक आई म्हणून आपल्यासमोर असे आव्हान आहे की आपल्या मुलांना आपले घर इतके आनंददायी वाटले पाहिजे की ते इतर कुठल्याही जागेला प्राधान्य देणार नाहीत. ते कुठेही असले तरी त्यांना कायम आपल्या घराची ओढ असेल.

परमेश्वर उत्कृष्ट आई होण्यासाठी आपली मदत करो, जेणे करुन जेंव्हा ते आपले निरीक्षण करतील तेंव्हा त्यांना परमेश्वर कसा आहे हे दिसू शकेल, आणि जेंव्हा ते आपल्या घराचे निरीक्षण करतील तेंव्हा त्यांना स्वर्ग कसा आहे हे दिसू शकेल.


एक प्रथम श्रेणीतील आई होणे हे किती मोठ्ठे आव्हान आहे!

प्रिय प्रभू, मी मागत नाही तुझ्याकडे

कि तू सोपवावे मला तुझे काही महान काम,

काही महान पाचारण, किंवा काही अद्भूत कामगिरी,

दे मला माझ्या हातात धरण्यासाठी एक चिमुकला हात,

दे मला एक लहान मूल, ज्याला मी दाखवू शकेन मार्ग

अनोख्या मार्गातून, तुझ्याकडे घेऊन जाणारी मधुर वाट,

दे मला एक छोटासा आवाज ज्याला शिकवू शकेन मी प्रार्थना

दे मला तुझे मुख पाहण्यासाठी, दोन चमकणारे डोळे,

परिधान करण्यासाठी मुकुट मी जो मागते, प्रिय प्रभू तो केवळ

हाच असो ; की मी शिकवू शकेन एका लहान मुलाला.

मी मागत नाही की मी कधी उभे रहावे

बुद्धीमान, योग्य किंवा महान लोकांमध्ये;

मी केवळ मागते तो मऊ, हातात हात,

मी आणि एक मूल, तुझ्या द्वारातून प्रवेश करायला


(अज्ञात कवी)


धडा 2
आपला विवेक संवेदनशील ठेवणे

जर आपल्या मुलांना परमेश्वराच्या भयामध्ये वाढवायचे असेल तर, आई म्हणून एक अतिशय महत्वाची गोष्ट जी आपल्यामध्ये असली पाहिजे, ती म्हणजे एक संवेदनशील विवेक.

जर आपल्या आत्मिक स्थितीबाबत आपण कोणत्याही क्षणी संतुष्ट झालो तर आपला विवेक असंवेदनशील होऊ शकतो. कदाचित आपण वचन इतक्या वेळेस ऐकलेले असते की आता आपण त्याच्याशी पूर्णपणे परिचित झालेले असतो. आणि मग वचनाद्वारे पवित्र आत्मा आपल्याशी जे बोलतो ते आपल्याला ऐकू येत नाही आणि आपला विवेक मंद होऊन जातो. जे सत्य आधी आपल्याला उत्तेजित करीत होते, ते आता करु शकत नाही, कारण आता ते एका अशा सुरीसारखे बनलेले असते ज्याची धारच बोथट झाली आहे.

आपण भौतिक धनसंपत्तीशी जोडले गेल्यामुळेही आपला विवेक असंवेदनशील होऊ शकतो. जेंव्हा आपण भौतिकरित्या समृद्ध होतो तेंव्हा आपला विवेक सहजपणे मंद होत जातो. श्रीमंत असण्यापेक्षा जेंव्हा आपण गरिब असतो, तेंव्हा परमेश्वराची गरज भासणे आपल्यासाठी अधिक सोप्पे असते. अगदी आपल्या पतीच्या पगारातील थोडीशी वाढही आपल्याला गर्वाने भरु शकते. येशूने म्हंटले की, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. (मत्तय १९:२४) परमेश्वराने एका मंडळीतील वडिलांनाही ह्यासाठीच फटकारले होते कारण ते म्हणतात की मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही. (प्रकटीकरण ३:१७) संपत्ती एक मोठा सापळा आहे. म्हणून जेंव्हा आपण भौतिकरित्या समृध्द होऊ लागतो तेंव्हा आपल्याला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. जर परमेश्वराने आपल्याला श्रीमंत केले असेल तर असे असणे चुकीचे नाही. पण ती संपत्ती आपल्या डोक्यात जाऊन आपला विवेक मंद करणार नाही हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. आत्म्यात दीन असणे ह्या मनस्थितीत सदैव असणे हे सर्वात उत्तम आहे.

एक आई म्हणून आपल्यामध्ये प्रामाणिकपणाचा गुण असणे हे फार आवश्यक आहे. आपल्या मुलांना तो आपल्यात कायम दिसला पाहिजे. आपण स्वतः आपल्या मुलांसोबत खरेपणाने वागून त्यांना खरेपणा शिकवला पाहिजे. सर्व प्रकारचे असत्य आणि प्रत्येक प्रकारची बढाई आपण आपल्या जीवनातून दूर केली पाहिजे. जर आपण आपल्या मुलांना बढाई मारताना किंवा खोटे बोलताना ऐकले तर ही सवय त्यांनी आपल्याकडूनच उचलली असण्याची शक्यता आहे ! आपल्या मुलांना असे कोणतेही वचन देऊ नये जे आपल्याला ठाऊक असते कि आपण पूर्ण करु शकणार नाही. जर टाळता न येणारी काही परिस्थिती असेल तर आपली मुले ते समजून घेतील कारण अशी परिस्थिती कायम येत असते ज्यामध्ये आपल्या स्वतःला इतरांसाठी नाकारावे लागते. नाहीतर अशा काही कारणां व्यतिरिक्त आपण आपल्या मुलांना दिलेली सगळी वचने पूर्ण करायला हवीत.

सर्व प्रकारच्या ढोंगीपणा पासून('नाटकी'पणापासून) आपण स्वतःला दूर ठेवले पाहिजे. आपल्या मुलांना असे दिसले पाहिजे की आपण स्वतःच करीत नाही असे काहीही आपण त्यांना करायला सांगत नाही. ह्या क्षेत्रात आपण कुठे चुकतो का हे आपल्याला दाखवावे असे आपण परमेश्वराला विचारले पाहिजे जेणेकरुन आपण पश्चाताप करु शकू. अगदी जेंव्हा आपल्या मुलांमध्ये आपल्याला ढोंगीपणा दिसतो तेंव्हाही परमेश्वर आपल्याबरोबर बोलू शकतो.

लोभ हे‌ आणखी एक प्राणघातक पाप आहे ज्या पासून आपल्याला शुद्ध होण्याची गरज आहे. परमेश्वराने आपल्या गरजेनुसार ज्या ऐहिक वस्तू आपल्याला दिल्या आहेत त्यामध्ये आपण संतुष्ट नाही हे जर आपल्या मुलांनी पाहिले तर मग ते सुद्धा लोभी बनतील. आपली आई काय खरेदी करते आणि काय खरेदी करण्याची इच्छा बाळगते ह्याचे (खासकरुन) मुली अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करतात.

जर आपल्याकडे काहीतरी असावे अशी परमेश्वराची इच्छा असेल तर ते विकत घेण्यासाठी तो आपल्याला पैसे सुद्धा देईल. परंतु जर त्याने तसे केले नाही, तर ही त्याची आपल्याला सांगण्याची पद्धत असते कि आपल्याला त्याची खरंच गरज नाही आहे. जरी आपल्याला ते परवडत असले, तरी देखील ते अगदी आवश्यक नसू शकते. आणि मग ते आपल्याजवळ नसावे हे उत्तम आहे.

पृथ्वीवरील सर्व वस्तू एकत्र केल्या तरी त्यापेक्षा एक चांगला विवेक खूप अधिक मौल्यवान असतो. आपल्या मुलांसाठी आपल्याला परवडणारी स्वस्त खेळणी, आणि गेम्स विकत घेतली कि आपली मुले त्यातून संतुष्ट रहायला शिकतील. ते त्यांच्या खेळणीत अजून सुधारणा करायलाही शिकतील. पुढे जाऊन ही मुले, ज्या मुलांच्या पालकांना त्यांना महागडी, आधुनिक खेळणी आणि गेम्स देणे परवडते त्या मुलांपेक्षा अधिक सृजनशील मुले बनतील.

एखाद्याची निंदा किंवा एखाद्याच्या पाठीमागे काही वाईट बोलू नये ह्याचे आपण आपल्या घरात भान बाळगले पाहिजे. मी अशी एक दुख:द गोष्ट पाहिली आहे कि विश्वासणारे लोक आपल्या घरात आपल्याच मंडळीतील इतर विश्वाणाऱ्यांची निंदा करतात, ज्याचा परिणाम म्हणजे त्यांची मुले सुद्धा त्या विश्वासणाऱ्यांचा तिरस्कार आणि निंदा करतात. अशाप्रकारे आई वडीलच आपल्या मुलांच्या मनात विष कालवून त्यांचा नाश करतात ही किती मोठी शोकांतिका आहे ! निश्चितच हे अशा प्रकाराचे आई वडील आहेत ज्यांच्याबद्दल येशू असे म्हणाला होता की " माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्यात त्याचे हित आहे" (मत्तय १८:६). आईने ह्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण आईच आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते.

जर आईच्या मनात एखाद्याच्या बाबतीत कटूपणा असेल तर मुलांच्या ते सहज लक्षात येते. थोडासा आंबटपणा किंवा थोडेसे दही भांडयातील पूर्ण दुधाला आंबट करु शकते. आणि आंबटपणाला कडवटपणामध्ये बदलायला वेळ लागत नाही. बायबल आपल्याला चेतावणी देते की पुष्कळजण मनातील कटुतेच्या मुळांमुळे भ्रष्ट होऊ शकतात. म्हणूनच आपल्याला अशा सर्व वाईट दृष्टिकोणापासून शक्य तितक्या लवकर सुटका करुन घेतली पाहिजे.

आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्यात जवळच्या नात्यांमध्ये सुध्दा गैरसमज निर्माण होऊ शकतात. परंतु परमेश्वराच्या मदतीने आपण त्वरित त्यापासून सुटका करुन घेतली पाहिजे.

अगदी लहान मुलांनाही बरे आणि वाईट, संगीत आणि गोंगाट, सुसंवाद आणि संघर्ष ह्या मधील फरक जाणवतो. ते बोलायला सुरु करण्याच्या खूप आधीपासून ह्या गोष्टी समजू लागतात. तेंव्हा त्यांचे मन कलुषित न करण्याविषयी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

आपण सर्व पक्षपातीपणा पासून स्वतःला शुद्ध राखले पाहिजे. आपण आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करु नये. ती सगळी आपल्यासाठी एकसारखी आणि एकसमान मौल्यवान असली पाहिजेत. कुठल्याही मुलाला विशेष प्रकारची वेगळी वागणूक देऊ नये

आपल्या मुलांचे सौंदर्य, बुद्धिमत्ता, चांगुलपणा, किंवा इतर काही गोष्टींविषयी गर्व करणे हे देखिल एक पाप आहे ज्याची आपण खूप खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या मुलांच्या जीवनातील कुठल्याही गोष्टींविषयी जर आपण अभिमान बाळगत असू तर आपण त्यांचा नाश करत असतो. ज्याक्षणी आपल्याला गर्व येतो, त्याक्षणी लुसिफराचा स्वभाव आपल्याला नियंत्रित करतो. लुसिफर एक सुंदर देवदूत होता, पण जेंव्हा त्याच्यात गर्व शिरला तेंव्हा तो क्षणार्धात सैतान बनला.

आपल्या मुलांचे योग्य प्रकारे पालनपोषण करण्यामागे आपले स्वतःचे गौरव करणे हा आपला उद्देश नसावा ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. जर असे झाले तर आपल्या मुलांच्या ते लगेच लक्षात येईल आणि ती सुद्धा केवळ दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच करतील. आपण आपल्या मुलांना केवळ परमेश्वराच्या गौरवासाठीच जगण्यास शिकवले पाहिजे.

तर अशा जीवनासाठी आपण परमेश्वराकडे कृपेची मागणी करावी म्हणजे " देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करु आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू (2 करिंथ ७:१) जेणेकरुन आपण आपला विवेक जीवनाच्या अखेरपर्यंत संवेदनशील राखू शकू.


धडा 3
मुलांना परमेश्वराच्या वचनाची आणि प्रार्थनेची आवश्यकता असते

परमेश्वराने इस्राएली लोकांना सांगितले की त्यांनी आपल्या मुलांना त्याच्या विषयी शिकवावे - "आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव, आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्याविषयी बोलत जा" (अनुवाद ६:७)

ह्यावरुन आपण हे शिकतो कि आपल्या मुलांना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक प्रसंगी आत्मिक सिद्धांत शिकवणे फार महत्वाचेआहे.

आजकाल अतिशय खेदाची गोष्ट ही आहे कि विश्वासू आई - वडिलांची मुले देखील अशी कृत्ये करु लागली आहेत जी अविश्वासणाऱ्यांची मुले सुद्धा करणार नाहीत, ह्याचे कारण काय आहे? त्यांचे आई वडील त्यांना परमेश्वराचे शिक्षण देण्यामध्ये अपयशी ठरले आहेत का???. मला माहित नाही आणि मला कुणाचा न्यायही करायचा नाही. त्यापेक्षा मी त्या माता पित्यांसाठी सहानुभूती व्यक्त करते आणि त्यांना प्रोत्साहित करु इच्छिते कि अजूनही परमेश्वर चमत्कार करु शकतो आणि त्यांच्या मुलांमध्ये बदल घडवू शकतो ह्या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवावा. आपण आपल्या सभोवतालच्या पराभूत झालेल्या लोकांपासून धडा शिकावा. नाहीतर आपण सुद्धा त्याच चुका करु आणि आपल्या मुलांना त्या निस्तराव्या लागतील.

फक्त परमेश्वराच्या वचनाद्वारे आणि प्रार्थनेद्वारेच आपण आपल्या मुलांना ह्या अनर्थापासून वाचवू शकतो. ह्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

जोपर्यंत त्यांना स्वत:ला वाचता येत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी ''चित्रांचे पवित्रशास्त्र'' Picture Bible वाचून दाखवणे ही एक चांगली सवय आहे, कारण नंतर त्यांना ते स्वत:हून वाचण्याची गोडी लागेल. वचनांचे पाठांतर करायला प्रोत्साहन देणे ही आणखी एक चांगली सवय आपण आपल्या मुलांना लावू शकतो. आणि त्यामुळे पवित्र शास्त्रातील वचने पाठ करण्याचा आपल्यासाठीही हा एक उत्तम मार्ग असू शकतो.

जर आपण आपल्या मुलांबरोबर सतत परमेश्वराबद्दल आणि त्याच्या वचनांबद्दल बोलत राहिलो, तर आपण त्यांच्याशी संभाषण करण्याचा मार्ग खुला करतो. मग जर ते शाळेतून किंवा मित्रांकडून काही वाईट सवयी किंवा शब्द शिकून आले असतील, तर मग ते शब्द आणि त्या सवयी सोडून देण्यासाठी आपण त्यांना मदत करु शकतो.

पवित्र शास्त्रात निषिद्धअसलेल्या गोष्टींपासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवले पाहिजे. उदहारणार्थ:- आपण कुठल्याही अन्यजातीच्या सणांमध्ये आपल्या मुलांना नेऊ नये, आणि आपण स्वत: सुद्धा तिथे जाऊ नये. आपण आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांसोबत कुठलेही विधर्मी सण साजरे करु देऊ नयेत, उदाहरणार्थ दिवाळी सारख्या सणामध्ये आकाश कंदील लावणे, फटाके वाजवणे इत्यादी.

त्याचप्रकारे, परमेश्वराच्या दृष्टीने लहान मुलांचा बाप्तिस्मा करणे हे चुकीचे आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तेंव्हा लहान मुलांच्या बाप्तिस्म्याला आपण आपल्या मुलांना जाऊ देऊ नये, अगदी ते आपले नातेवाईक असले तरीही. आपण जोपर्यंत आपल्या मुलांना अंधकाराच्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहायला शिकवणार नाही, अगदी मित्र आणि नातेवाईकांना नाराज करावे लागले तरीही, तोपर्यंत आपली मुले परमेश्वराच्या आदरयुक्त भयात आणि वचनात वाढणार नाहीत. जर आपल्याला आपल्या नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर आपण इतर कुठल्याही दिवशी त्यांना भेटायला जाऊ शकतो.

आपण आपल्या मुलांना हे शिकवले पाहिजे कि परमेश्वराच्या सगळ्या आज्ञा त्यांच्या भल्यासाठी आहेत आणि म्हणून त्यांनी आनंदाने त्यांचे पालन केले पाहिजे. आपण आपल्या मुलांना प्रेमाने आणि आदराने परमेश्वराच्या वचनाचे आज्ञापालन करण्यास शिकवले पाहिजे - ते पकडले जातील किंवा त्यांना शिक्षा होईल ह्या भीतीने नव्हे !

प्रार्थना ही एका गोधडी सारखी आहे ज्याद्वारे आपण आपल्या मुलांना झाकून घेऊ शकतो. जसे आपण हिवाळ्यातील थंडीत रात्रीच्या वेळेस आपल्या मुलांकडे लक्ष देतो कि त्यांना व्यवस्थित पांघरलेले, झाकलेले आहे कि नाही, तसेच ह्या थंड जगात आपल्या प्रार्थनांद्वारे ते सुरक्षित आहेत ना ह्याकडेही आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. ते जिथे कुठे असतील शाळेमध्ये किंवा आपल्या पासून दूर, त्या वेळेसही ते आपल्या प्रार्थनेने झाकलेले असले पाहिजेत. सैतानाने जो सापळा त्यांना फसविण्याकरिता रचला आहे त्यापासून ते सुरक्षित राहावेत म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करायला पाहिजे.

आपण आपल्या पतीबरोबर एकतेमध्ये राहून परमेश्वराच्या ह्या अभिवचना नुसार प्रार्थना केली पाहिजे.

तसेच मी तुम्हाला सांगते की "पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल " (मत्तय१८:१९)

आपण आपल्या पतीसोबत एकमत होऊन नेहमी प्रार्थना केली पाहिजे कि आपल्या मुलांचा नविन जन्म व्हावा आणि त्यांनी येशूचे अंतःकरणापासून शिष्य बनावे. आपल्या पतीच्या आणि आपल्या मध्ये सैतानाला आपण कोणत्याही प्रकारे कधीच शिरकाव करु देऊ नये. नाहीतर सैतानाला आपल्या मुलांवर हल्ला करण्याची संधी मिळते. स्वत:ला आणि आपल्या सर्व मुलांना दररोज वेदीवर समर्पित करण्याची आपल्याला आवश्यक्यता आहे.

कुटुंब म्हणून रोज आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना करणे फार महत्वाचे आहे. पण सकाळच्या वेळेला बऱ्याचदा आपल्याला हे शक्य होत नाही. कारण सकाळी आपण मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करण्याच्या किंवा इतर काही कामाच्या घाईगडबडीत असतो. तेंव्हा मुलांसाठी परमेश्वराकडून मार्गदर्शन आणि संरक्षण मिळण्यासाठी केलेली छोटीशी प्रार्थना सुद्धा पुरेशी असते. आणि जर एखादी महत्वाची गोष्ट असली तर आपण त्यावेळी त्यासाठीही प्रार्थना करु शकतो. परंतु संध्याकाळच्या, रात्रीच्या वेळेस आपण एकत्र काही वचने वाचून प्रार्थना करण्यासाठी वेळ काढणे खूप चांगले आहे. प्रत्येक लेकराला प्रार्थना करायला प्रोत्साहित केले पाहिजे. पण सुट्टीच्या दिवशी परमेश्वराच्या वचनात आपण एकत्रितपणे जास्त वेळ घालवू शकतो.

दुष्ट जगामध्ये फक्त परमेश्वरच आपल्या मुलांचे संरक्षण करु शकतो. म्हणूनच आपण सगळ्यात जास्त परमेश्वराच्या वचनावर आणि प्रार्थनेवर अवलंबून राहिले पाहिजे. आपली मुले ज्या समस्यांचा सामना करीत असतात त्या प्रत्येक समस्येवर आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे आणि प्रार्थनेद्वारे विजय मिळवू शकतो. जेंव्हा आपण आपल्या मुलांविषयी काही समस्यांचा सामना करीत असतो, तेंव्हा जर आपण स्वतःला परमेश्वराकडून ऐकण्याची सवय लावलेली असेल, तर तो आपल्याला प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्यासाठी एखादे अभिवचन देईल. आपण त्या अभिवचनावर अवलंबून राहून त्या समस्येचे निराकरण होईपर्यंत प्रार्थना करीत राहिले पाहिजे.

एक आई म्हणून आपण आपल्या मुलांना प्रेम आणि संरक्षणाची अनुभूति दिली पाहिजे. आपल्या मुलांना आपल्यामध्ये एक असा आश्रय आणि शरणस्थान मिळाले पाहिजे कि ज्यामुळे ते कायम आपल्याकडे वळतील. त्यामुळेच काही वर्षांनंतर ते परमेश्वराचे प्रेम आणि संरक्षण अधिक स्पष्टपणे समजण्यास समर्थ होतील. निश्चितच आपल्याकडे हा एक महान विशेषाधिकार आहे - आपल्या मुलांना परमेश्वराच्या स्वभावाचे प्रतिबिंब दाखवण्याचा जेणेकरुन त्यांचे बालमन, न पाहिलेल्या परमेश्वराला अधिक दृढपणे धरुन राहू शकतील.


" प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते "

(नीतिसूत्रे १४:१)


धडा 4
आपल्या मुलांसोबत वेळ व्यतित करणे

आपली मुले जोपर्यंत आपल्या घरात आहेत तोपर्यंत ती आपल्या जीवनातील प्रथम प्राथमिकता असली पाहिजे. आपण आपल्या मुलांना परमेश्वराच्या भयात वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या आजी- आजोबांवर किंवा संडेस्कूल शिक्षकांवर टाकू नये. परमेश्वराने ही जबाबदारी सर्व प्रथम आपल्या सर्व मातांना दिलेली आहे. कारण आपण त्यांना जन्म दिला आहे आणि घरात सर्वात जास्त वेळ ते आपल्या सोबतच असतात.

म्हणूनच आपण आपल्या नोकरीच्या, व्यवसायाच्या, करिअरच्या मागे धावण्याद्वारे तसेच प्रमाणाबाहेर नातेवाईकांच्या किंवा मैत्रिणींच्या घरी जाण्याद्वारे, किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या सामजिक सक्रियतेमुळे आपल्या मुलांकडे कधीच दुर्लक्ष करु नये.

जेंव्हा माझी मुले घरी होती तेंव्हा त्यांच्यासाठी पुष्कळशा सामाजिक कार्यक्रमांना जाण्याचे टाळणे हे मी उचित समजायचे. आणि अशा स्वः नाकाराचा मला कधीच पस्तावा वाटला नाही, जो वेळ तिथे वाचला तो माझ्या मुलांमध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक ठरला.

परंतु जेंव्हा परमेश्वर गरजू लोकांना माझ्या घरी पाठवित असे तेंव्हा मी सगळे काही बाजूला ठेऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असे. आणि अशावेळी मग परमेश्वराने माझ्या मुलांची काळजी घेतली.

आता जेंव्हा माझी चारही मुले मोठी झाली आहेत आणि घरापासून दूर आहेत, तेंव्हा आता लोकांना भेटण्यासाठी आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी सुद्धा माझ्याकडे भरपूर वेळ आहे. म्हणूनच सर्व गोष्टींसाठी परमेश्वराच्या समयाची वाट पाहण्यास मी तुम्हाला प्रोत्साहित करते.

एकदा आपला विवाह झाला की आपला पती, आपली मुले आणि आपले घर - ह्याच क्रमाने आपल्या जीवनात सर्वात पहिली प्राथमिकता असली पाहिजे. जर आपल्याला आपले वैवाहिक जीवन आणि घर सुखी असावे आणि आपल्या मुलांचे योग्य रीतीने पालनपोषण व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला पुष्कळश्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. परंतु सरतेशेवटी त्याचा परिणाम चांगलाच असतो.

जर आपण कामाला जात असलो - तर मग ते अर्ध्या दिवसाचे काम जरी असले तरी देखील आपल्याला आपल्या मुलांकडे पूर्ण लक्ष देणे फार कठीण जाते. कामावरुन घरी परत येताना आपल्याला संध्याकाळ होते, आणि आपण थकलेले व कंटाळलेले असतो आणि मग छोट्या छोट्या कारणाने देखील आपण अस्वस्थ आणि चिडचिडे होतो आणि मुलांच्या काही क्षुल्लक गोष्टींमुळे देखील आपली खूप चिडचिड होते. त्यामुळे मग घरातल्या पुष्कळशा गोष्टी बिघडू लागतात. आणि मग आपल्याला असे आढळून येईल कि जेंव्हा मुले सतत आपल्या आईला वाईट मूड मध्ये पाहतात तेंव्हा ती देखील आणखीन हट्टी आणि मस्तीखोर होऊ लागतात!!!!! एक आई होणे हे एक पूर्ण वेळचे काम आहे - खासकरुन जेंव्हा आपली मुलं लहान आणि शाळेत जाणारी असतात. अशावेळेस आपण आपल्याला झेपणार नाहीत किंवा आपण पूर्ण करु शकणार नाही अशा जास्त जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊ नये.

आपल्या मुलांसोबत चर्चच्या सभेमध्ये सहभागी होण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. अशाप्रकारे आपण त्यांच्या समोर एक उत्तम उदाहरण ठेवतो. परंतु काही वेळेस आपली मुलं आजारी असली की आपल्याला सभेला जाता येत नाही पण त्यामुळे आपण स्वतःला दोषी वाटून घेऊ नये. कदाचित अशावेळी आपल्या मुलांचा नि:शब्द आक्रोश असेल की " आई, मला एकट्याला सोडून जाऊ नकोस ना ". मुलं जेंव्हा आजारी असतात तेंव्हा अशावेळी त्यांना आईकडून मिळणाऱ्या समाधानाची आणि सांत्वनाची सर्वात जास्त आवश्यकता असते. म्हणूनच अशावेळेला, आपण त्यांना दुसऱ्यांच्या भरवंशावर एकट्याला सोडून जाऊ नये. आपण त्यांच्यासाठी किती त्याग केले आहेत ह्याची माहिती नसताना सुद्धा एके दिवशी, ते आपल्याला एक चांगले, सुखी घर दिल्याबद्दल धन्यवाद देतील.

आपण बिछान्याला खिळलेले जरी असलो तरी सुद्धा आपल्या घरात आपल्या मुलांसाठी आपण एक चांगली आई असू शकतो. कदाचित आपल्याला बऱ्याच सभांना जाता येणार नाही. परंतु तरी देखील परमेश्वरा सोबत आपली अतूट सहभागिता असू शकते. साम्यवादी देशांच्या तुरुंगामध्ये असे पुष्कळ ख्रिस्ती लोक आहेत जे कधीही कोणत्याही सभेला जाऊ शकत नाहीत. परंतु ती मौल्यवान रत्ने आहेत ज्यांना परमेश्वर पैलू पाडत आहे -आणि एके दिवशी तो संपूर्ण जगासमोर त्यांना सादर करेल. आपण माता सुद्धा प्रभूसाठी अशीच मौल्यवान रत्ने असू शकतो.

आपण आपल्या मुलांच्या संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी रुची दाखवली पाहिजे. त्यांच्या शाळेत जेंव्हा एखादा कार्यक्रम असेल किंवा त्यांनी कुठल्यातरी क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेला असेल तर आपण तो कार्यक्रम पाहण्यासाठी गेले पाहिजे. अशा कृतीने आपण आपल्या मुलांची मने जिंकू शकतो - कारण ते पाहतील कि ते ज्या गोष्टी करतात त्यामध्ये आपल्याला स्वारस्य आहे.

सुट्टीच्या दिवसांमध्ये आपण त्यांच्यासोबत घरातले खेळ खेळू शकतो. आपण केवळ आपल्याला आवडते तेच नाही तर त्यांना जी गोष्ट आवडते त्यात सुद्धा रुची दाखवली पाहिजे. आपण प्रत्येक मुला सोबत व्यक्तिगतरीत्या बोलले पाहिजे आणि ते काय सांगतात हे आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. मग जें‌व्हा आपण त्यांच्याशी काही बोलू तेंव्हा ते सुद्धा आपले म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील.

आपण त्यांच्या शाळेतल्या अभ्यासात सुद्धा रुची दाखवली पाहिजे. त्यांना जर काही समजत नसेल तर त्यांच्यावर ओरडून काहीच उपयोग होणार नाही. आपण त्या विषयाचा अभ्यास करुन मग त्यांना समजावून सांगितले पाहिजे. आणि जर ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असेल तर आपण त्यांच्यासाठी दुसऱ्या कुणाची तरी मदत घेतली पाहिजे. आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या वेळेला सामाजिक भेटीगाठी ठरवू नयेत. तसेच आपल्या मुलांना जेंव्हा आपल्या देखभालीची आवशक्यता असते तेंव्हा अशावेळेस जर कुणी पाहुणे घरी आले तर त्यांचे आदरातिथ्य करण्यात आपण व्यस्त होऊ नये. आपल्या मुलांना शिकवताना आपल्याला पुष्कळसा त्याग करावा लागतो आणि जर आपल्याला त्यांचे पालन-पोषण योग्य रीतीने करायचे असेल तर निश्चितच आपल्याला बऱ्याचशा सामाजिक गोष्टींपासून दूर रहावे लागेल. पण जेंव्हा आपली मुले मोठी होतील आणि आपण त्यांच्या आयुष्यात त्यांचे भले झालेले पाहू तेंव्हा आपल्याला त्याचा पस्तावा होणार नाही.

पुष्कळशा मातांना आपल्या किशोरवयीन मुलांसोबत ताळमेळ बसवताना आणि त्यांच्या समस्या समजून घेताना खूप कठीण जाते. ह्याचे एक कारण असे असू शकते की जेंव्हा मुले लहान असतील तेंव्हा त्या माता आपल्या कामामध्ये आणि मैत्रिणींबरोबर मनोरंजन करण्यामध्ये इतक्या व्यस्त असतील की मुलांसोबत राहण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसेल. आता डाव उलटला आहे आणि आता मुलांकडे, त्यांच्या मातांसोबत घालवायला वेळच शिल्लक राहिलेला नाही आहे.

जेंव्हा आपली मुले लहान असतात तेंव्हाच आपल्याला त्यांचा भरवंसा जिंकता आला पाहिजे. परंतु जर आपण असे करण्यात अपयशी ठरलो, तर आपल्याला त्यासाठी परमेश्वराकडे विनंती केली पाहिजे आणि कमीत कमी आता तरी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न सुरु करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. आपण कधीही आशा सोडू नये.

आपण हे कधीही विसरु नये की आपली मुले ही परमेश्वराने आपल्याला दिलेले एक विशेष असे दान आहे. आणि तो आपल्या प्रत्येक बालका बाबतीत काळजीपूर्वक आपल्याला असे म्हणतो की " ह्या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरता ह्याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन "
(निर्गम २:९).

आपली मुले आपल्यासाठी अत्यंत बहुमूल्य आणि मौल्यवान आहेत ह्या जाणिवेने वाढली पाहिजेत. त्यांना परमेश्वराच्या चांगुलपणाचा स्वाद सर्वप्रथम आपल्या मातांच्याद्वारेच मिळाला पाहिजे. आणि मग परमेश्वराला जसे हवे आहे तसेच आपले घर होईल - आणि त्यामुळे परमेश्वराचे गौरव होईल.


धडा 5
आपल्या मुलांना नियम नव्हे सिद्धांत शिकवणे

एक आई म्हणून आपण बऱ्याचदा विचार करतो की आपल्या मुलांमध्ये योग्य रीतीने कशा प्रकारे सुधारणा करावी. पण जर आपण मुलांना योग्य प्रकारे सूचना देण्याचे थोडेसे कष्ट घेतले तर मग बऱ्याच गोष्टींमध्ये आपण त्यांना अनावश्यकपणे रागावणे टाळू शकतो.

आपण आपल्या मुलांसाठी थोडकेच नियम बनवावेत. जर आपण पुष्कळ नियम बनवले तर मग आपली मुले एकतर विधिवादी होतील किंवा विद्रोही बनून आपण बनवलेला प्रत्येक नियम मोडणारे बनतील. आपण त्यांना मोठी नियमावली देण्यापेक्षा सिद्धांत शिकवले पाहिजेत. साध्यासुध्या सूचना क्लिष्ट नियमांपेक्षा उत्तम असतात.

आपण आपल्या मुलांना सर्वात महत्वाचे सिद्धांत शिकवले पाहिजेत - जसे की आई-वडिलांच्या आज्ञा पाळणे, खरेपणाने रहाणे, निस्वार्थी असणे, वडिलधाऱ्यांचा आदर करणे आणि इतरांच्या हक्कांची सुद्धा जाणीव असणे. त्यांनी जर ह्या गोष्टींचे पालन केले तर मग त्यांना अधिक नियमांची आवश्यकता भासणार नाही. भविष्यात जेंव्हा ते घरापासून दूर जातील तेंव्हा हे सिद्धांत आणि ही मूल्ये आयुष्यभर त्यांचे मार्गदर्शन करतील.

बायबल अभिवचन देते की जी मुले आपल्या आई-वडिलांचा आदर करतात त्यांचे कल्याणच होते. तेंव्हा त्यांचे भले व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांना आपला आदर करायला शिकवले पाहिजे. सगळ्या वडिलधाऱ्या लोकांशी आदराने बोलण्यास आपण त्यांना शिकवले पाहिजे.

आपल्या घरातील व्यावहारिक गोष्टीं बाबत आपण मुलांना निस्वार्थी रहायला शिकवले पाहिजे. आपण त्यांची आवडती खेळणी आणि त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या एकमेकांसोबत आणि जे आपल्या घरी येतात त्यांच्या बरोबरही वाटायला शिकवले पाहिजे.

मुलांना कायम दुसऱ्यांच्या वस्तूंची कदर करायला आणि त्यांची कधीही चोरी न करायला शिकवले पाहिजे. शाळेतील त्यांची नसलेली अशी कोणतीही वस्तू घरी आणण्यास आपण त्यांना परवानगी देऊ नये. मुलांनी जर पाहिले की आपण दुसऱ्यांची मागून आणलेली वस्तू त्यांना परत देण्याविषयी निष्काळजी आहोत, तर मग हे पाहून आपली मुले सुद्धा असाच निष्काळजीपणा करायला सुरुवात करतील. लहान मुले ही स्वाभाविकपणे सद्गुणी नसतात. त्यांना चांगले गुण हे शिकवावे लागतात.

मुलांना घरामध्ये आपल्या हातांनी काम करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. परंतु आपण एकाच मुलाला पुन्हा पुन्हा एकाच प्रकारचे काम देऊ नये. आपण मुलांना आळीपाळीने कामे वाटून दिली पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार ते काम करण्याची संधी मिळेल. ह्याप्रकारे आपण सगळ्यां बरोबर निष्पक्ष राहू शकतो. आपल्या मुलांना ते घरात जे काम करतील त्यासाठी बक्षिस किंवा पैसे मिळण्याची सवय लावू नये. ह्याबाबत लोकांचे आपापले दृष्टिकोन आहेत. परंतु ह्या पद्धतीमध्ये धोका आहे. कधी तरी हे ठीक आहे. पण तसेही आपण आपल्या मुलांना हेच शिकवले पाहिजे कि घरात मदत करणे हे सगळ्यांसाठी - आई, वडील आणि मुले ह्या सर्वांसाठी एक सामान्य बाब आहे. त्यांना असे वाटता काम नये कि घरात मदत केल्यामुळे ते आपल्यावर काहीतरी उपकार करीत आहेत.

आपण आपल्या मुलांना हे स्वातंत्र्य दिले पाहिजे की त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू शकतील आणि कुठल्याही समयी आपल्याशी कुठल्याही विषयावर बोलू शकतील. अर्थातच त्यांना उद्धटपणे किंवा रागीटपणे वागण्याची परवानगी अजिबात देवू नये. पण जर आपण त्यांच्याशी मोकळेपणाने वागलो तर ज्या गोष्टी त्यांना अस्वस्थ करतात त्या आपल्याला लगेच जाणवतील. जेंव्हा ते एकटे आणि शांत राहू लागतील तेंव्हा आपल्याला समजून येईल की काही तरी गडबड आहे. आपण आपल्या मुलांचा भरंवसा जिंकला पाहिजे आणि त्यांनी आपल्याला त्यांचा सर्वात जवळचा दोस्त मानले पाहिजे.

आपली मुले ह्या गोष्टीची कायम कदर करतील कि आई आपल्याला केवळ दोषच देत नाही तर काळजीही घेते आणि मदतही करते. म्हणून जर आपण त्यांच्यासोबत राहण्यासाठी वेळ काढला तर, तर त्यांना सुधारण्याची खूपच कमी गरज भासेल. आपण त्यांच्यासाठी किती त्याग करीत आहोत आणि आपण मनापासून त्यांच्याकडे किती लक्ष देत आहोत हे जर त्यांना दिसले - तर ते सुद्धा आपल्याला मनापासून प्रतिसाद देतील. खूप वर्षांनंतर जेंव्हा ते आपल्या जीवनात तणाव आणि कठीण परिस्थितींचा सामना करतील, तेंव्हा ते मागे वळून त्या परिस्थितींकडे पाहू शकतील कि आपल्या आईचा कसा विश्वास होता आणि तिने आपला विश्वास कसा गमावला नाही... आणि परमेश्वराने त्या परीक्षेमधून कसे आपल्या आईला विजयाने बाहेर काढले होते. अशाप्रकारे त्यांचीही विश्वासात वाढ होईल.

हे महत्वाचे आहे कि आपण आपल्या मुलांना आपल्या घरात काम करणाऱ्या कुठल्याही सेवकां बरोबर कधीही उद्धटपणे बोलण्याची परवानगी देऊ नये. एकदा जरी आपण आपल्या मुलांना एखाद्या सेवकाची माफी मागायला सांगितले तर त्यांच्या अशा प्रकारच्या वर्तनापासून सुधारण्यासाठी त्यांना ते बऱ्याचदा पुरेसे असते. आपण आपल्या मुलांना आपल्या घरात काम करणाऱ्या सेवकांचे आभार मानायला शिकवले पाहिजे. आपल्या मुलांनी जर काही पैसे कमावले किंवा त्यांना शाळेतून काही रोख -रक्कमेचा पुरस्कार मिळाला असेल तर त्यांना त्या पैशातून सेवकांकरिता काहीतरी भेटवस्तू आणण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरुन ते त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करु शकतील. आपल्यासाठी काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तिला जर आपल्या मुलांनी तुच्छ लेखले तर ती बाब आपण गांभिर्याने घेतली पाहिजे. सेवकांच्या वाईट परिस्थितीमुळे त्यांना सामाजिक पातळीवर कमी लेखले जात असेलही, परंतु त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. आणि आपली मुले जर त्यांच्याकडे तुच्छतेने पहात असतील तर, त्यांचे पालक म्हणून त्यासाठी परमेश्वर आपल्याला जबाबदार ठरवेल. आपली मुले जर सामाजिक स्तरातील छोट्या लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या मनोवृत्तीत वाढली असतील तर पुढे जाऊन ही गोष्ट त्यांचा घात करेल. क्षमा मागणे हे सर्वांसाठीच कठीण असते, परंतु आपण मातांनी जर असे उदहारण घालून दिले तर ते खूप उपयुक्त ठरेल.

आपल्या पतीसोबत ऐक्य असणे हेही खूप महत्वाचे आहे. ह्यामुळे आपल्या मुलांबरोबर वागताना आपल्याला आत्मिक अधिकार मिळेल. आपल्या पतीबरोबर असलेले सर्व मतभेद संधी मिळताच दूर करण्याचा आपण कायम कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आपण हे परमेश्वराच्या गौरवासाठी केले पाहिजे. पण हे आपल्या मुलांच्याही भल्यासाठीच असते. आपण आपल्या पतीच्या अधीन नसलो तर मग आपणही आपल्या मुलांकडूनही आपल्या अधीन असण्याची अपेक्षा करु शकत नाही. विरोधकाचा आत्मा अधीन नसलेल्या पत्नीद्वारे घरामध्ये सहज शिरकाव करु शकतो आणि मग आई मुळेच सगळ्या मुलांनाही सहजपणे त्याचा संसर्ग होतो !! आपण हे कधीही विसरु नये कि आपले आणि आपल्या पतीचे लक्ष्य एकसमान आहे: आपल्या मुलांचे कल्याण !

आपण लोकांमध्ये आपल्या मुलांचे जास्त कौतुक करणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे ते गर्विष्ठ होऊ शकतात. त्यांना असे वाटू शकते कि आपण त्यांचा खूप सन्मान करतोय किंवा खूप अतिशयोक्ती करतोय. पण आपल्या मुलांना लोकांसमोर आणि एकटे असताना प्रोत्साहित करणेही योग्य आहे. पण आपण ह्याचीही काळजी घेतली पाहिजे कि सगळ्यांसमोर एकाच मुलाची प्रशांसा केल्याने दुसऱ्या मुलांमध्ये मत्सर निर्माण होऊ शकतो आणि भावंडांमध्ये आपापसात वैरभाव निर्माण होऊ शकतो. आणि त्यानंतर अशा प्रशंसेमुळे त्या मुलाची स्व-धार्मिकपणे वागायला सुरुवात होऊ शकते.


आपले घर हे स्वर्गाचा अनुभव देणारे असले पाहिजे. आपण आपल्या मुलांना एक अशा प्रकारचे घर उपलब्ध करुन दिले पाहिजे जे ''पृथ्वीवरील स्वर्ग'' असे असेल _ एक असे ठिकाण जिथे जगातील सर्व लढायांचा, संघर्षांचा आणि मोहांचा सामना केल्यानंतर माघारी येऊन ते पर्याप्त विश्राम करु शकतील.


धडा 6
आपल्या मुलांना शिस्तीच्या सवयी शिकवणे

आपल्या मुलांना शिस्त लावणे ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी मधे, त्यांच्या अभ्यासामध्ये आणि त्यांच्या खेळण्यामध्येही शिस्त असली पाहिजे. अगदी सुट्टीच्या काळातही थोडासा अभ्यास आणि बायबलमधील वचनांचे पाठांतर करणे ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे.

जर आपण आपल्या मुलांना त्यांच्या लहान वयातच स्वत:च्या गोष्टींची काळजी घ्यायला शिकवू शकलो तर आपले जीवन खूप सहज-सोप्पे होईल, उदाहरणार्थ त्यांनी त्यांच्या वस्तू व्यवस्थित ठेवणे, वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे, इत्यादी. मोठ्या मुलांनी स्वत:चे आतील कपडे स्वत: धुणे आणि घरातील काहीशी मोठी कामे सामायिकपणे करण्यास शिकले पाहिजे. त्यामुळे ते स्वत:च्या आईला हलके समजणार नाहीत. हे शिकण्यास कदाचित त्यांना थोडासा वेळ लागू शकतो. पण जर का एकदा ते शिकले तर त्यांना ह्या सवयी आयुष्यभर उपयोगी पडतील.

आपण आपल्या मुलांना परमेश्वराचा आदर करायला आणि परमेश्वराला प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थान द्यायला देखील शिकवले पाहिजे. ह्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे मुले लहान असतानाच, चर्च मधल्या प्रत्येक सभेला त्यांना नियमितपणे आणि वेळेवर घेऊन जावे. मी स्वत: पाहिले आहे कि परमेश्वराने कशाप्रकारे माझ्या मुलांना मदत केलेली आहे, माझ्या मुलांची दुसऱ्या दिवशी परीक्षा असून सुद्धा, प्रत्येक रविवारच्या प्रार्थना सभेला ते हजर रहात असत, तेंव्हा परमेश्वराने परिक्षेमध्ये त्यांची कशी मदत केली ह्याचा अनुभव त्यांनी घेतला. जे परमेश्वराचा आदर करतात, परमेश्वर त्यांचा आदर करतो.

मुलांना प्रार्थना सभेमध्ये शांत राहायला शिकवले पाहिजे. आपण त्यांना हे शिकवतो म्हणजे आपण त्यांना परमेश्वराचा आदर करायला शिकवतो. कारण त्यामुळे सभेत लक्षपूर्वक ऐकणाऱ्यांचा ध्यानभंग होणार नाही. सभेच्या वेळेस लहान मुलांना आपण गोष्टीचे पुस्तक वाचायला द्यावे किंवा चित्रामध्ये रंग भरण्याचे काम द्यावे. ते थोडेसे मोठे झाल्यावर स्वत:हून दुसरीकडे बसू लागले, तरी देखील आपण त्यांच्यावर अधूनमधून लक्ष ठेवले पाहिजे कि ते व्यवस्थित बसलेले आहेत कि नाही आणि जर आपण त्यांना चुकीचे वागताना पाहिले तर घरी येऊन आपण त्यांना समज दिली पाहिजे आणि परमेश्वराचा आदर करण्याचे महत्त्व समजावले पाहिजे.

उपदेशाकडे लक्ष देऊ शकतील इतकी मोठी मुले असतील तर त्यांना सभेमध्ये गोष्टीची पुस्तके वाचायला देणे योग्य नाही. ते जर त्यांच्या शाळेत ३ ते ४ तास त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देऊ शकतात तर मग ते एका प्रार्थना सभेमध्ये सुद्धा दोन तास लक्षपूर्वक बसू शकतात. शाळेत जेंव्हा शिक्षक त्यांना काही शिकवत असतील तेंव्हा त्यांनी गोष्टीचे पुस्तक वाचलेले आपल्याला आवडणार नाही. तसेच प्रार्थना सभेमध्ये सुद्धा ते असे करताना दिसू नयेत.

मुलांना जे अन्न आणि कपडे मिळतात त्यामध्ये त्यांना समाधानी राहण्यास शिकवले पाहिजे आणि भौतिक गोष्टीत सुद्धा ते उधळपट्टी करणारे असू नयेत.

शिस्तबद्ध अभ्यासाची सवयही खूप महत्वाची आहे. खास करुन आपली मुले लहान असताना आपल्याला त्यांच्या सोबत बसून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. ह्यामुळे वर्गामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांनी शिक्षणालाच आपला देव बनवावे अशी आपली अपेक्षा नाही. परंतु शाळेत जर त्यांनी आळशीपणामुळे अभ्यासाकडे नीट लक्ष दिले नाही तर त्यात परमेश्वराला निश्चितच गौरव मिळणार नाही. आपली मुले कदाचित खूप बुद्धिमान नसतील. परंतु आपण त्यांना कठोर परिश्रम करायला शिकवू शकतो.


धडा 7
आपल्या मुलांना शिस्त लावणे

"मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही" (नीतिसूत्रे २२:६)

"काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरु नकोस". (नीतिसूत्रे १९:१८)

"बालकाच्या ह्रदयात मूर्खता जखडलेली असते, शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते" (नीतिसूत्रे २२:१५)

"मुलास शिक्षा करण्यास अनमान करु नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव" (नीतिसूत्रे २३:१३, १४)

"तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल". (नीतिसूत्रे २९ :१७)

आपल्या मुलांना जेंव्हा सुधारण्याची आणि शिस्त लावण्याची वेळ येते, तेंव्हा आपल्याला सुज्ञतेची आणि कृपेची अधिक आवश्यकता असते. आपण त्यांना त्याचप्रकारे शिक्षा केली पाहिजे जशी परमेश्वर आपल्याला शिक्षा करतो - प्रेमाने आणि करुणेने, त्यांच्या सार्वकालिक कल्याणाकरिता. आपल्या मुलांना शिस्त लावण्याचे सगळे काम आपण आपल्या पतीच्या हाती सोपवून देता कामा नये. एक कमकुवत शिक्षिका आज्ञा मोडणाऱ्या मुलाला शिक्षा करण्याकरीता नेहमी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे पाठवित असेल तर अशा शिक्षिकेचा किंवा आईचा मुले आदर करणार नाहीत. आपण जर स्वतः आपल्या मुलांना कधीच शिस्त लावली नाही, तर ते आपल्याला कमकुवत समजू लागतील, आणि लवकरच त्यांच्यावरचा सगळा अधिकार आपण गमावून बसू.

आपल्या मुलांना कुठल्या गोष्टींसाठी शिक्षा करायची आणि त्यांच्या कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे देखील आपल्याला ठाऊक असले पाहिजे.

एक मूलभूत तत्व आपण कायम मनामध्ये बाळगले पाहिजे कि कुठल्याही भौतिक नुकसाना पेक्षा त्यांचे चारित्र्य अधिक महत्वाचे आहे. आपल्या स्वतःमध्ये सार्वकालिक मूल्यांची योग्य समज असणे आवश्यक आहे. आपली मुले जर आपल्याशी उद्धटपणे बोलत असतील (किंवा इतर कुणाशी सुद्धा) किंवा ती जाणून-बुजून खोटे बोलत असतील, तर त्यांच्याकडून चुकून एखादी महागडी वस्तू तुटली असेल त्याहीपेक्षा ही एक अधिक गंभीर बाब आहे असे समजावे.

आपल्या मुलांना शिस्त लावताना आपण सर्व प्रकारच्या रागापासून, उतावळेपणा पासून आणि चिडचिडेपणा पासून स्वत:ला शुद्ध राखले पाहिजे. रागाच्या भरात आपण त्यांना कधीही शिक्षा करु नये. मला खात्री आहे की भूतकाळात आपण सगळ्याजणी, ह्या क्षेत्रात अपयशी ठरल्या आहोत. परंतु आपण पश्चाताप करुन भविष्यात आपल्या मुलांना प्रेमाने सुधारण्यासाठी परमेश्वराकडे कृपेची मागणी करु शकतो.

आपण आपल्या मुलांना शिक्षा म्हणून कोणतेही शारीरिक बोजड काम करायला देऊ नये. त्यांनी एक जबाबदारी म्हणून काम शिकले पाहिजे, शिक्षा म्हणून नाही. त्याचप्रमाणे शिक्षा म्हणून चॉकलेट किंवा आईस्क्रीम सारख्या चैनीच्या गोष्टीं नाकारणे ठिक आहे पण शिक्षा द्यायची म्हणून आपण त्यांना भोजन देणे नाकारु नये, उपाशी ठेवू नये. मुलांना योग्य वाढीसाठी चांगल्या पौष्टिक अन्नाची आवश्यकता असते.

जर आपण आपल्या मुलांना ताकीद दिली की काही बाबतीत त्यांनी आज्ञा मोडल्यास त्यांना शिक्षा मिळेल, तर आपण ते अवश्य करावे. नाहीतर मुलांना वाटेल की आपण त्यांना पोकळ धमक्या देतो आणि मग आपल्या शब्दांना काहीच किंमत उरणार नाही. परंतु जर आपल्या लक्षात आले कि ते सौम्य शिक्षेस पात्र आहेत तर मग आपण त्यांच्या कठोर शिक्षेची तीव्रता कमी करु शकतो. आपल्याला जर दिसून आले की आपल्या मुलांना त्यांनी केलेल्या कृतीचा पश्चाताप होत आहे, वाईट वाटत आहे,, तर आपण त्यांची धमकी दिलेली शिक्षा रद्द करु शकतो. स्वत: परमेश्वरानेही नीनवेवर कृपा केली होती, जेंव्हा परमेश्वराने त्यांचा पश्चाताप पाहिला तेंव्हा त्याने त्यांना ज्या शिक्षेची धमकी दिली होती, ती शिक्षा त्याने रद्द केली होती (योना ३) परमेश्वर आपल्याशी कठोरपणे आणि दयाळूपणेही वागत असतो - आणि तसेच आपणही आपल्या मुलांच्या बाबतीत वागले पाहिजे.

आपल्या मुलांसाठी छडी किंवा पट्टा वापरणे हेच केवळ शिक्षेचे स्वरुप असू नये. आपण त्यांचे खेळणे देखील प्रतिबंधित करु शकतो किंवा त्यांना त्यांच्या पलंगावर काही वेळ शांतपणे झोपायला सांगू शकतो. जर त्यांनी काही चुकीचे केले असेल तर ह्या कृती देखील त्यांच्या अंतःकरणाशी बोलतील.

आपण आपल्या मुलांना निर्दयपणे कधीही शिक्षा करु नये. आपण त्यांना शिस्त लावताना इजा, दुखापत करु नये किंवा आपण कधीही त्यांच्या तोंडावर थप्पड मारु नये. चेहरा हा प्रेम करण्यासाठी रचलेला आहे थप्पड मारण्यासाठी नाही. आपल्या मुलांना मारण्यासाठी हाताचा वापर करणे टाळावे. त्यापेक्षा आपण छडीचा वापर करणे चांगले आहे असे शास्त्र वचन आपल्याला सांगते (नीतिसूत्रे २३:१३, १४). आपले हात मुलांना गोंजारण्यासाठी आणि त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आहेत.

आपली मुलं जेंव्हा किशोरवयीन होतील (वयाच्या १३ वर्षांवरील) तेंव्हा आपण त्यांना शारीरिक शिक्षा करणे टाळले पाहिजे. जर आपण त्यांना वयाच्या १ ते १३ वर्षापर्यंत चांगली शिस्त लावली असेल तर त्यानंतर आपल्याला त्यांना अशा शारीरिक शिक्षा करण्याची गरजच भासणार नाही. जेंव्हा ते लहान असतात, तेंव्हाच त्या समयाचा उपयोग करुन त्यांना शिस्त लावावी आणि त्यांना परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण दयावे.

आपण आपल्या मुलांना कधीही दुसऱ्यांसमोर शिस्त लावू नये - कारण त्यामुळे आपण त्यांना लोकांसमोर लज्जित केल्यासारखे होईल, आणि त्यामुळे त्यांची शिक्षा दुप्पट होईल. आपण कायम त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. आपण त्यांना त्यांच्या असफलतेसाठी एकटे असतानाही शिक्षा करु शकतो. मात्र आज्ञा मोडणे आणि उद्धटपणे वागण्याबद्दल त्वरित ताकीद दिलीच पाहिजे. जर अशा बाबतीत आपण त्यांना शिस्त लावण्यात अपयशी ठरलो, तर मग ते अत्यंत धोकादायक वळणावर जाऊ शकतात आणि त्यामुळे मोठे झाल्यावर त्यांचा नाश होऊ शकतो. आणि तेंव्हा त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी खूपच उशीर झालेला असेल. काही आई-वडील त्यांच्या मुलांना सार्वजनिक ठिकाणी असताना शिस्त लावायचा प्रयत्न करतात जेणेकरुन लोकांनी बघावे की ते त्यांच्या मुलांना किती कडक शिस्तीत वाढवतात. हे तर मनुष्यांच्या नजरेत आदर मिळवणे असे आहे परंतु परमेश्वराच्या नजरेत दुष्टपणा आहे.

आई आणि वडील दोघांचेही मुलांना शिस्त लावण्यासाठी एकमत असले पाहिजे. वडील जेंव्हा मुलांना शिक्षा करीत असतील तेंव्हा आईने मुलांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करु नये. कारण मग भविष्यात आपणच आपल्या मुलांच्या नाशास कारणीभूत ठरु शकतो.

आपल्या मुलांना शिस्त लावल्यानंतर, आपण त्यांना माफही केले आहे ह्याची त्यांना खात्री पटली पाहिजे. त्यांनी त्यांच्या चुका कशाप्रकारे सुधारायच्या आहेत हे सुद्धा आपण त्यांना शिकवले पाहिजे. परंतु त्यांना त्यांच्या चुकांची वारंवार आठवण करुन न देण्याचीही काळजी घेतली पाहिजे. काही माता असे करतात. त्यामुळे मुले अजून निराश होतात.

आपल्या मुलांना बक्षीस देण्याचेही काही प्रसंग असले पाहिजेत. जेंव्हा आपण काही क्षेत्रात आपल्या स्वत:चा नाकार करतो तेंव्हा परमेश्वरही आपल्याला पुरस्कृत करतो. जेंव्हा अब्राहामाने स्वत:चा नाकार करुन त्याचा पुतण्या लोट ह्याला जमिनीचा जो भाग त्याला हवा होता तो आधी निवडण्याची संधी दिली (उत्पत्ति १३), तेंव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्वरित त्याचे प्रतिफळ दिले. त्याचप्रकारे आपल्या मुलांनी काही चांगले कार्य केले आणि काही क्षेत्रात त्यांनी स्वत:चा नाकार केला तर त्यांना पुरस्कार देणे उत्तम आहे. आपण त्यांना त्यांच्या वाढदिवसाला, जेंव्हा ते आजारी असतील किंवा दवाखान्यात ॲडमिट असतील त्यावेळेसही काही बक्षिस देऊ शकतो.

असेही अनेक प्रसंग असू शकतात की आपण आपल्या मुलांना आवशक्यतेपेक्षा जास्त शिक्षा केल्याबद्दल आपल्याला खूप वाईट वाटते. परंतु नंतर त्यांना काहीतरी बक्षिस देऊन आपण त्याची भरपाई करु शकतो. पण हे असे कधी तरी केले तरच ठिक आहे. आपण जर नेहमीच असे करु लागलो तर लवकरच आपली मुले त्यांना दिलेली शिक्षा विसरुन तिचा अनादर करायला सुरुवात करतील. म्हणून जेंव्हा त्यांनी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न केला असेल तेंव्हा त्यासाठी त्यांना नंतर कधीतरी भेट देणे चांगले आहे.

आपल्या मुलांच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यावर, जेंव्हा त्यांचा जन्म झाला होता तेंव्हा जो आनंद, आश्चर्य आणि परमेश्वराच्या बाबतीतील जी कृतज्ञता आपल्याला जाणवली होती ती सहजपणे हरवून जाते. परंतु आपण हे विसरु नये की बाळाला जन्म देणे हा एक अनमोल असा विशेषाधिकार आहे. अशा पुष्कळशा स्त्रिया आहेत ज्यांना हा विशेषाधिकार मिळालेला नाही आणि एक मूल मिळवण्यासाठी ह्या जगात त्या काहीही करायला तयार असतात.

म्हणून आपण हा दृढनिश्चय केला पाहिजे की आपण कोणत्याही किंमतीत नांगराला घातलेला हात मागे घेणार नाही. आणि आपल्या घरात सर्वकाही सुरळीतपणे चालावे म्हणून आपण आपल्यापरीने होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. जर आपण परमेश्वरासोबत घनिष्ट संबंध जोडून त्याच्या सोबत चाललो, तर तो आपल्याला नविन सामर्थ्य देईल आणि आत्मिक रीतीने ताजेतवाने राखील.


धडा 8
आपल्या मुलांना प्रोत्साहीत करणे

मी असे मानते कि एक आई म्हणून आपल्या मुलांना प्रोत्साहीत करणे ही त्यांच्यासाठी आपण केलेली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण दु:खाची गोष्ट ही आहे की बहुतेक घरांमध्ये असे आढळून येत नाही.

पालकांच्या शोषणामुळे, कठोरपणामुळे आणि प्रेमाच्या अभावामुळे किंवा सहवासाच्या कमतरतेमुळे आपण पाहतो की बऱ्याच मुलांचे व्यक्तिमत्व विकृत आणि चुकीच्या मनोवृत्तीचे बनते. दुर्दैवाने एका अशा घरात वाढलेले मूल, जिथे त्याला योग्य प्रकारे कधीच प्रोत्साहन मिळाले नसेल, तर ते अशा एखाद्या रोपट्यासारखा आहे, जे एका मोठ्या खडकाखाली अंकुरित झाले आहे आणि ज्याला कधीही सूर्यप्रकाशच मिळालेला नाही.

एका प्रतिभाशाली मुलाची प्रशंसा करणे किंवा जो अभ्यासात आणि खेळामध्ये प्रविण आहे अशा एका मुलाचे कौतुक किंवा त्याला प्रोत्साहीत करणे सोप्पे असते. परंतु प्रोत्साहीत करण्याची सगळ्यात जास्त गरज एका कमकुवत मुलाला असते. आपण अशा मुलाची गरज समजून घेतली पाहिजे जो आतल्या आत दुखावलेला आहे पण तो त्याचे दुःख व्यक्तच करु शकत नाही. एक संवेदनाशील आई आपल्या मुलाच्या भावना तितक्याच सहजपणे समजू शकते जितक्या सहजपणे एक थर्मामीटर शरीराचे तापमान मोजतो!

एखादा मुलगा जेंव्हा स्वत:ला तुच्छ लेखू लागतो आणि आपल्या मोठ्या भावंडांनी जसे यश मिळवले आहे तसे त्याला मिळवता येत नाही, तेंव्हा तो स्वतःला आपल्या मित्रांकडून अस्विकृत समजू लागतो आणि त्याला वाटते की त्याची कोणालाही गरज नाही. अशा परिस्थितीत त्याला प्रोत्साहीत करण्याऐवजी आपण रागावून त्याचा तणाव अजून वाढवत तर नाही ना?

आपण आपल्या मुलांसोबत नाही ह्या शब्दाचा किती वारंवार वापर करतो ह्यावरुन आपण स्वतःची पारख करु शकतो. आपण आपल्या मुलांना केवळ त्यांनी काय करु नये इतकेच न सांगता त्यांनी काय करावे हे देखील सांगावे.

तुमच्या एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म तुमच्या योजनेच्या विरुद्ध झालेला आहे असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःशीच किंवा इतर कुणाशी असे बोलला आहात का, की ''हे मूल तुमच्या इच्छेविरुद्ध झालेले आहे''. तर मग हे परमेश्वराच्या वचनाच्या कितीतरी विरुध्द आहे, जे सांगते कि '' संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे' (स्तोत्र १२७:३) आपण आपल्या प्रत्येक मुलाचे मोल हे परमेश्वराने दिलेल्या धनाच्या स्वरुपात करण्याची गरज आहे. परमेश्वर कधीच चूक करीत नाही जरी आपल्याला मूल व्हावे अशी अपेक्षा नसली तरीही.

आपल्या मुलांचे अपयश लोकांसमोर सांगून त्यांना सार्वजनिकरित्या खजील करु नये. आपण त्यांच्या पाठीमागे सुद्धा त्यांच्याशी विश्वासयोग्य आहोत अशी आपल्या मुलांची खात्री असली पाहिजे.

आपण आपल्या मोठ्या मुलांना हे सुध्दा शिकवले पाहिजे कि त्यांनी त्यांच्या लहान भावाला किंवा बहिणीला स्विकारले पाहिजे आणि केवळ आपण त्यांच्या लहान भावंडांना अधिक वेळ देत असल्यामुळे त्यांनी त्यांचा मत्सर करु नये. बऱ्याचदा, जेंव्हा घरात एखाद्या नविन बाळाचा जन्म होतो आणि सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडेच लागलेले असते तेंव्हा ही समस्या उद्भवू शकते. परंतु परमेश्वराच्या साहाय्याने आपण आपल्या मुलांना दाखवून देऊ शकतो कि आपल्यासाठी ती सर्व एकसमान मौल्यवान आहेत.

जे मूल अपयशी ठरले आहे त्याच्याबाबत संवेदनशील होण्यास आपण स्वत: कितीवेळा अपयशी ठरले आहोत. जरी एखादया मूलाची पीछेहाट झाली किंवा तो पापात पडला, तरी आई त्या हरवलेल्या कोकराला कळकळीने, प्रेमाने तिच्या प्रार्थनेने पुन्हा आपल्या तारणकर्त्याकडे वळवून आणण्यासाठी मार्गदर्शन करु शकते.

पीछेहाट झालेली पुष्कळशी मुले त्यांच्या आईच्या विश्वासाच्या प्रार्थनेने पुन्हा परमेश्वराकडे वळू शकतात. तेंव्हा न डगमगता परमेश्वराच्या अभिवचनांना धरुन राहिले पाहिजे.

जर आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवला, तर आपल्याला असे आढळेल की त्यांच्या सोबत आपण एखादे किरकोळ काम करत असतानाही, मुले आपल्याला त्यांच्या समस्या सांगू लागतात. आणि मग ज्या समस्यांचा ते सामना करीत आहेत त्यावर त्यांनी न हारता मात करावी म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो.

जेंव्हा आपली मुले मोठी होऊ लागतात, तेंव्हा आपण त्यांच्याशी परिपक्व अशा प्रौढ लोकांसारखे वागले पाहिजे. आणि मुले ज्या आदरास पात्र आहेत तसा योग्य आदर त्यांना दिला पाहिजे. आपण बाल्यावस्थेत असताना त्यांच्याशी जसे वागत होतो तसे वागणे आता बंद केले पाहिजे. मग आपल्याला आढळून येईल की आपली मुले आपले मित्र झाले आहेत, आणि मग त्यांच्यात आणि आपल्यात कसलाही दुरावा असणार नाही...

आपली मुले मोठी होत असताना आपल्याला अशी बऱ्याचदा संधी मिळत जाते ज्यामध्ये आपण हे सिध्द करु शकतो की पवित्र शास्त्रातील अभिवचने आपल्यासाठी सत्य आहेत. जर आपण दररोज आपल्या मुलांना परमेश्वराच्या हाती सोपवून आणि त्याच्यावर अवलंबून राहून आपले जीवन जगू लागलो, तर परमेश्वराची भविष्यकालीन काळजी आणि तरतूद आपल्यासाठी एक जीवित सत्य बनेल बनेल. मुलांचे संगोपन आपल्यासाठी देखील आत्मिक रीतीने परिपक्व होण्याचे एक प्रभावी माध्यम ठरु शकते. आणि मग निश्चितच आपल्या मुलांच्या आत्मिक जीवनावरही त्याचा परिणाम होईल. परमेश्वर आपल्या प्रत्येकीला विश्वासयोग्य राहण्यासाठी मदत करो.

'' जेंव्हा मुले टीकेमध्ये वाढतात तेंव्हा ती निंदा करायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले द्वेषामध्ये वाढतात तेंव्हा ती भांडण करायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले उपहासामध्ये वाढतात तेंव्हा ती लाजाळू रहायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले लज्जेमध्ये वाढतात तेंव्हा ती दोषी रहायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले सहनशीतेमध्ये वाढतात तेंव्हा ती संयमाने राहायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले प्रोत्साहनामध्ये वाढतात तेंव्हा ती आत्मविश्वासाने राहायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले सुरक्षिततेमध्ये वाढतात तेंव्हा ती विश्वासाने राहायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले प्रामाणिकपणामध्ये वाढतात तेंव्हा ती न्यायीपण शिकतात,

॰ जेंव्हा मुले प्रशंसेमध्ये वाढतात तेंव्हा ती कौतुक करायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले पाठिंब्यामध्ये वाढतात तेंव्हा ती स्वत:चा स्विकार करायला शिकतात,

॰ जेंव्हा मुले मैत्रीमध्ये वाढतात तेंव्हा ती प्रेम करायला शिकतात. ''

(अज्ञात लेखक)


धडा 9
मला धीराने वागवून घे

ह्यावरुन त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करुन म्हणाला, 'मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन'. (मत्तय १८:२९)

ही तीच अव्यक्त आरोळी आहे जी पत्नींच्या आणि आईच्या रुपात आपल्याकडे त्या बऱ्याच जणांच्या आतून येत असते, ज्यांच्या सोबत आपला रोजचा व्यवहार असतो. परंतु जर आपल्याला ही अव्यक्त आरोळी ऐकायची असेल तर आपल्याला आत्म्यामध्ये खूपच संवेदनशील होण्याची आवशक्यता आहे.

कदाचित आपली मुले अशा काही गोष्टी शिकण्यामध्ये संथ असतील, जी आपण त्यांना वारंवार शिकविण्याचा‌ प्रयत्न करीत असू, आणि त्यामुळे आपण त्यांच्यासोबत असंयमीत होण्याच्या परिक्षेमध्ये पडू शकतो. परंतु जर आपण त्यांची अव्यक्त आरोळी ऐकू शकलो की, " मला धीराने वागवून घ्या, मी हे नीट करण्याचा माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीत आहे ", तर मग त्यांच्यावर चिडचिड करण्याच्या परीक्षेवर विजय मिळवणे आपल्याला सोपे जाईल.

कदाचित आपल्या घरात काम करणारी मोलकरीण थोडीशी अजागळ असू शकते, आपल्याला हवी तेवढी स्वच्छ देखील नसू शकते, आणि तेंव्हा आपण तिच्याशी कठोरपणे वागण्याच्या परीक्षेत पडू शकतो. परंतु तिची अव्यक्त आरोळी हीच असेल कि, "मला धीराने वागवून घ्या, मला अजून एक संधी द्या आणि मी माझ्यात सुधारणा करीन", आणि मग अशाप्रकारे आपल्याला अधिक सौम्यपणे वागण्याची आणखी एक संधी मिळेल.

किंवा कदाचित आपले वृद्ध माता-पिता, जे अशक्त आणि दुर्बल आहेत, आणि आता आपल्यावर अवलंबून आहेत. त्यांचीही अशी क्षीण आणि अव्यक्त आरोळी असू शकते कि, "मला धीराने वागवून घ्या, मला तुम्हाला त्रास देण्याची इच्छा नाही आहे, पण मला आता तुमच्या मदतीची गरज आहे". जर आपण त्यांच्या भावनांच्या बाबतीत संवेदनशील असलो, तर आपण त्यांच्या मानसन्मानाला ठेस न लागू देता, आणि त्यांना आपल्यावर अवलंबून असण्याची जाणीव न करुन देता, त्यांची ती अव्यक्त आरोळी ऐकून त्यांची मदत करु शकतो.

कदाचित मंडळी मधील आपल्या सोबतीच्या बहिणींचे वागणे आपल्यासाठी एक प्रकारची परीक्षा असू शकते. परंतू त्यांची देखील ही अव्यक्त आरोळी असू शकते, 'मला धीराने वागवून घ्या. माझ्यामध्ये अजूनही सुज्ञतेची खूप कमतरता आहे". मग आपल्या लक्षात येते कि, त्यासुद्धा, आपल्या प्रमाणेच, सिद्धतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

अशा परिस्थितींमध्ये, आपल्या सर्वांच्या देहामध्ये त्या कृतघ्न चाकरासारखीच प्रवृत्ती आढळते. परंतू हीच ती वेळ आहे जेंव्हा आपल्याला पुन्हा एकदा नव्याने आठवण्याची गरज आहे की परमेश्वराकडून आपल्याला किती वेळा क्षमा मिळाली आहे, आणि इतरांनी देखील आपल्या मूर्खपणाला किती धीराने सहन केले आहे.

म्हणूनच आम्हाला धीराने वागवून घ्या ही आपल्या सोबतीच्या दासांची - तरुण आणि वृद्ध, अशा दोघांचीही अव्यक्त आरोळी संयमाने ऐकण्यासाठी आपले आत्मिक कान सदैव तयार असले पाहिजेत.

"आणि धीराला आपले कार्य पूर्ण करु द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी" (याकोब १:४)


धडा 10
पवित्र आत्म्याने भरलेला एक सहाय्यक

आपल्या गरजेच्या वेळी पवित्र-आत्मा आपला सहाय्यक आहे. (योहान१४:१६) एक पवित्र आत्म्याने भरलेली पत्नी, स्वाभाविकपणे आत्म्याच्या गुणांनी परिपूर्ण असते, आणि आपल्या पतीच्या गरजेच्या वेळी ती त्याच्यासाठी सहाय्य्क ठरते. परमेश्वराने हव्वेला आदामासाठी अशीच सहाय्यक होण्यासाठी रचिले होते.

एक चांगली सहाय्यक तीच असते जी त्वरित आपल्या पतीची असहाय्यता आणि आवश्यकता बघते, आणि मग तितक्याच तत्परतेने पुढे येऊन ती गरजही भागवते. तुमचे पती कितीही खंबीर असले, तरीही जीवनात असे प्रसंग येतात जेंव्हा जीवनातील संघर्षांमध्ये कुणीतरी त्यांच्यासोबत उभे राहावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे ह्याची त्यांना खूप आवशक्यता असते.

धन्य आहे ती स्त्री जी आपल्या पतीची अशी सहाय्यक बनू शकते.

पण ही एक दु:खद बाब आहे कि बऱ्याचश्या स्त्रिया स्वत:च्याच दु:खात आणि परीक्षांमध्ये अशारीतीने जखडलेल्या असतात कि त्यांनाच त्यांच्या पतींकडून समाधान, सांत्वन आणि लाड करवून घ्यायला हवे असतात. अशाप्रकारे त्या स्वतःच स्वतःपासून स्वतंत्र होऊ शकत नाहीत. आणि आपल्या पतीची कसलीही मदत करु शकत नाहीत.

कित्येकदा, ह्याचे कारण असेही असू शकते कि त्या स्त्रिया आवश्यक नसणाऱ्या अशा अनेक जबाबदाऱ्या निभावतात ज्या टाळता येऊ शकतात आणि अखेर त्या अशा ओझ्याखाली दबल्या जातात जे त्यांच्यासाठी खूपच कठीण होऊन जाते.

आपल्याला आपल्या मर्यादा जाणून घेणे आवश्यक आहे. आपण जे काम पूर्ण करु शकतो केवळ तेवढेच काम आपल्या हाती घ्यावे.

आपण आपल्या पतीलाच मदत करावी इतकेच पुरेसे नाही, तर परमेश्वराने आपल्याला आई ह्या नात्याने, आपल्या मुलांच्या मदतीसाठी सुद्धा पाचारण केलेले आहे.

आपली मुले जेंव्हा काही बाबतीत पराभूत होऊन निराश होतात किंवा जेंव्हा ती पाप करतात आणि आपल्याला त्यांच्या वागण्याद्वारे हताश आणि दु:खी करतात, किंवा जेंव्हा ती आपल्या अपेक्षांच्या स्तरापर्यंत पोहचू शकत नाहीत, अशावेळी आपली मनोदशा कशी असते ?

मुलींचा जन्म झाला तर चीनमध्ये त्यांना नदीमध्ये टाकले जाते आणि भारतात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात किंवा मंदिरात टाकून देतात, कारण मुलाची अपेक्षा करणाऱ्या मातांसाठी ती एक घोर निराशा असते. जेंव्हा आपले मूल आपल्याला एखाद्या बाबतीत निराश करते, तेंव्हा आपणही अशाच मातांसारखे वागतो का ?

एक मूल जे अपयशी ठरते, किंवा दुसऱ्यांच्या तुलनेत जे स्वतःला तुच्छ समजते, त्याला प्रेमाची, कनवाळूपणाची, समजून घेण्याची आणि देखभालीची जास्त गरज असते. असे नाही कि त्याला नदीत टाकून द्यावे तर - त्याच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची आणि जास्त प्रार्थना करण्याची आवश्यकता असते !

आपला विश्वास असा असला पाहिजे कि तो स्वामी जो कुंभार आहे, जगातील सर्वाधिक तुटलेल्या भांड्यालाही जोडून एक असे पात्र बनवू शकतो जे त्याच्या उद्देशांसाठी उपयोगी पडू शकते.

तो आपल्या सर्वात जास्त हट्टी मुलातील कठोरता काढून त्याला आपल्या गौरवाचे पात्र बनवू शकतो. पवित्र आत्मा, जो सहाय्यक आहे, अशासाठी आला आहे कि जे ह्या जगात अपयशी ठरले आहेत अशा आपल्या मुलांना, परमेश्वरासाठी यशस्वी बनवावे. आणि आई म्हणून आपले हे पाचारण आहे कि आपण आपल्या मुलांना ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे.

किंवा एक दुसरे उदाहरण घेऊया : जेंव्हा वडिलांना एखाद्या मुलाला कठोरपणे शिस्त लावावी लागते, तेंव्हा अशा वेळी आपण त्या मुलाला ह्याप्रकारे धीर देऊन बिघडवू नये की ज्यामुळे त्याला असे वाटेल कि त्याचे वडिल त्याच्या बरोबर जरा जास्तच कठोरपणे वागत आहेत.

काही माता तर अशा मर्यादेपर्यंतही पोहचू शकतात कि त्या रिबेका प्रमाणे, आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांना फसविण्यासाठीही भरीस पाडू शकतात. याकोबा विषयी बोलताना, सहसा त्याला फसविणारा, धोका देणारा असे म्हटले जाते. पण त्याला धोका देण्याचे धडे शिकवणारं कोण होतं ? एक निर्बुद्ध आई, जी आपल्या पतीसोबत एकरुप नव्हती. ह्या गोष्टी आपल्याला शिकविण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत.

स्त्रीच्या स्वरुपात, आपल्यामधे भावनात्मक उर्जेचा खूप मोठ्ठा खजिना लपलेला असतो. आपल्या पतीला त्रास देऊन स्वत: साठी काही कामे करवून घेण्यापेक्षा, आपण त्या उर्जेला आपल्या मुलांचे ओझे आणि त्यांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे निवारण करण्यासाठी का खर्च करु नये?, कारण मुलांनाही त्यांच्या अडचणी असतात आणि त्या एकट्याने पेलण्यासाठी ती अजून खूप लहान असतात. तेंव्हा त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज असते.

आपली लढाई एका अशा शत्रुशी आहे जो आपले घर, आपली मुले आणि आपल्या कुटुंबाचा नाश करण्यासाठी दृढनिश्चयी आहे. आपल्याला हे मैदान सोडायचे नसून जोपर्यंत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य परमेश्वराच्या राज्यामध्ये सुरक्षित होत नाही तोपर्यंत आपण आपल्या खऱ्या शत्रुवरुन नजर देखील ढळू देऊ नये. पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करीत असतो आणि सहाय्यक म्हणून आपण आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करायलाच पाहिजे.

आपण ह्या संघर्षाची तुलना रश्शी - खेचण्याच्या सामन्याशी करु शकतो, ज्यामध्ये अंधकाराची शक्ती आपल्या मुलांच्या आणि पतीच्या विरोधात रश्शी खेच करत असते. आपण कुठल्या बाजूची रश्शी खेचत आहोत - आपल्या पती आणि मुलांच्या सोबत (त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याद्वारे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याद्वारे) की (त्यांना त्रास देण्याद्वारे आणि ओरडण्याद्वारे) त्यांच्या विरोधात आहोत?

ह्या संघर्षामध्ये आपल्याला कधीही निराश होण्याची आवश्यकता नाही, कारण पवित्रआत्मा सामर्थ्य देण्यासाठी सदैव आपल्या सोबत आहे, परमेश्वराची सर्व अभिवचने आपला आश्रय आहेत, आणि आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी साक्षींचा एक मोठा ढग आहे. परमेश्वराची आपल्याबाबत जशी इच्छा आहे तशी आपल्यातील प्रत्येक स्त्री सहाय्यक बनू शकते.

जेंव्हा शेवटल्या दिवशी आपला पती आणि मुले जिवंत होऊन उठतील आणि आपण आपले सहाय्यक होण्याचे कार्य पूर्ण विश्वासूपणे केले आहे म्हणून धन्य म्हणतील तेंव्हा वर्तमानातील आपल्या सगळ्या वेदना आणि आत्मत्याग आपल्याला अगदी काहीच वाटणार नाहीत.


धडा 11
येशूच्या चरणापाशी बसणे

मरीया प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेंव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली "प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय ? मला सहाय्य करायला तिला सांगा " प्रभूने तिला उत्तर दिले, "मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे अगत्य आहे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे, मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. "(लूक १०:३८-४२)

मार्था घरामध्ये खूप कष्टाने कामे करीत होती. परमेश्वरावर प्रेम करणाऱ्या एका बहिणीसाठी, आपल्या प्रिय गुरुसाठी आणि त्याच्या शिष्यांसाठी - चांगले जेवण बनविणे ह्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट ती काय असू शकते ? परंतु जेंव्हा तिने तिच्या बहिणीकडे, मरीयेकडे पहिले तेंव्हा जे काम ती प्रेमाने करीत होती, तेच काम तिच्यासाठी एक अवजड आणि असहनीय ओझे बनले होते. मरीया तिला काहीच मदत करीत नव्हती - वरवर पाहता हे स्वार्थीपणाचे वाटेल - पण ती तर प्रभूच्या उपस्थितीत खूप आनंदी पण दिसत होती. आणि प्रभू सुद्धा तिच्यासोबत खूष दिसत होते. मार्थाच्या मनोवृत्तीत काइनाच्या त्या स्वभावाची झलक दिसून येत होती, जी त्याच्यामध्ये त्याच्या लहान भावाबाबत होती. जेंव्हा एखादी बहिण आपल्याच घरी कामाच्या ओझ्याने दबलेली असताना घरातील इतर लोक कामाच्या ओझ्यापासून दूर राहून परमेश्वराच्या संगतीत आनंदित असलेले दिसतात तेंव्हा ते पाहणे एका बहिणीसाठी सोप्पे नसते.

आपणही मार्था सारखे चिडचिड्या स्वभावाचे आहोत का ? मार्था एक नाजूक पात्र होती. आपण सगळ्या बहिणीसुध्दा अशाच असतो. मार्था थकलेली सुद्धा होती. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीही कुरकुर करणाऱ्या, इतरांचा न्याय, तुलना, मत्सर करणाऱ्या आणि स्वतःला दयेचे पात्र बनविणाऱ्या तिच्या त्या आत्म्याचे समर्थन करु शकत नव्हते.

जेंव्हा आपण ओझ्याने दबलेले असतो, तेंव्हा आपण परमेश्वराकडे जाऊ शकतो जो आपल्याला असे म्हणत आमंत्रित करतो,

''अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवांना विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. '' (मत्तय ११:२८-३०)

परमेश्वर आपल्या सिंहासनावर आहे हे स्विकारुन आपण आपल्या सर्व कार्यांमध्ये त्याच्या सम्मुख राहू शकतो, आणि त्याला आपले सर्व ओझे आणि समस्या ठाऊक आहेत ह्या गोष्टीने पूर्णपणे निश्चिन्त होऊ शकतो. त्यामुळे आपण आपले काम एका शांत मनस्थितीत आणि अशा आत्म्याने करु शकतो जो मुक्त आहे - मुक्त आहे इतरांवर प्रेम करण्यासाठी आणि आशिर्वाद देण्यासाठी, अगदी त्यांच्यावरही ज्यांचे जीवन इतके सुखवस्तू असते कि ते जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतात, आणि जे पाहिजे ते करु शकतात.


''येशू मार्थेला म्हणाला, ' थोडक्याच गोष्टींचे अगत्य आहे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही".

ही एक समाधानाची बाब आहे कि आपल्याला मार्था किंवा मरीया सारखे बनण्याची निवड करायची नाही आहे. आपण दोघींप्रमाणेही बनू शकतो. आपण हे वाचतो की लाजराला मृत्यूमधून जिवंत केल्यावर, त्यांनी पुन्हा एकदा त्याच घरात जेवणावळ केली होती, आणि ''मार्था वाढत होती'' (योहान १२:२) आणि मरीया पुन्हा येशूच्या चरणापाशी बसली होती. पण ह्या वेळेस मार्थेची काहीच तक्रार नव्हती. ती आनंदात होती, कारण ती तिच्या सेवेच्या दरम्यान विसाव्यात कसे रहावे हे शिकली होती.

ती कदाचित स्वयंपाकघरात काम करीत असतानाही ''येशूच्या चरणापाशी बसायला शिकली होती '. आपणही, आपल्या घरकामात व्यस्त असताना, आपल्या जगिक कामांच्या मध्येही ह्या आनंदाच्या परीपूर्णतेचा अनुभव घेऊ शकतो. आपण आपल्या परिवारासाठी घरातील आवश्यक कामे करीत असतानाही 'येशूच्या चरणापाशी बसू शकतो. आपले दैनंदिन काम नव्हे तर तक्रारीच्या आणि मत्सराच्या आत्म्याद्वारे येणारी अशांती आपल्याला परमेश्वराच्या चरणापाशी बसण्यापासून दूर नेते. संपूर्ण पृथ्वी परमेश्वराचे पादासन आहे, म्हणून आपण कुठेही त्याच्या चरणापाशी बसू शकतो.

''खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे, दूध तुटलेले बाळक आपल्या आई बरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे. ''(स्तोत्र १३१:२) एक दूध तुटलेले बालक, आपल्या आईच्या कुशीत कसल्याही अस्वस्थते शिवाय आणि स्वार्थी अपेक्षेशिवाय अगदी निश्चिंतपणे पडून रहाते. आपणही असे बनू शकतो कारण जेंव्हा आपण परमेश्वराशी जोडलेले असतो, तेंव्हा आपल्याला जाणवेल की घरातील कामकाज करीत असतानाही तो आपल्यासोबत आहे.

"खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा (आणि जर परमेश्वराने माझ्यासाठी हीच जागा निवडली असेल, तर माझे घर हेच त्याचे पवित्र मंदिर आहे) (दुसऱ्या कोणत्याही जागी घालवलेल्या)सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे! दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ (किंवा एक व्यस्त पत्नी आणि आई) होणे मला इष्ट आहे. महाला मध्ये (चैन आणि आराम... माझ्या जीवनासाठी त्याच्या इच्छे बाहेर) रहाण्यापेक्षा उत्तम आहे... कारण परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. " (स्तोत्रसंहिता ८४:१०, ११) _ मग ते माझे खऱ्या मार्गाने चालणे असो, घरामध्ये कितीतरी तास उशिरा पर्यंत काम करणे असो किंवा आजारी मुलांबरोबर त्यांची देखभाल करीत रात्री उशीरा पर्यंत जागे रहाणे असो.

परमेश्वर आपल्याला म्हणतो "मी सदैव तुझ्याबरोबर आहे. मी तुला कधीही सोडणार नाही व टाकणार नाही"

आपल्या परमेश्वराने नवीन करारामध्ये आपल्या बहिणींना दिलेली ही एक खुशखबर आहे: की आपण काहीही करीत असलो, तरीही तो सदैव आपल्या सोबत आहे. आणि म्हणून आपण त्याला कायम भेटू शकतो, आपल्या घरामध्ये देखील.


स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही (स्तोत्रांसहित ७३:२५) केवळ परमेश्वराच्या उपस्थितीची आवश्यकता आहे जसे की मॅडम गुयॉनने अगदी योग्यरीतीने सांगितले आहे -


जरी एखादी जागा आपण शोधली, किंवा एखाद्या जागेपासून आपण दूर गेलो,

तरीही आपल्या जीवाला कशातही सुख मिळत नाही;

पण जेंव्हा माझ्या सोबत परमेश्वर मला मार्ग दाखवतो,

तेंव्हा जगणे किंवा मरणे दोन्ही एक समान होऊन जाते.


पण जाऊ शकते का मी अशा जागी, जिथे तू नाहीस

ह्या विचारांनीच माझा थरकाप होतो;

दूरवर पाहिले तरीही, अशी जागा दृष्टीस पडत नाही.

परमेश्वर आहे सर्वत्र, हा दिलासा आहे मला


जुन्या करारा मधील संदेष्ट्ये परमेश्वरा समोर आरोळी मारुन म्हणाले, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केंव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? '' (स्तोत्रसंहिता ४२: १,२) परंतु आज, आपण परमेश्वराला कायम आपल्या सोबत उभे राहिलेले अनुभवतो- अगदी आपल्या स्वतःच्या घरात. ही किती आशीर्वादीत गोष्ट आहे !


धडा 12
परमेश्वराची मंद वाणी

"माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे…
मग मला भयाने अस्वस्थ होण्याची काय गरज आहे ?" (स्तोत्र ६२:१-२)


आपण कधीच निराश झालो नाही का ?


आपल्याला कधी कठीण परिस्थिती पासून पळून जाण्याची इच्छा झाली नाही का?


महान संदेष्टा एलीयालाहि एकदा तसे वाटले होते. जेंव्हा इस्राएल मधील सर्व लोक मागे फिरले होते तेंव्हा तो एकटाच परमेश्वरासाठी उभा राहिला होता (१राजे १८) पण त्या महान विजयानंतर तो त्याची नियोजित जागा सोडून पळून गेला होता. तो ५०० किलोमीटर पळून गेला होता आणि अखेर तो स्वतः होरेब पर्वतावर भूकंप, वादळ आणि अग्नी मध्ये सापडला होता (१राजे१९).

परंतु ह्या सगळ्या पेक्षाही एक मोठे वादळ त्याच्या स्वतःच्या हृदयामध्ये होते.

परंतु त्या पर्वतावर एलिया एकटाच नव्हता. जेंव्हा तो कर्मेल पर्वतावर परमेश्वराच्या बाजूने उभा होता, तेंव्हा जसा परमेश्वर त्याच्यासोबत होता तसाच तो भयाने आणि निराशेने पळून चालला होता तेंव्हाही परमेश्वर त्याच्यासोबत होता.

आई म्हणून, आपणही काही वेळेला अशा परिस्थितीत सापडतो जेंव्हा आपल्या हृदयात सुद्धा मोठे वादळ उठलेले असते आणि आपल्यालाही कुठे तरी पळून जावे असे वाटते. परंतु आपला स्वर्गिय पिता इतका कनवाळू आहे की तो आपल्या सोबत उभा रहातो, आपल्याशी सौम्यपणे बोलतो, आणि मग जरी आपण एलिया सारखे जीवनाला कंटाळलेले असलो, तरीही तो आपल्याला प्रोत्साहित करतो.

अशा वेळेस आपण आपल्याला अंतःकरणातील आपली कीव करणारा वादळी आवाज ऐकण्यास नकार दिला पाहिजे, कारण तो आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी करायला आणि बोलायला भाग पाडतो की ज्यासाठी नंतर आपल्याला पस्तावा होईल. त्याऐवजी निराशेमध्ये एलियाने जे केले होते तसेच आपणही करावे: "एक शांत, मंद वाणी" ऐकावी (१राजे १९:१२). वादळ आणि भूकंप ह्यांच्यावर प्रभूत्व असणारा परमेश्वर जो पाप्यांचा मित्र आहे, जो आपली प्रत्येक कमजोरी जाणतो, आणि जो आपल्या बरोबर बोलू इच्छितो, त्याची शांत, मंद वाणी हीच केवळ आपल्या जीवाला दिलासा देऊ शकते. वादळ शांत होईल आणि आपल्या मनामध्ये शांतीचे राज्य येईल.

दाविद म्हणतो "मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी पहाटेचे पंख धारण करुन समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला धरुन ठेवील... हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात!त्यांची संख्या किती मोठी आहे! ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेंव्हाही मी तुझ्याजवळच असतो" (स्तोत्र १३९:७, ९, १०, १७, १८) तू सदैव माझ्याविषयी विचार करतोस.

"तुम्हास शांती असो, भिऊ नका, मी आहे". येशू त्याच्या शिष्यांना, त्याच समुद्रावर आणि समुद्रातील लाटांवर चालत असताना, जेंव्हा लाटा आपल्याला बुडवून टाकतील असे वाटून ते घाबरले होते तेंव्हा सौम्यपणे म्हणाला. आणि अगदी त्याच क्षणी समुद्र शांत झाला आणि तो आजही तसाच आहे - आपल्या जीवनातील अशा प्रत्येक वादळाला शांत करणारा, जे वादळ आपल्यामध्ये भय किंवा नैराश्य उत्पन्न करीत असते. "तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे". (स्तोत्र १८:३५)

आपल्याला लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागतो का ? तर मग तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा (इब्री १२ :३)

आपल्या अगदी मित्र - मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून सुद्धा आपण जे शत्रुत्व, द्वेषभाव सहन करतो, तेंव्हा हा केवळ त्या गोष्टीचा संकेत असतो की आपण योग्य मार्गावर आहोत. त्या मार्गावर, आपण आपल्या आधी गेलेल्या येशूला पाहतो - त्याने देखील द्वेष सहन केला, परंतु स्वतःची कीव करणे, टीका करणे किंवा तक्रार करणे ह्याला शरण गेला नाही, पण त्याऐवजी त्याने बऱ्याने वाईटाला जिंकले. जेंव्हा त्याने दुःख सहन केले, तेंव्हा त्याने धमकावले नाही, तर त्याला दोष देणाऱ्यांना क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. त्याने आपल्या स्वर्गीय पित्याची मंद वाणी ऐकली आणि आपला दावा त्याच्याकडे सोपवून दिला.


आपला पिता प्रत्येकजण जे बोलतो आणि करतो त्या सगळ्या गोष्टी पाहतो, तो एक दिवस सगळ्या गोष्टींचा न्याय धार्मिकतेने करील आणि त्याच्याकडे कसलाही पक्षपात नाही कारण त्याला प्रत्येक परिस्थितीतील पूर्ण सत्य ठाऊक आहे.

येशूने जे केले तसेच आपणही केले, तर मग आपण स्वतःची कीव करणाऱ्या प्रत्येक भावनेवर विजय मिळवू शकू, आणि ह्या गोष्टीने आनंदित होऊ शकू की आपण त्याच्या दु: खात सहभागी झालो आहोत. मग आपणही सगळे अपमान, बदनामी, निंदा, आरोप, मागण्या, स्व-संरक्षण, स्वतः समर्थन, आणि स्वतःची कीव करणाऱ्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आणू शकू.


तर मग परमेश्वराला आपले स्व -जीवन अशा अग्नी - परीक्षांनी भरडू देण्याची अनुमती द्यावी. आपल्या ह्या स्व-जीवनाच्या मरणातून परमेश्वराच्या गौरवासाठी पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा सुगंध दरवळेल. आणि आपण त्याला असे म्हणताना ऐकू, " तू माझी प्रिय मुलगी आहेस, जिच्यावर मी अतिशय प्रसन्न आहे". स्वीकृतीचे हे शब्द आपले सर्वात मोठे प्रतिफळ असेल.


म्हणूनच मग शांतीचे राज्य आपल्या अंतःकरणामध्ये सदैव नांदो, कारण ते आता परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो ; (हबक्कूक. २:२० ; जखऱ्या- २: १३).


आपल्याला डिवचत असतानाही जर आपण अशी निश्चलता, शांतता आणि मौन राखू शकलो, तर आपण आपल्या परमेश्वराची खरी सेविका आहोत हे सिद्ध करु शकतो. जो पिलाताला म्हणाला होता, "माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर … माझ्या सेवकांनी लढाई केली असती (योहान १८:३६).

येशू राजा आहे. सांसारिक असलेले सर्व पिलात आणि त्यांचे सैन्य आपल्या देवाचे गुलाम आहेत. आणि आपल्या लोकांसाठी ज्याने शतकांपूर्वीच, "शापाचे रुपांतर आशीर्वादात केले होते", तो अगदी आजही आपल्यासाठी तसेच करु शकतो (अनुवाद २३: ५).

परमेश्वर आपल्याला आमंत्रित करीत म्हणतो की :

"शांत व्हा (विसावा घ्या, संघर्ष थांबवा आणि जाऊ द्या) आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे" (स्तोत्र ४६:१०)

होय, परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचे सर्व अधिकार आत्ताही त्याच्याच हातात आहेत. तो आपला निर्माणकर्ता, मुक्तिदाता, स्वामी आणि प्रभू आहे. जे सर्वकाही तो आपल्या मार्गात पाठवितो येऊ देतो ते पहिले करिंथ १०:१३ आणि रोम ८:२८ च्या सुक्ष्म गाळणीने दोनदा गाळलेले असते, म्हणून आपण सदैव विसाव्यात राहू शकतो.


युद्धाच्या मध्यभागी, जेंव्हा भट्टीची आग सर्वाधिक तीव्र होईल, तेंव्हा आपल्याला त्याची मंद वाणी हे सांगताना ऐकू येईलः

माझी कृपा, ह्या परिस्थितीत देखील तुला पुरेशी आहे. तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे मी तुला मोहात किंवा परीक्षेत पडू देणार नाही. तू ज्याचा सामना करीत आहेस, तुझ्यासाठी त्या सर्वगोष्टी मिळून कल्याणकारकच होतील असे मी करीन - तुला अधिकाधिक माझ्या समानतेमध्ये बनविण्यासाठी.

होय, आपल्यातील सर्वात दुर्बळ बहीणही ह्यातून विजयी होऊन बाहेर पडू शकते.


"तुझे दवबिंदू हळूवारपणे पडत राहो

आमच्या प्रयत्नांचा सगळा जोर संपत जाओ,

आमच्या जीवातील सर्व ताण आणि तणाव दूर होवो.

आणि आमचे नियोजित जीवन कबूल करो -

तुझ्या शांतीचे सौंदर्य."


धडा 13
लोटाच्या पत्नीची आठवण करा

त्याकाळच्या सर्वात समृद्ध शहरांपैकी एका शहराच्या बाहेर भग्नावशेषांमध्ये असलेला एका स्त्रीचा मिठाचा पुतळा सर्व काळातील महिलांना एक विशेष संदेश देतो.

परमेश्वराचे हे शब्द, "लोटाच्या बायकोची आठवण करा" (लूक १७:३२) ही आपल्या सर्वांसाठी एक चेतावणी आहे.

लोटाच्या बायकोने जेंव्हा मागे वळून पाहिले, तेंव्हा ते एका अशा जीवनशैलीचे शेवटचे कार्य होते, ज्याद्वारे तिने तिच्या कुटुंबांचा आधीच नाश केलेला होता. आणि तिचा पती लोट, (सदोम मधील)"अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला होता; तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता " (२ पेत्र २:७, ८) पण जसे तिच्या पतीला जाणवायचे तसे त्या स्त्रिला सदोमा विषयी काहीही जाणवत नव्हते. आणि हीच ह्या परिवाराची शोकांतिका होती.

तिच्यामध्ये परमेश्वराचे कसलेही भय नव्हते, म्हणूनच ती आपल्या मुलींना सुद्धा परमेश्वराचे भय धरायला शिकवू शकली नाही. कदाचित तिच्या मुली मोठ्या होत असताना ती तिच्या सामाजिक जीवनात खूप व्यस्त राहिली‌ असावी.


ती एका प्रतिष्ठित व्याप्याऱ्याची पत्नी होती आणि तिच्या मुलींनाही सदोमच्या समाजामध्ये स्विकारले गेले होते ह्याचा तिला अभिमान होता. तिच्या पतीच्या सर्व प्रकारच्या आक्षेपांना झुगारुन तिने आपल्या मुलींना सदोमची जीवनशैली आणि फॅशन स्विकारण्यास, आणि नंतर सदोमच्याच दोन चलाख तरुणांशी लग्न करण्यास परवानगी दिली असणार. अशाप्रकारे तिने आपल्या मुलींचा नाश केला होता.


चार हजार वर्षांच्या त्या जुन्या मीठाच्या खांबापासून सर्व मातांना एक इशारा दिला जात आहे: आपल्या मुलां समवेत वेळ व्यतीत करा. लोटाच्या पत्नीची आठवण करा.

लोटाच्या पत्नीचे धन हे तिच्या भौतिक वस्तूंमध्ये होते. म्हणून तिचे मनही तिकडेच लागलेले होते. आपण माता, आपल्या घरातल्या इतक्या भौतिक वस्तूंद्वारे कामकाज करीत असतो, की मग आपण सहजपणे अन्न, कपडे आणि घरगुती वस्तूंना फारच मौल्यवान समजू लागतो.


म्हणून, मीठाच्या त्या खांबावरुन आपल्याला आणखी एक इशारा मिळतो: ज्या गोष्टी दिसतात, त्या क्षणिक आहेत. लोटाच्या पत्नीची आठवण करा.


सदोममधील आपल्या जगिक मित्रमंडळी पासून विभक्त होणे कदाचित लोटाच्या पत्नीस फार कठीण जात होते. बर्‍याच बहिणी परमेश्वरासाठी निरुपयोगी असतात, कारण त्यांची चांगली मित्रमंडळी ही त्यांचे जगीक नातेवाईक आणि शेजारीपाजारी असतात आणि त्या त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्याशी व्यर्थ बोलण्यात घालवतात.

अशा बहिणींसाठी देखील हा इशारा आहे: वाईट संगत परमेश्वराच्या बाबतीतली तुमची साक्ष नष्ट करु शकते. लोटाच्या पत्नीची आठवण करा.

कदाचित आपल्या भूतकाळातील काही अपयशाचे ओझे आपल्यावर दबाव टाकत असेल, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीने दिलेले दु:ख किंवा विश्वासघात असू शकतो जो आपण विसरु शकत नाही. किंवा एखादी अशी वेदना किंवा त्रासही असू शकतो, जो इतरांना ऐकवून आपल्याला त्यांची सहानुभूती मिळाल्याने आनंद प्राप्त होतो.

ते काहीही असो, मागे वळून पहाणे नेहमीच धोकादायक असते. कारण त्यामुळे आपली सर्व आध्यात्मिक प्रगती थांबून आपली घसरण होते मिठाचा खांब, जेंव्हा की चर्चमध्ये आधारस्तंभ होणे आपल्याला शक्य होते. (होय, देवाचे वचन सांगते की जर बहिणींनी पापावर विजय मिळवला तर त्या देखील मंदिरातील स्तंभ बनू शकतात) (प्रकटी. ३:१२).


म्हणून, आपण चेतावणीकडे लक्ष द्यावे: भूतकाळ विसरुन जावा. त्याचा जास्त विचार करु नये. लोटाच्या पत्नीची आठवण करा.

"आपला जीव घेऊन पळ! मागे पाहू नकोस व खोऱ्यात कोठे थांबू नकोस, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल" अशी दूतांची हाक लोटाच्या कुटुंबाला होती (उत्पत्ती १९ :१७). स्वर्गातून आपल्यालाही आज अशी पाचारणाची हाक आहे. चला तर मग आपण भूतकाळात नव्हे तर परमेश्वरा सोबत पर्वत शिखरावर राहू आणि पृथ्वीवरील त्या गोष्टींवरची आपली घट्ट पकड सोडून देवू, ज्या एके दिवशी आपण तशाही मागे सोडून जाणार आहोत.


लोटाच्या पत्नीची आठवण करा.


धडा 14
आशेचे एक द्वार

"तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला... " (प्रकटीकरण २:२१)


जेंव्हा आपण हे वचन वाचतो, तेंव्हा आपल्या मनात एक जगिक पिता आपल्या मुलीने जर पश्चाताप केला नाही तर तिला त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत आहे असा विचार येतो का ?

नाही. असे नाही आहे. हा स्वर्गीय पित्याचा आवाज आहे जो आपल्या मुलीवर प्रेम करतो आणि जो तिच्यासाठी आशेचे एक द्वार उघडतो, आणि तिच्या चुका सुधारण्यासाठी उपाय दाखवतो. त्याची मनिषा आहे की तिने पश्चात्ताप करावा आणि म्हणून तो तिला वेळ देत आहे.

आपण पित्याला असे म्हणताना ऐकतो :

"मी तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन, आणि तिच्या दु:खाच्या दरीचे आशेच्या द्वारात रुपांतर करीन". (होशेय- २:१५)

एक अन्य "स्त्री" - हव्वे विषयी विचार करा. निश्चितच, परमेश्वराने तिला तिच्या आज्ञाभंगाबद्दल शिक्षा केली होती. परंतु शिक्षेच्या शब्दांबरोबरच तिच्यासाठी आशेचे द्वार देखील उघडले - तिच्या पापांच्या क्षमेसाठी. उपाययोजना, एका गौरवशाली दिवसाची आशा जेंव्हा तिचे बीज शत्रुचे डोके चिरडून टाकेल. फसवणूक करणार्‍यावर कारवाई केली जाईल आणि तिच्या मुलांना देवाच्या राज्याचे वारस होण्याची अद्यापही आशा असेल.

आणखी दुसऱ्या एका " स्त्रीचा " विचार करु - इस्राएल आणि यहुदाच्या गर्विष्ठ मुली ज्या मूर्तिपूजेच्या मागे लागल्या होत्या. परमेश्वराने त्याच्या दयेने आणि कृपेने पाठविलेल्या त्या संदेष्ट्यांद्वारे वारंवार चेतावणी देऊन सुध्दा त्यांनी त्यांची अंत: करणे कठीण केली आणि परमेश्वराची अवहेलना केली. म्हणून त्यांना कैद करुन नेण्यात आले आणि त्यांची पांगापांग करण्यात आली. तथापि, त्यांचा निषेध करताना, देवाने त्यांच्यासाठी आशेचे द्वार देखील उघडले आणि भविष्यात त्यांची पुन:स्थापना करण्याचे आश्वासनही दिले (यिर्मया २९ : ११).

असे परमेश्वराचे असीम प्रेम आहे. अगदी त्याच्या सर्वात कठोर निवाड्यातही, तो कायम आशेचे द्वार उघडतो.


जसे फ्रेडरिक फेबरने म्हंटले आहे,


"स्वर्गाशिवाय अशी कुठलीही जागा नाही

जिथे सर्वात जास्त आपल्या वेदेनची जाणीव आहे

असे कोणतेही ठिकाण नाही

जिथे आपल्या सर्व चुकांना दयाळूपणे न्याय मिळेल ."

म्हणूनच, आता आपल्याला जो समय देण्यात आलेला आहे तो आपण, परमेश्वराची थट्टा करणारी आणि त्याच्या संदेष्ट्यांचा द्वेष करणारी ती दुष्ट "खोटी संदेष्ट्री" ईजबेल हिच्यासारखा दुष्टपणासाठी नव्हे, तर त्या समयाचा आपल्या पश्चातापासाठी उपयोग करायचा आहे. आणि जिच्याविषयी परमेश्वराला असे म्हणावे लागले की, " पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही" (प्रकटी. २:२१).


त्याऐवजी आपण त्या पश्चातापी स्त्री सारखे असले पाहिजे जिच्याविषयी प्रभू म्हणतो, "ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली " (लूक ७: ४७).

परमेश्वराने आपल्या प्रत्येकीसाठी "आशेचे एक द्वार" उघडले आहे - अगदी अशा त्या पत्नींसाठी आणि मातांसाठीही ज्या सर्वात जास्त असफल ठरल्या आहेत आणि ज्यांनी आपले जीवन उद्ध्वस्त करुन टाकले आहे !! जर तुम्ही केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवला तर अगदी आत्ताही तो तुमच्या जीवनासाठी असलेली त्याची योजना पूर्ण करु शकतो. आपल्या परमेश्वरासाठी काहीही अशक्य नाही. केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा.

जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते कधीही निराश होणार नाहीत.

जसे माझे पती वारंवार सांगतात,

"सैतानाच्या विरोधात परमेश्वर सदैव आपल्या बाजूने आहे".हालेलूया! आमेन!


धडा 15
परिशिष्ट १ - बाळाच्या आगमनाची तयारी करणे

नवविवाहित पत्नीला जेंव्हा जाणवते की ती आई होणार आहे, तेंव्हा तिने डॉक्टरांकडे जायला हवे. गर्भधारणेची प्राथमिक लक्षणे आहेत : मासिक पाळी बंद होणे, मळमळ आणि उलट्या होणे, वारंवार लघवी होणे आणि स्तनांमध्ये बदल होणे इत्यादी.


मुलाच्या जन्माची अपेक्षित तारीख मागील महिन्याच्या मासिक पाळीच्या तारखेपासून नऊ महिने आणि सात दिवस असते.

आई किंवा वडिलांच्या शरीरप्रकृती मध्ये कदाचित अशा काही गोष्टी असू शकतात ज्यावर उपचार करणे आवश्यक आहे. आई-वडिलांचे काही आजार स्पष्ट दिसून येत नसतील पण कदाचित त्यांचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यापैकी काही आजार बरे होऊ शकतात. म्हणून, जर तुम्हाला काही शंका असतील तर वैद्यकीय तपासणी करणे उत्तम आहे. अर्थातच, गर्भावस्था म्हणजे काही आजार नाही ! परंतु जर तुम्ही आरोग्य आणि आजारपण ह्यांच्या काठावर असाल तर गर्भावस्थेमुळे तुमची तब्येत बिघडू शकते. चांगले पौष्टिक जेवण आणि आरोग्यदायी स्वछतेच्या सवयी अतिशय आवश्यक आहेत. आणि त्यासोबतच आपल्या मनाचे स्वास्थ्यही आवश्यक आहे. परमेश्वराच्या वचनाचे मनन केल्याने तुमच्या मनातील अस्वस्थता दूर होऊन तुमची आणि तुमच्या जन्मणाऱ्या बाळाची प्रकृतीही चांगली राहू शकते. कधी कधी सकाळच्या वेळी तुम्हाला बायबल वाचताना खूप थकवा जाणवेल आणि आजारी असल्यासारखे वाटेल. तेंव्हा केवळ एखाद्या वचनावर मनन करावे किंवा रोजची भाकर किंवा उपासना- गीते ह्यासारखी चांगली पुस्तके वाचावीत. तुमच्यासोबत प्रार्थना आणि मनन करायला तुमच्या पतीलाही वेळ काढण्यास तुम्ही सांगू शकता.


भोजन

तुम्ही जे खाता त्याद्वारे तुमच्या गर्भातील बाळाचे पोषण होत असते. म्हणून तुमच्या रोजच्या आहारामध्ये साधारणपणे खालील गोष्टी असाव्यात:


 • तांदूळ, गहू किंवा इतर धान्य

 • दोन ते चार ग्लास दूध

 • अंडी, मांस किंवा मासे

 • चणे आणि डाळी - मोड आलेली कडधान्ये खूप चांगली असतात.

 • दही

 • भाज्या - पालेभाज्या आणि फळ भाज्या


 • स्निग्ध पदार्थ आणि तेल

 • ताजी फळे आणि सुकामेवा.


शाकाहारी लोकांनी मांस- मासे ह्याऐवजी दही आणि डाळी ह्यांचे अधिक सेवन केले पाहिजे. तांदूळ, गहू आणि स्निग्ध पदार्थ हे वजन वाढवणारे असतात, म्हणून त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. बाळाची हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी तुमच्या भोजनासोबतच मल्टी-व्हिटॅमिन, आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या देखील घ्याव्यात. अतिरिक्त मीठ आणि बाहेरचे अतिरिक्त खाणे तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांकडचे तळलेले पदार्थ टाळावेत.


गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत, तुम्हाला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या गोळ्या जरुर घ्याव्यात आणि सहाव्या महिन्यानंतर टिटॅनसची लस घ्यावी.


ताजी हवा

वेळोवेळी आपल्या गुदमरणाऱ्या स्वयंपाकघरातून (किंवा कार्यालयातून) बाहेर पडावे आणि परमेश्वर निर्मित ताज्या हवेमध्ये मोकळा श्वास घ्यावा. त्यामुळे तुम्हाला खूपच उत्साहवर्धक वाटेल.


संध्याकाळी आपल्या पतीबरोबर फिरायला जावे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पतीला हलके आणि ताजेतवाने वाटेल! चालताना मात्र ताठ चालण्याचा प्रयत्न करावा.


व्यायाम

शारीरिक व्यायामामुळे तुमचे पचन आणि झोप नीट होते, बद्धकोष्ठता टळते आणि सगळ्या स्नायूंना निरोगी स्थितीत राखण्यास मदत मिळते. त्यामुळे दिवस भरल्यानंतर तुम्हाला बाळास जन्म देणे सोपे जाईल. तेंव्हा घरातील कामे करणे थांबवू नका - मात्र आवश्यकतेपेक्षा अधिक कामाच्या थकव्यापासून स्वतःची काळजी घ्यावी. छाती आणि पोट विस्तारित करणे, दीर्घ श्वसनाचे व्यायाम हे देखील चांगले असते. कधीकधी जमिनीवर मांडी घालून बसणे हे ओटीपोटाच्या स्नायूंसाठी चांगले असते. पाठीवर दबाव देणे टाळावे. भारी वस्तू उचलणे टाळावे. वाकताना, आपल्या गुडघ्यात वाकून आपली पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा.


स्वच्छता आणि आराम

स्वत: ला संपूर्णपणे स्वच्छ राखण्याची काळजी घेण्यासाठी आपण दररोज आंघोळ केली पाहिजे

संपूर्णपणे विश्रांती घेण्यासाठी रात्रभर छान झोप घ्यावी, आणि शक्य असल्यास दुपारच्या जेवणा नंतरही एक तास विश्रांती घ्यावी. आपल्या दिनचर्येमधून थोडा वेळ काढून एखादे फळ किंवा एक वाटी दही खावे. आपल्याला ज्या कामांनी खूप थकवा येतो ती कामे कमी करावीत.


आपल्या पतीची भूमिका

गर्भधारणा हा स्त्रीसाठी एक भावनिक दबावाचा काळ असतो. एक समजूतदार आणि संवेदनशील पती आपल्या पत्नीचे जीवन आरामदायी बनवू शकतो. त्यामुळे, तुम्ही तुमच्या समस्या तुमच्या पतीकडे व्यक्त करु शकता. लक्षात असू द्यावे की " तुम्ही उभयता जीवनरुपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात" (१ पेत्र ३:७). बर्‍याच पुरुषांना गर्भधारणेच्या मानसिक आणि वैद्यकीय पैलूंबद्दल अधिक माहिती नसते. तुमच्या पतीला सोबत घेऊन डॉक्टरांकडे जात जा जेणेकरुन अशा वेळी आपण कशी भूमिका निभावली पाहिजे हे तुमच्या पतीला देखील समजू शकेल.


काही "वर्जित गोष्टी"

 1. थकवा आणि मानसिक दबाव टाळावा.

 2. अचानक दबाव आणि तणाव निर्माण होईल किंवा पडण्याचा धोका असेल किंवा वजनदार वस्तू उचलावी लागेल अशी परिस्थिती येऊ देऊ नये.

 3. गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यांत लांबचा, धक्के बसतील असा प्रवास करणे टाळावे. कमीतकमी प्रवास करणे हेच चांगले आहे. वेळोवेळी आपले पाय उंचावर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 4. बद्धकोष्ठता टाळावी, भरपूर फळे खावीत आणि भरपूर पाणी प्यावे.

 5. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी किंवा झोपेसाठी डॉक्टरांना न विचारता कोणतेही औषध घेऊ नये.

 6. खूप घट्ट कपडे वापरु नयेत आणि पायाला त्रासदायक अशी पादत्राणे वापरु नयेत.

 7. गरोदरपणात बारीक होण्याचा प्रयत्न करु नये.

 8. ज्यांना कांजण्या, गोवर किंवा इतर कोणताही संसर्गजन्य रोग झाला आहे अशा लोकांच्या निकट संपर्कात रहाणे टाळावे. एक्स-रे काढणे टाळावे, तथापी काही कारणास्तव जर तुम्हाला एक्स-रे काढावा लागला तर तुमचे पोट लीड स्क्रीनने झाकलेले आहे ना ह्याची खात्री करुन घ्यावी.


प्रसूती-पूर्व तपासणी

तुम्ही डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेले पाहिजे.

अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या डॉक्टरांना आपण त्वरित सांगितल्या पाहिजेत :

 • कोणत्याही वेळी होणारा तपकिरी रंगाचा स्त्राव किंवा रक्त-स्त्राव

 • सहाव्या महिन्यानंतर: भयंकर डोकेदुखी, अंधुक दृष्टी, पाय सूजणे, लघवी कमी होणे, अतिरिक्त वजन वाढ (गर्भधारणेच्या तिसर्‍या महिन्यानंतर १. ५ ते २ किलो वजन वाढणे सामान्य असते) बाळाची हालचाल कमी होणे, पोटदुखी आणि उलट्या होणे, पायावर किंवा तोंडावर सूज येणे.


काही सोपे उपचार

सकाळी उठताना जीव घाबरा होणे : आपल्या सामान्य वेळेच्या अर्धा तास उशीरा उठणे. एक कप पाण्यात एक चतुर्थांश चमचा सोडियम बायकार्बोनेट घालून गुळण्या करणे, आणि एक ग्लास लिंबूपाणी प्यावे. तेलकट पदार्थ खाऊ नयेत.


पायाच्या दुखण्याकरिता: वळणे आणि खाली वाकणे टाळावे आणि आपण बसू शकत असल्यास उभे रहाणे टाळावे. रात्री झोपायच्या आधी अर्धा तास आपले पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास आराम मिळेल.


 • नसांच्या फुगीरपणासाठी: प्रसूती नंतर तो फुगीरपणा सहसा आपोआप नाहीसा होतो. एक सोपा उपचार म्हणजे आपल्या पाठीवर पडून आणि आपले पाय वर करुन, आपल्या टाचा काही मिनिटांसाठी भिंतीवर टेकवून ठेवाव्यात. हे दिवसातून बऱ्याच वेळा करु शकता. जास्त वेळ उभे रहाणे टाळावे. काहीवेळा इलॅस्टोक्रेप -पट्टी देखील फायदेशीर ठरु शकते.


प्रसूतीची वेळ

प्रसूतीच्या वेळेची ही सामान्य लक्षणे आहेत: गर्भाशयाचे नियमित आकुंचन जे वेदने बरोबर प्रथम पाठीच्या खालच्या भागामध्ये सुरु होऊन पुढे पोटाच्या दिशेने येते. योनीमार्गातून गुलाबी रंगाचा स्त्राव देखील येऊ शकतो. कधीकधी जोरदार पाण्याचा फवारा देखील येऊ शकतो. जर रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही ताबडतोब रुग्णालयाकडे धाव घ्यावी.


शेवटी

निरोगी बाळाच्या जन्माची आशा करावी आणि देवावर विश्वास ठेवावा कारण बायबल सांगते,

तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यांत त्या राहिल्यास बालकाला जन्म देण्याच्या योगे त्यांचे तारण होईल (१ तीमथ्थी २:१५).


धडा 16
परिशिष्ट 2 - नवजात शिशुची काळजी घेणे

बाळाच्या जन्मानंतर त्वरित त्याची देखभाल डॉक्टर किंवा नर्सच्या निगराणीखाली केली जाते.

त्या नंतर, तुम्हाला तुमच्या बाळाला दरमहा वैद्यकीय तपासणीसाठी न्यावे लागते. डॉक्टर तुम्हाला लसीकरण इत्यादी बाबत सांगतील.


पहिल्या महिन्यात, तुमचे बाळ बऱ्याचदा झोपलेले असेल. त्याच्या गरजा फार थोड्या असतात - झोप, उबदारपणा, आराम आणि दूध पिणे.


झोप

पहिल्या महिन्यात, बाळ कदाचित फक्त दूध पिण्यासाठीच उठेल. मग ते जसजसे मोठे होत जाईल तसतसे ते जास्त वेळ जागे राहू लागेल.

त्याला झोपण्यासाठी एक शांत, छान हवेशीर खोली असावी. माश्या आणि डासांपासून बचाव करण्यासाठी त्याला एका मच्छरदाणी खाली झोपवावे.

त्याला झोका देऊन झोपवण्याची गरज नाही, कारण त्याला त्याची सवय होईल आणि नंतर ही सवय मोडणे फार कठीण होईल.

तुम्ही जर तुमच्या बाळाला त्याच्या पोटावर झोपवले तर त्याला ते जास्त आवडेल.अशा परिस्थितीत, उलट्या झाल्यास ते गुदमरणार नाही आणि पोटदुखीपासून देखील त्याला आराम मिळेल. आणि त्याच्या डोक्याचा आकार देखील चांगला होईल - ते चपटे होणार नाही. पण जेंव्हा ते पोटावर झोपलेले अ‌सेल तेंव्हा तुम्ही वरचेवर त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.


उबदारपणा आणि आराम

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलाच्या शरीरात मोठ्या माणसांप्रमाणे तापमान कायम राखण्याची क्षमता नसते. म्हणून, उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना गरजेपेक्षा जास्त कपडे घालू नयेत.

लोकरीच्या कपड्यांमुळे सुद्धा मुलांच्या त्वचेवर खाज येऊ शकते. म्हणूनच, हिवाळ्याच्या दिवसांत त्यांना उबदार कपडे घालताना आतून सुती कपडे घालावेत. आपल्या बाळाच्या शरीरात पुरेशी उष्णता आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातापायाला स्पर्श करुन ते गार किंवा थंडगार तर पडलेले नाहीत ना हे पाहू शकता.

टोपी घालताना, ती जाळीदार असल्याची खात्री करावी कारण जरी ती त्याच्या तोंडावर आली तरीही, त्याला श्वास घेता येऊ शकेल.

जेंव्हा तुमच्या बाळाला जाग येईल, तेंव्हा ओल्या लंगोटी (डायपर) मुळे ते अस्वस्थ तर नाही ना हे पहावे. लंगोट चोळून स्वच्छ धुवावेत आणि उन्हात वाळवावेत. कारण त्यावरील साबणाच्या अंशामुळे बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. शक्य असल्यास सगळे लंगोट आठवड्यातून एकदा उकळत्या पाण्यातून काढावेत.


बाळाला आंघोळ घालणे

कडक पाण्याची आंघोळ बाळाला अपायकारक ठरु शकते. तुमच्या बाळासाठी टॉवेल आणि साबण वेगळा ठेवावा. नेहमी तेलाने मालिश करुन गरम पाण्याने अंघोळ घालावी आणि वरचेवर गरम पाण्याने पुसून घ्यावे. बाळाला अचानक थंडी वाजू नये म्हणून सांभाळले पाहिजे आणि त्याच्या नाकात, कानात आणि तोंडात पाणी जाणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी.

त्याच्या नाकातील आणि कानातील घाण वारंवार साफ करावी, परंतु त्यांना दुखापत होईल अशा कोणत्याही वस्तू त्यांच्या नाकात किंवा कानात घालू नयेत. जर नाक (ब्लॉक) बंद झाले असेल तर ते पातळ मऊ सुती कापडाच्या पिळवटीने स्वच्छ केले पाहिजे. कानही त्याच प्रकारे साफ करु शकता.

जोपर्यंत बाळाची नाभी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत त्याच्या पोटाशी जोडलेल्या नाळेची काळजी घ्यावी लागेल. तोपर्यंत तुम्हाला तो भाग कोरडा ठेवावा लागेल आणि पोटाच्या त्या भागावर एक स्वच्छ आणि मुलायम पट्टी बांधावी लागेल.

बाळ थोडेसे जरी आजारी असले तरी त्याला पाण्याने आंघोळ घालण्याऐवजी नुसते पुसून घेणे चांगले असते जेणेकरुन त्याला थंडी वाजणार नाही.


दूध पाजणे

आईच्या दुधाला खरोखर पर्यायच नाही! तुमच्या बाळासाठी त्याशिवाय उत्तम दूध असूच शकत नाही. आईच्या दुधामध्ये असे रोगप्रतिकारक घटक असतात जे तुमच्या बाळाचे अनेक संसर्गजन्य रोगांपासून रक्षण करतात. जी मुले आपल्या आईचे दूध पिऊन वाढतात, त्यांचे पोषण खूप चांगल्या प्रकारे होते, ती अधिक समाधानी असतात, त्यांच्यात सुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांना बाटलीने दूध पिणाऱ्या मुलांच्या मानाने पोटाचे, आतड्यांसंबंधीचे संसर्गजन्य आजार सहसा होत नाहीत.

सुरुवातीला, पहाटे ६ :00 पासून मध्यरात्र होईपर्यंत दर तीन-चार तासांनी बाळाला दूध पाजावे. पहिल्या महिन्यानंतर, तुम्हाला जाणवेल की बाळाला रात्रभर झोपायला आवडते. मग तुम्ही रात्री त्याला दूध पाजणे बंद करु शकता. पण जर रात्री त्याला भूक लागली आणि ते रडू लागले तर, त्याला उपाशी ठेवू नये.

दूध पाजणार्‍या आईने स्वतः सुध्दा पौष्टिक आहार घेतला पाहिजे ज्यामध्ये व्हिटॅमिन आणि आयर्नच्या गोळ्याही सामील असाव्यात. तिने दररोज दिवसासुद्धा पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. तिने तिखट मसालेदार अन्न, चॉकलेटस्, बद्धकोष्ठतेचे औषध, झोपेच्या गोळ्या, अ‍ॅस्परिन आणि इतर औषधे घेऊ नयेत कारण ते दुधाद्वारे बाळापर्यंत पोहचून त्याला अपाय होऊ शकतो. छाती दूध पाजण्यापूर्वी आणि नंतर सुध्दा पाण्याने स्वच्छ साफ केली पाहिजे. छातीला दूध लागलेले राहू देऊ नये कारण त्यामुळे पू भरुन सूज येऊ शकते.


बाटलीने दूध पाजणे

जर तुम्हाला पुरेसे दूध येत असेल, तर तुम्ही आपल्या बाळाला सहा ते नऊ महिन्यांचे होईपर्यंत दुधाची बाटली देऊ नये. तुम्हाला जर द्यायचेच असेल तर गाईचे ताजे दूध चांगले उकळून द्यावे. मुलांचे पावडरचे दूध सामान्यत: ताजे आणि जंतूमुक्त असते. परंतु डब्याचे दूध देण्यापूर्वी, कायम त्याची मुदत संपण्याची तारीख जरुर तपासावी. पिण्याचे पाणी देखील उकळून घेतलेले असावे.

शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्रामच्या प्रमाणात, एका बाळाला दररोज १२५ मिली-लिटर ताजे दूध आणि ७५ मिली-लिटर पाण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ ३ किलो वजनाच्या बाळासाठी, दररोज ४०० मिली लिटर ताजे दूध आणि २०० मिली लिटर पाणी, दोन चमचे साखरेसह आवश्यक असते. दिवसभरात हे पाच वेळा विभागले जाऊ शकते. (जर तुम्ही डब्याचे दूध वापरत असाल तर त्यावर लिहिलेल्या सूचनांचे पालन करावे).

बाळ जसजसे मोठे होत जाईल तसतसे त्याला अधिक दूधाची आणि कमी पाण्याची आवश्यकता असेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा जेंव्हा बाळाला अतिसार किंवा ताप असेल तेंव्हा त्याच्या पोटात जास्त पाणी जाऊ द्यावे.

भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये जंतू सहज वाढतात, दुधाची बाटली आणि त्याचे निप्पल्स चांगले उकळून घेतले पाहिजे. नाहीतर बाळाला जुलाब किंवा इतर काही संसर्ग सहज होऊ शकतात. बाटल्या कमीतकमी दहा मिनिटे उकळल्या पाहिजेत आणि त्यांचे निप्पल्स सौम्य मीठाच्या पाण्यात वेगळे उकळावेत. उकळलेल्या बाटलीला आणि निप्पलच्या आतील भागाला तुमचा स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

बाळाला दूध देण्यापूर्वी दूध जास्त गरम नाही ना ह्याची खात्री करुन घ्यावी, नाहीतर त्याची जीभ पोळू शकते !

पहिल्या महिन्यानंतर तुम्ही त्याला व्हिटॅमिनचे थेंब आणि ताज्या फळांचा रस देखील द्यायला सुरुवात करु शकता. रस चांगला गाळलेला आहे ह्याची खात्री करुन घ्यावी.


सामान्य खबरदारी

सर्दी किंवा संसर्गजन्य आजार असलेल्या लोकांना आपल्या बाळाच्या जवळ येऊ देऊ नये. तुम्हालाही जर सर्दी झाली असेल तर बाळाला दूध पाजताना तुम्ही मास्क वापरावा किंवा आपले नाक आणि तोंड झाकून घ्यावे.

खाली अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्याबद्दल तुम्ही डॉक्टरांना कळवावे:

 1. जर बाळाच्या डोळ्यातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव येत असेल तर (लक्षात ठेवा की पहिल्या तीन महिन्यांत बाळाच्या डोळ्यातून अश्रू येत नसतात.)

 2. बाळाच्या त्वचेवर पुरळ दिसत असल्यास.

 3. कावीळ. बर्‍याच बाळांमध्ये तिसर्‍या दिवशी कावीळीची लक्षणे आढळतात, पण साधारणपणे एका आठवड्यात ती नाहीशी होतात. परंतु जर ती टिकून राहिली तर डॉक्टरांना कळवावे.

 4. कधीकधी बाळांच्या निपल्सभोवती सूज येते आणि त्यातून एक पिवळा स्त्राव येण्यास सुरुवात होते. बर्‍याच बाळांमध्ये हे सामान्य असते, परंतु जर ते वाढून त्यात पू झाला असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी.

 5. नाभीमधून घाणेरडा वास किंवा पू येत असल्यास.

 6. तोंड, नाभी, त्वचा, गुदाशय किंवा योनी ह्यापैकी कोणत्याही ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास.

 7. सतत दुर्गंधीयुक्त अतिसार होत असल्यास (सामान्यतः बाळांना पहिल्या तीन महिन्यांपर्यंत, दररोज तीन ते चार वेळा पोटात मुरडा येतो).

 8. बाळाची व्यवस्थित वाढ होत नसल्यास (सामान्यतः बाळाचे सरासरी वजन पाच महिन्यांत दुप्पट आणि एका वर्षात तिप्पट होत असते).

धडा 17
परिशिष्ट ३ - वाढणारे मूल

परमेश्वर जेंव्हा एखाद्या आईला संगोपनासाठी एक मूल देतो तेंव्हा तिच्यासाठी ती एक अद्भूत, पवित्र आणि महान जबाबदारी असते. जर आईने ह्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले किंवा त्याकडे कानाडोळा केला तर ती आयुष्यभर आपल्या मुलाला (शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या) अपंग बनवते. तेंव्हा एका आईला आपली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी किती सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे!

आजकालच्या काळात अशा प्रकारच्या चेतावणीची विशेष आवश्यकता आहे कारण आज आपल्या कुटुंबासाठी अधिकाधिक पैसे मिळविण्याच्या प्रवृतीमधे वाढ झाल्यामुळे, मातांनी आपल्या मुलांना "आया" (मोलकरणीच्या) भरवशावर सोडायला सुरुवात केली आहे. मुलांकडे असे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम नंतरच्या काळात दिसून येतात, तेंव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा करणे अशक्य असते.

एका आईसाठी आपल्या मुलांचे आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यामध्ये संगोपन करणे ह्यापेक्षा दुसरी अधिक पवित्र जबाबदारी कोणतीही नाही.


आहार

तुम्ही जर तुमच्या बाळाला स्तनपान करीत असाल तर बाळाला फक्त व्हिटॅमिन आणि आयर्नच्या थेंबाची आवश्यकता असते. त्याबरोबरच, पहिल्या तीन महिन्यात फळांचा ताजा रस आवश्यक असतो.

बाळ तीन महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला घन आहार द्यायला सुरुवात करु शकता. प्रथम घन आहार म्हणजे तृणधान्य असू शकते. निरनिराळ्या प्रकारची डबाबंद अन्नसामुग्री बाजारात उपलब्ध आहे. त्यापैकी एक सर्वात स्वस्त प्रकार म्हणजे नाचणी आहे.

कृती :- पातळ कपड्यात दोन चमचे नाचणीची पावडर बांधावी आणि कपड्यात फक्त चोथा शिल्लक उरत नाही तोपर्यंत एक कप पाण्यात पिळत रहावे. त्यात एक कप दूध मिसळून हे मिश्रण उकळावे आणि गडद तपकिरी होईपर्यंत ढवळत रहावे. त्यात साखर मिसळून थोडेसे गरम असतानाच बाळाला भरवावे. हे खूप पौष्टिक असते.

बाळ चार महिन्याचे झाल्यावर त्याला चांगले पिकलेले केळ कुस्करुन (सुरुवातीला अर्धा ते एक चमचा) द्यावे. सफरचंदा सारखी इतर फळे देखील शिजवून आणि कुस्करुन देऊ शकता. तुम्ही तांदूळ, नाचणी, गहू, ज्वारी, डाळी, मका, हिरवा हरभरा इत्यादी अनेक धान्यांचे मिश्रण धूऊन, वाळवून त्यांची पावडर बनवू शकता. मग ह्या पावडरची खीर बनवून तुम्ही बाळाला देऊ शकता.

सहा महिन्याच्या बाळाचा दररोजचा आहार थोडाफार असा असू शकतो:

 • सकाळी ६-७ वाजता : आईचे दूध किंवा बाटलीचे दूध.

 • सकाळी ९ वाजता: संत्र्याचा रस (किंवा टोमॅटो किंवा इतर कोणत्याही फळांचा रस). व्हिटॅमिन आणि(iron) आयर्नचे थेंब. धान्य किंवा इडली आणि नंतर काही वेळाने आईचे किंवा बाटलीचे दूध. विविध भाज्या, हिरव्या भाज्यांसह कुकरमध्ये शिजवून सूप बनवावे. हे सूप ठोस अन्नामध्ये मिसळून देऊ शकता.

 • दुपारी १ वाजता: शिजवलेल्या आणि घोटलेल्या भाज्या, गाजर इत्यादी आणि दूध

 • संध्याकाळी ४ वाजता : बिस्किटे

 • संध्याकाळी ६ वाजता: धान्य आणि फळ, आईचे किंवा बाटलीचे दूध

 • रात्री १० वाजता: दूध (जर भूक लागली असेल तर).

बाळ एक वर्षाचे झाल्यावर, त्याच्या अन्नात मांस आणि मासे देखील मिसळू शकता. त्याआधी घोटलेल्या भाज्यांसोबत मटण, चिकनचे सूप ही देऊ शकता. पण दही आणि दुधाचे पदार्थ देणेच चांगले असते. कारण मांस आणि माशातील प्रथिनांमुळे बाळाच्या मूत्रपिंडावर लहान वयातच ताण येऊ शकतो. म्हणून भाज्या, डाळी आणि पालेभाज्यांमध्ये आढळणारी प्रथिने देणे अधिक चांगले असते.

बाळ एक वर्षाचे झाल्यावर, दूधासोबतच न्याहारीमध्ये दोन लहान इडल्या, दुपारी आणि रात्री डाळ, भात आणि भाज्या खाऊ शकला पाहिजे. जर गाईचे दूध देत असाल तर दिवसाला ३०० मिली लिटर पुरेसे असते.


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाला कोणत्याही प्रकारची औषधे, विशेषत: अँटिबायोटिक्स (antibiotics) देऊ नयेत.


बाळाला जेऊ घालणे

१. बाळ तीन महिन्यांचे होईपर्यंत त्याला घन आहार देऊ नये.

२. घन आहार, एका वेळी खूप कमी प्रमाणात देऊन सुरुवात करावी आणि मग हळूहळू वाढवावे.

३. जर बाळाला आवडत असेल तर ६ महिन्यानंतर त्याला कपाने पातळ पदार्थ देणे सुरु करावे (जर त्याने सांडवले, तर निराश होऊ नका, तो हळूहळू शिकेल!!)

४. जर कोणत्याही नविन अन्नपदार्थामुळे पचनास अपाय होत असेल (उलट्या किंवा अतिसार) तर ते देणे थांबवावे आणि त्यासोबतच इतर घन पदार्थही बंद करावेत. घन आहार पुन्हा सुरु करण्यापूर्वी थोडे दिवस थांबावे.

५. पचनक्रियेचा त्रास कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

६. बाळाला केवळ घन आहार दिल्यानंतरच दूध द्यावे नाहीतर बाळाला घन आहार घ्यावासा वाटणार नाही.

७. बाळाला जर खाण्याची इच्छा नसेल तर त्याला जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करु नये. कदाचित त्याला आपल्या जेवणात काही बदल हवा असेल. बाळाच्या जेवणाची वेळ मनोरंजक बनविण्याचा प्रयत्न करावा. खूप गोड खायला देणे टाळावे कारण त्यामुळे त्यांची भूक कमी होऊ शकते आणि बाळाचे दातही खराब होतात.

८. हे लक्षात असू द्या की पहिल्या वर्षी बाळाची वाढ किंवा वजन जितके लवकर वाढते तितके दुसर्‍या वर्षी वाढत नाही. तेंव्हा जर दुसर्‍या वर्षात जास्त वाढ दिसत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही.


शौचाच्या सवयी

मूत्र ग्रंथी आणि पोटाच्या आतड्यांवरील नियंत्रण दोन - तीन वर्षानंतरच येऊ शकते. परंतु जर तुम्हाला अस्वच्छ नॅपकिन्स टाळायच्या असतील तर तुम्ही त्याला खाऊ घातल्यानंतर लगेच भांड्यावर (पॉटवर) बसवू शकता. जर तुम्ही त्याच्याकडे थोडे लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला त्याच्या शौचाची वेळ कोणती आहे हे समजून येईल. मुलाला लवकरच शौचालय किंवा पॉट वापरायला शिकवावे जेणेकरुन तो उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणार नाही.


उन्हाळ्यातील काळजी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, बाळासाठी डायपर, पातळ कपडे आणि रात्रीच्या वेळेस एक सुती ब्लॅंकेट पुरेसे असते. उन्हाळ्यात जास्त कपडे घालणे टाळावे. उन्हामध्ये बाहेर पडताना बाळाच्या डोळ्यांना सूर्याच्या थेट किरणांपासून सांभाळावे. तुम्हाला जर उष्णतेचे पुरळ, घामोळे दिसले तर सौम्य लोशन किंवा झिंकऑक्साईड सारखी क्रीम लावावी.

मोठ्या लोकांप्रमाणेच बाळांनाही उन्हाळ्यात अधिक द्रव पदार्थांची आवश्यकता असते. म्हणून बाळाला किंचित मीठ घातलेले आणि भरपूर साखर घातलेले पाणी पाजावे. लक्षात ठेवा जेंव्हा बाळाला अतिसार होतो तेंव्हा त्याच्या शरीरातून भरपूर पाणी बाहेर पडते. बाळाला अतिसार होत असल्यास डॉक्टरांना कळवावे. आणि उन्हाळ्यामध्ये असे झाल्यास ते खूप गंभीर असू शकते..

बाळासाठी कायम उकळलेले पाणी पिण्यासाठी वापरणे चांगले असते, कारण आपल्या भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात, पाण्यातून बरेच जंतू पसरुन अनेक आजार होतात. म्हणूनच, जेंव्हा तुम्ही बाळाला घेऊन प्रवास कराल तेंव्हा आपल्या सोबत भरपूर उकळलेले पाणी घ्या.


हिवाळ्यातील काळजी

बाळाला थंडी आणि वादळवाऱ्या पासून सांभाळावे. त्याला आतून सूती आणि बाहेरुन लोकरीचे कपडे घालावेत. ब्लँकेट्स हलके आणि उबदार असावेत. त्याच्या गळ्याभोवती काही घट्ट कपडे बांधले जाणार नाहीत ‍ह्याची काळजी घ्यावी. लांब हाताचे कपडे आणि त्याच्या पायाच्या संरक्षणासाठी पायजमा वापरावा. लक्षात असू द्या की बाळाच्या डोक्यापेक्षा त्याच्या हाता-पायातून गर्मी जास्त बाहेर पडते. म्हणून हिवाळ्यात लांब पायजमा आणि मोजे घालावेत. तुम्ही जर बाळाला त्याला कंबरेच्या खाली उघडे ठेवले तर त्याच्या डोक्यावर उबदार टोपी घालण्याचा काहीच उपयोग होणार नाही !

बाळाची मान, मांडी व काखेमध्ये काही पुरळ तर नाही ना ह्याकडे लक्ष द्यावे (हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील पाहिले पाहिजे) त्या जागी पावडर लावल्यास बाळाला छान वाटेल. डायपर लावतो ती जागा कायम स्वच्छ आणि कोरडी असेल ह्याची विशेष काळजी घ्यावी. बाळाला योग्य प्रकारचे कपडे घालून तुम्ही त्याचे न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजारांपासून संरक्षण करु शकाल. बाळाचे कपडे हवामानानुसार योग्य, आरामदायक, कोरडे आणि स्वच्छ आहेत कि नाही आणि ते आपले हात-पाय कोणत्याही अडथळ्या शिवाय हलवू शकतात ह्याची तुम्ही खात्री करुन घेतली पाहिजे.

त्याच्या झोपेसाठी नेहमीच आरामदायक वातावरण असले पाहिजे.


दात येणे

पहिला दात सहा ते आठ महिन्यात दिसू लागतो. बऱ्याचदा आधी समोरचे खालील दोन दात दिसू लागतात. सामान्यत: अशा वेळी हिरड्यांच्या सळसळण्यामुळे बाळ चिडचिडे होते आणि ते खायला इच्छुक नसते. अशा वेळी बर्‍याच बाळांच्या तोंडातून सतत लाळ गळत असते. अशा वेळी लाळेरे लावावे. तुम्ही आपल्या बाळाच्या दातांची चांगली स्वच्छता आणि निगा राखली पाहिजे. प्रत्येक जेवणानंतर त्याचे तोंड स्वच्छ करावे किंवा खाल्ल्यानंतर त्याला उकळलेले पाणी प्यायला द्यावे.


स्वच्छता

बाळाला सुरुवातीपासूनच स्वच्छ राहण्याची चांगली सवय लावावी, म्हणजे मग त्याला मोठेपणीही स्वच्छता आवडेल.

तुम्ही काय म्हणता ह्यातील एक शब्दही जरी त्याला समजत नसला तरीही तुम्ही त्याच्याबरोबर प्रार्थना करावी आणि उपासनेची गाणी गावीत. अशा गोष्टींचा त्याच्या सुप्त मनावर खोलवर परिणाम होईल. आणि मग तो जसजसा मोठा होत जाईल तसतसा आत्मिक स्वच्छतेचे मूल्य देखील शिकत जाईल.


धडा 18
परिशिष्ट ४ - मैलाचे दगड आणि रोगप्रतिकार शक्ती

आपल्या मुलाची त्याची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असलेल्या व्यक्तीमध्ये वाढ होत असताना पाहणे रोमांचक नाही काय?

मूल जेंव्हा मोठे होत असते तेंव्हा तुम्ही स्वाभाविकपणे जाणून घेण्यास उत्सुक असता की मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सामान्यरीतीने त्याचा विकास होत आहे कि नाही.

सामान्य विकास दर्शविणारा असा कोणताही आदर्श मापदंड नाही.

मुले एकमेकांपेक्षा वेगळी असतात आणि जर एखादे मूल दुसर्‍या मुलापेक्षा तीन महिने उशिरा चालू लागले, तर ह्याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याही प्रकारे असामान्य किंवा मागे पडलेले आहे. इतर मुलांप्रमाणेच ते ही सामान्यपणे निरोगी असे वाढू शकतात. तेंव्हा निष्कारण काळजी करु नका.

तथापि, मुलांची वाढ होत असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर ते सामान्यपणे ज्या गोष्टी करतात त्या इथे नमूद केल्या आहेत.


 • पहिल्या महिन्यामध्ये: बाळ वस्तूंवर आपली नजर स्थिर ठेवण्यास सक्षम होते आणि त्यांचे डोळे आणि डोके हळुवारपणे हालणाऱ्या वस्तूंच्या दिशेने फिरु लागते. पोटावर झोपलेले असताना ते आपले डोके वर उचलू शकतात.

 • चवथ्या महिन्यात : ते आपल्या आईला ओळखू लागते, लोकांकडे बघून हसू लागते, वस्तू धरु लागते, आणि ते आपले हात तपासण्यास सुरवात करतात. कडेवर उचलून घेतल्यावर, ते डोके सरळ ठेवू शकतात, आणि " किंचाळून " हसू लागतात.

 • सात ते आठ महिन्यात: ते आधार न घेता बसू शकतात, कडेवर उचलून घेण्यासाठी आपले हात उंचावू लागतात आणि तोंडात वस्तू घालू लागतात.

 • नऊ ते दहा महिन्यात: बाळ आधाराने उभे राहू लागते, टाटा करु लागते आणि स्वतः बसायला आणि उभे राहायला लागते.

 • १ ले वर्ष : कदाचित ते आधाराशिवाय चालू लागतात आणि काही शब्द समजून बोलू लागतात. त्यांच्या डोक्यावरील मऊ भाग भरण्यास सुरुवात होते. कदाचित आतापर्यंत त्यांना सहा दात आलेले असू शकतात आणि ते हातात कप धरुन पिऊ शकतात.

 • 2 वर्षांत: मूल धावू लागते आणि ब्लॉक्स बनवू शकतात. ते कदाचित छोटी छोटी वाक्ये बोलू लागतात आणि सोप्या सुचनांचे आज्ञापालन करु लागतात (त्यांची इच्छा असेल तेंव्हा!) त्यांच्या इच्छेला काबूत ठेवून आज्ञापालन शिकवण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी हाच एक उत्तम काळ असू शकतो. ह्या दिवसांपर्यंत ते त्यांच्या मलमूत्रावर (दिवसा) नियंत्रण ठेवण्यास शिकलेले असतात, विशेषतः मुली. मुलांना कदाचित काही महिने अधिक लागतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाची वाढ आणि विकास सामान्यपणे होऊ द्यावा.

तुमच्या मुलाची तुलना शेजारच्या मुलाशी करीत राहू नये!

तुमच्या मुलाला ज्यासाठी ते अद्याप तयार नाही असे काहीही करण्याची जबरदस्ती करु नये, मग ते बसणे असो, कपाने पिणे असो किंवा चालणे असो. त्याला त्याच्या स्वत: च्या गतीने वाढण्याचे स्वातंत्र्य द्यावे. तो वाढत असताना त्याला स्वतःसाठी काही गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, उदाहरणार्थ स्वत: तयार होणे वगैरे. त्याला इतर मुलांबरोबर खेळण्यासाठीही प्रोत्साहित करावे. त्याला गरजे पेक्षा अधिक सांभाळण्याचा प्रयत्न करु नये.


रोग प्रतिकारक शक्ती

बरीच रुग्णालये खालील समय सारणीचे अनुसरण करतात :

 • पहिल्या ३ महिन्याच्या आत - बी. सी. जी. लस

 • ६ आठवड्यात - डी. पी. टी. (ट्रिपल ॲंटीजेन) पहिला डोस; ओ. पी. व्ही. - (ओरल पोलिओ लस) पहिला डोस

 • १० आठवडे - डी. पी. टी. दुसरा डोस, ओ. पी. व्ही. दुसरा डोस.

 • १४ आठवडे - डी. पी. टी तिसरा डोस;, ओ. पी. व्ही. तिसरा डोस

 • १८ आठवडे - ओ. पी. व्ही. चवथा डोस

 • २२ आठवडे - ओ. पी. व्ही. पाचवा डोस

 • ९ महिने - वैद्यकीय तपासणी

 • ९-१२ महिने - गोवर लस

 • १८ महिने - डी. पी. टी. - पहिला बूस्टर; ओ. पी. व्ही. पहिला बूस्टर डोस

 • ५ वर्षे - डी. पी. टी. - दुसरा बूस्टर; ओ. पी. व्ही. दुसरा बूस्टर डोस


डिमथेरिया किंवा पोलिओचा संसर्ग झाल्यास पुन्हा योग्य बूस्टर डोस द्यावा.

एखादी खोल जखम झाल्यास टिटॅनसची लस पुन्हा द्यावी.

टी. ए. बी. - (ॲंटी-टायफाइड) बूस्टर दर वर्षी द्यावे.

कंबरेवर (०-५ मीली.) हिपॅटायटीस बी ॲंटीजेन लस देणेही योग्य आहे. त्याचा दुसरा डोस एका महिन्यानंतर द्यावा.


प्रीमॅच्युअर बाळाची आणि जुळ्या मुलांची काळजी घेणे

प्रीमॅच्युअर बाळ म्हणजे जे गर्भावस्था समाप्तीपूर्वीच अकाली जन्माला येते किंवा ज्याचे वजन दोन किलोपेक्षाही कमी असते. गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जन्मलेल्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांचे वजनही बहुधा दोन किलोपेक्षा कमी असते आणि त्यांनाही प्रीमॅच्युअर जन्मलेले मूलच मानले पाहिजे.


अकाली जन्मलेली बाळं आपल्या शरीराचे सामान्य तापमान राखण्यास असमर्थ असतात आणि काहीवेळा श्वास घेऊ शकत नाहीत, गिळू शकत नाहीत, अन्नही पचवू शकत नाहीत, किंवा संसर्गजन्य रोगांचा प्रतिकारही करु शकत नाहीत. त्यांना खूप लवकर थकवा येतो.


दोन किलो वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाचे वजन किमान २. ५ किलो होईपर्यंत त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले पाहिजे. परंतु जर तुम्ही त्याला घरी ठेवू इच्छित असाल तर खालील बाबींकडे लक्ष द्यावे :


१. नियमित तापमान २८ डिग्री सेल्सिअस असेल अशा खोलीत बाळाला शक्यतो ठेवावे. खासकरुन वादळी वाऱ्यापासून बाळाचे संरक्षण करावे. हिवाळ्यात बिछाना गरम पाण्याच्या बाटलीद्वारे उबदार ठेवला जाऊ शकतो.

२. बाळाचा श्वास नियमित आणि मोकळा होईपर्यंत त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे. त्याचे डोके खाली करुन एका बाजूला वळवून ठेवावे, जेणेकरुन त्याच्या घशातील स्राव आतल्या आत जाऊन गुदमरण्या ऐवजी त्याच्या तोंडातून बाहेर निघून जाईल..

३. त्यांना शक्यतो कमीत कमी हाताळावे, कारण खूप हाताळल्यामुळे त्यांना थकवा येतो.

४. दूध पाजणे. ज्या बाळांना दूध ओढता येत नाही त्यांना ड्रॉपरने दूध पाजले जाऊ शकते. जे गिळू शकत नाहीत त्यांना नळीतून दूध देण्याची गरज असते. सुरुवातीला कदाचित त्यांना दूध पचणार नाही, म्हणून त्यांना साखरेचे पाणी देऊ शकता (२५०-३०० मिली - पाण्यात एक चमचाभर साखर घालून उकळावे) हळूहळू त्यांना पाणी मिसळून दूध दिले जाऊ शकते. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी बाळाला व्हिटॅमिन सी चे ड्रॉपस आणि एका आठवड्यानंतर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स द्यायला सुरुवात करावी.

५. संसर्गजन्य रोगांपासून बाळाचे संरक्षण करावे. दूध पाजताना स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी आणि स्वत:लाही स्वच्छ राखावे.

बाळाचे वजन २. ५ किलो झाल्यावर त्याची सामान्य बाळाप्रमाणे काळजी घ्यावी. सुरुवातीला त्यांची सामान्य वाढ खूप सावकाश असेल, परंतु नंतर लवकरच वाढ सामान्यपणे होईल. दुर्बळ आणि कुपोषित बाळांसाठी विशेष खुराक उपलब्ध असतो.

एक अनिवार्य गोष्ट

तुम्ही तुमच्या बाळाला वाढवू शकत नाही. केवळ परमेश्वरच त्याला वाढवू शकतो. परंतु तुम्ही त्याच्या निरोगी वाढीसाठी पोषक वातावरण तयार करु शकता.

ही जबाबदारी पार पाडताना सर्वात "अनिवार्य" गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाबरोबर वेळ घालवला पाहिजे. कधीही एवढे व्यस्त होऊ नका की ही गोष्ट तुमच्या व्यस्त दिनचर्येतून निसटून जाईल. ह्या गोष्टीला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे.

हा वेळ काढण्यासाठी, तुम्हाला कदाचित इतर काही दुय्यम गोष्टी दूर साराव्या लागतील, परंतु ते खूप फायदेशीर ठरेल.

धडा 19
परिशिष्ट ५ - शारीरिक दोष आणि इतर समस्या

परमेश्वर त्याच्याच लेकरांच्या कुटुंबांमध्ये दुःख आणि आजारपण का येऊ देतो, ह्याचे कोणतेही सोपे उत्तर नाही. कदाचित अशासाठी असेल कि - आपल्याला परमेश्वराच्या सामर्थ्याचा आणि कृपेचा विपुल अनुभव घडावा (२ करिंथ १२:७-१०), आणि तसेच जे दुःख भोगीत आहेत त्यांच्याबद्दल आपण अधिक सहानुभूती व्यक्त करण्यास तयार असावे (२ करिंथ १: ४--८).

परमेश्वराने आपल्या वेदना कमी करण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी जे वैद्यकिय उपचार उपलब्ध करुन दिले आहेत त्याबद्दल आपल्याला परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. आणि अर्थातच तो चमत्काराद्वारे ही बरे करु शकतो.

इथे दिलेल्या सूचना तुम्हाला डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे आहे, हे जाणून घेण्यास मदत करतील. ह्या सूचना डॉक्टरांच्या भेटी टाळण्याचा पर्याय म्हणून नाही आहेत.

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. लहान बाळांमध्ये अशी रोगप्रतिकारक शक्ती नसते आणि, म्हणूनच ते प्रौढांपेक्षा खूप लवकर आणि अधिक गंभीरपणे आजारी पडतात. तसेच लहान बाळे, त्यांना होणारा त्रास सांगण्यासाठी असमर्थ असतात. ते फक्त रडू शकतात. म्हणूनच, लहान बाळांमधील काही सामान्य तक्रारींबद्दल एका आईला माहिती असणे उपयोगी ठरते.


शारीरिक दोष

काणे किंवा तिरळे दिसणारे डोळे: सुरवातीच्या दोन किंवा तीन महिन्यांपर्यंत, बऱ्याच बाळांचे डोळे तिरळे किंवा काणे दिसू शकतात कारण ते त्यांची नजर स्थिर करण्यास सक्षम नसतात. जर ही स्थिती दीड - दोन वर्षे कायम राहिली तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे. नाहीतर, कमकुवत डोळ्याची दृष्टी हळू हळू नाहीशी होईल.


अवरोधित अश्रु नलिका: कधीकधी एका डोळ्यातून किंवा दोन्ही डोळ्यांमधून पाणी किंवा चिकट पिवळसर स्त्राव बाहेर पडू शकतो. हे डॉक्टरांना कळवावे जेणेकरुन अश्रू नलिकेची तपासणी करुन सुधारणा केली जाऊ शकते. ह्याची तपासणी, बाळ वर्षाचे होण्यापूर्वीच करणे योग्य असते.


श्वास घेताना खरखर होणे: बाळ जेंव्हा पाठीवर झोपलेले असते, तेंव्हा ही खरखर अधिक प्रमाणात होते, आणि बाळाला एका अंगावर झोपवल्यावर त्यात सुधारणा होते. ही खरखर सामान्यपणे सहाव्या महिन्यापर्यंत नाहीशी होते. एखादे बाळ जे शांतपणे श्वासोच्छवास करत असते जर अचानक त्याच्या श्वसनामध्ये खरखर वाढली तर ते डॉक्टरांना कळवणे गरजेचे असते.


फाटलेला -ओठ आणि टाळू: अशी बाळे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये सहजपणे दूध पोहोचवू शकतात. त्यांना लवकर सर्दीही होते. त्यांना दूध पिताना देखील त्रास होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत, त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते; तेंव्हा शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हर्निया (अंत्रवृध्दी): ओटीपोटात नाभीच्या आतल्या भागामध्ये सूज येते. जेंव्हा बाळ रडते, खोकते किंवा जोर लावते तेंव्हा पोटातला फुगवटा अधिक स्पष्ट दिसतो. हे बहुधा सर्दी किंवा एखाद्या आजारपणा नंतर दिसते. बर्‍याच वेळा ही गाठ, टेपने (आतील बाजूस दाबून) बांधल्याने नाहीशी होते. पण जर ती ठिक होत नसेल तर शस्त्रक्रियेद्वारे सुधारावी लागते. असे फारच क्वचित घडते, परंतु जर आतडे ह्या गाठीमध्ये गुंतले गेले असेल, तर त्वरित डॉक्टरांना कळवावे, कारण ते खूप धोकादायक ठरु शकते.

जन्माची खूण: बर्‍याच नवीन जन्मलेल्या बाळांच्या त्वचेवर काळे डाग असतात. ते कालांतराने नाहीसे होतात. परंतु जर हे डाग वाढत चालले आहेत असे दिसले तर डॉक्टरांना सूचित करावे.


समस्या आणि आजार

बाळे रडण्याद्वारे आपली भूक आणि अस्वस्थता व्यक्त करतात. अर्थातच, काहीवेळा ती विनाकारण रडतात, म्हणून तुम्ही आधी त्यांच्या रडण्याचे कारण जाणून घ्यावे. जेंव्हा बाळ रडते तेंव्हा त्यांना कूस बदलायची असते, तेओले किंवा घाण झालेले असतात, त्यांना खूप थंडी वाजत असते किंवा खूप गरम वाटत असते किंवा झोप आलेली असते तेंव्हा ते रडू लागतात. काही वेळा पचनाची समस्याही असू शकते. जेंव्हा बाळ भूकेमुळे रडत असतात तेंव्हा ते रडताना त्यांचा हात पण चावतात. जर बाळाला पोटभर दूध मिळत नसेल तर त्यांचे वजन सुद्धा वाढत नाही.

जर बाळामध्ये खालीलपैकी काही लक्षणे दिसतअसल्यास डॉक्टरांना कळवावे :

चिडचिड आणि झोपेची सुस्ती असणे, सतत दूध पिण्यास नकार देणे, असामान्य प्रकारे मोठ्यांदा रडणे किंवा किरकिर करणे, उलट्या, जोरजोरात श्वास घेणे, किंचाळणे, खोकणे, जुलाब, ३८ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त ताप, पुरळ, आकडी येणे किंवा बाळाच्या सामान्य वागणुकीत दिसून येणारा कोणताही बदल.


पचनक्रियेच्या समस्या

अतिसार : ह्यामध्ये बाळाच्या शौचास खूपच घाणेरडा वास असतो किंवा ते खूप पातळसर असते आणि त्यात न पचलेले दूधही असते, किंवा त्यात हिरवी आव आणि रक्तही असते. बाळाला तापही असू शकतो. अशा वेळी तुम्हाला बाळाचे (डायपर)लंगोट धुताना खूपच काळजी घेतली पाहिजे. तसेच तुमचे हात सतत धुवून स्वच्छ ठेवले पाहिजेत. लंगोट पाण्यात उकळून घ्यावेत किंवा एखाद्या जंतुनाशकात बुडवून ठेवावेत, आणि उन्हामध्ये वाळायला टाकावेत. खाण्याचे सर्व पदार्थ झाकून ठेवावेत म्हणजे त्यावर माश्या बसणार नाहीत. बाळाला त्याच्या आहारात भरपूर पाणी द्यावे आणि सर्व घन पदार्थ बंद करावेत. कधीकधी त्याचे दूधही थांबवणे आवश्यक असते आणि त्याला उकळलेले ग्लुकोजचे पाणी थोडेसे मीठ घालून द्यावे. डॉक्टरांना हे कळवणे गरजेचे आहे कारण ह्या आजाराच्या संसर्गामुळे बाळाला अँटी-बायोटिक्सची गरज लागू शकते. अतिसार आणि उलट्यांच्या बाबत निष्काळजीपणा करु नये कारण त्यामुळे तुमचे बाळ खूप गंभीरपणे आजारी पडू शकते. अतिसाराचा हा काळ संपल्यानंतर तुमच्या बाळाचा आहार पुन्हा सुरु करण्यापूर्वी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. सुरुवातीला, दूध पाण्यात मिसळूनच बाळाला द्यावे आणि मग त्यांची ताकद हळूहळू वाढत जाते. जर अतिसार संसर्गामुळे झालेला नसेल पण आहारातील बदलामुळे किंवा जास्त आहार दिल्यामुळे झाला असेल तर एक - दोन दिवस पाण्याने हलका केलेला आहार दिल्यामुळे बाळाची तब्येत लवकरच सामान्य होईल. आईचे दूध पिणाऱ्या बाळांना सहसा हा त्रास होत नाही.


उलट्या: बाळाला उलट्या होऊ नयेत म्हणून प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर त्याला खांद्यावर ठेवावे जेणेकरुन त्याला ढेकर येईल (पोटात जी हवा गेली आहे, ती बाहेर पडते). उलट्यांसोबत वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना कळवावे.


मलावरोध: बाळाचे शौच खूप कडक असल्यास आणि आतड्यांच्या हालचालीमुळे बाळ बेचैन असेल, तेंव्हा त्याला फळांचा रस द्यावा, किंवा उकळलेल्या पाण्याने खिसमिस स्वछ धुवून, रात्रभर भिजवावेत आणि ते कुस्करुन त्याचा रस गाळून द्यावा. त्याच्या आहारात जास्त पाणी आणि साखर मिसळून द्यावे. कधीकधी बाळांना पुरेसा आहार मिळत नसल्यामुळे देखील मलावरोध होतो. अशावेळी ते निश्चितच त्यांच्या भुकेचे संकेत देतात. मलावरोध जर खूपच जास्त असेल तर औषध थेट मुलाच्या गुदाशयात ठेवावे लागते (सपोसिटरी किंवा एनिमा).


पोटात मुरडा येणे: सामान्यत: बाळाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये हे येत असतात. दूध प्याल्यानंतर बाळ किंचाळते आणि गॅस सोडते. हे टाळण्यासाठी, बाळाच्या पोटात हवा जाऊ नये ह्याची काळजी घ्यावी. त्याच्या बाटलीच्या निप्पलचे भोक एका सेकंदात दुधाचे दोन थेंब निघू शकतील इतकेच असावे. बाळाला त्याच्या पोटावर झोपवल्यावरही थोडा आराम मिळतो. कधीकधी, बाळाच्या गुदाशयात औषध (सपोसिटरी) ठेवावे लागते. जर पोटात पेटके कायमच येत राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही बाळांमध्ये, सर्व उपाय करुनही, पोटात मुरडा येतच रहातो, परंतु कालांतराने ते बरे होते.


उचकी: थोडेसे गरम पाणी पिण्याने किंवा बाळाच्या झोपण्याच्या स्थितीमधे बदल केल्यास उचकी थांबू शकते. तशीही, उचकी आपोआपच थांबते.


तोंडात फोड येणे:(जीभेवर एक पांढरा घट्ट थर जमा होणे). हे बाळांमध्ये बऱ्याचदा आजारपणात आढळते. दूध पाजल्यानंतर, बाळाला थोडेसे उकळलेले पाणी देऊन हे टाळता येऊ शकते. बाटली आणि त्याचे निप्पल चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे.


सर्दी- खोकला, कान आणि छातीच्या समस्या

सर्दी-खोकला: जेंव्हा बाळांना सर्दी-खोकला होतो, तेंव्हा त्यांची भूक मंदावते आणि ते खाण्यापिण्यास नकार देतात. सर्दी-खोकल्यामुळे छाती आणि कानामध्ये ही वेदना होतात. म्हणून त्यापासून तुम्ही तुमच्या बाळाला सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तीपासून त्याला दूर ठेवावे. जर तुम्हालाही झाला असेल तर त्याला जवळ घेताना आपले नाक आणि तोंड झाकून घ्यावे (मास्क लावावा). बाळाला सर्दी-खोकला असल्यास, त्याला व्हिटॅमिन सी चे थेंब आणि द्रवपदार्थ अधिक द्यावेत. डोके खाली करुन ठेवावे जेणेकरुन स्त्राव नीट बाहेरच्या बाजूला पडेल. जर रोगाचा संसर्ग कानापर्यंत किंवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचला असेल आणि आवाज घोगरा येत असेल तर डॉक्टरांना कळवावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना अँटी-बायोटिक्स देऊ नयेत.


कानाचे दुखणे: सामान्यपणे बाळाच्या रडण्यामुळे आणि त्याचे डोके इकडे तिकडे फिरवण्यामुळे हे दुखणे कळते. त्याचा एक कान किंवा दोन्ही कान वहात असण्याची शक्यता असते.


छातीचे आजार: ह्याचे लक्षण म्हणजे जोरजोरात श्वासोच्छवास करणे, श्वसनाला कठीण जाणे त्यासोबत खोकला आणि ताप येणे. ह्यामध्ये बाळाला अँटी-बायोटिक्सची आवश्यकता असू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


त्वचा रोग

लंगोट (डायपर) मुळे येणारे पुरळ : बाळाची त्वचा संवेदनशील असल्यामुळे बऱ्याचदा त्याला लंगोट बांधण्याच्या जागी पुरळ येतात. हे टाळण्यासाठी लंगोट (डायपर) वारंवार बदलणे आवश्यक आहे त्यामुळे ती जागा कोरडी व स्वच्छ ठेवता येईल. जर पुरळ आले असतील तर ती जागा स्वच्छ करुन त्यावर झिन्क ऑक्साईड मलम लावावे. सर्व लंगोट थोडेसे व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात भिजवू शकता. जर बाळाच्या लंगोट किंवा कपड्यांमधून साबण व्यवस्थित साफ केला जात नसेल, तर त्यामुळे देखील बाळाला पुरळ, खाज किंवा ॲलर्जी होऊ शकते. म्हणूनच, बाळांचे सगळे कपडे खूप चांगल्या प्रकारे खंगाळून त्यातील सर्व साबण काढून स्वछ धुतले पाहिजेत.


घामोळ्या: ह्या उन्हाळ्याच्या दिवसात आणि बाळाला आवश्यकते पेक्षा जास्त कपडे घातल्यामुळे येतात. त्यासाठी सौम्य मलम, झिंक मलम किंवा घामोळ्याचा पावडर वापरावा आणि विशेषतः बाळाच्या मांडीमधे-बगलेमधे आणि वळ्यांना घामोळ्यांचा पावडर लावावा. बाळाचे कपडे वारंवार बदलावेत.

खाज - खरुज (एक्झिमा): हे एखाद्या ॲलर्जीमुळे उद्भवू शकते, म्हणूनच त्याचे कारण शोधून ते टाळता येऊ शकते. सामान्यतः मूल मोठे झाल्यावर ती नाहीशी होते.


त्वचारोग किंवा इम्पैटिगो: ह्या अवस्थेत, खाज येणारे फोड येतात, त्यामध्ये पू भरलेला असतो. त्यासाठी बाळाचे टॉवेल्स, कपडे वगैरे पाण्यात चांगले उकळून घेतले पाहिजेत. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार सुरु केला पाहिजे, कारण हे वेगाने पसरु शकतात.


खरुज: सामान्यतः खरुज ही मोठ्या मुलांना हातापायाच्या बोटांच्या दरम्यान येते आणि ही खूपच संसर्गजन्य असते. खाजवल्यामुळे ती अधिक वाईट प्रकारे पसरत जाते. डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार केले पाहिजेत. जे मलम लावायचे आहे ते दिवसातून तीन वेळेपेक्षा अधिक लावू नये. मुलाच्या नाक, डोळे, आणि तोंडाजवळ मलम लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी.


ताप आणि आकडी येणे

कधीकधी, तीव्र तापामुळे बाळाला आकडी (फिट्स) येऊ शकते. सामान्यपणे ताप कमी झाल्यावर ती आपोआप नाहीशी होते. ताप कमी करण्यासाठी, डोके आणि अंग बर्फाने थंड करावे. बर्फाचे तुकडे असलेली प्लास्टिकची पिशवी टॉवेलवर ठेवावी आणि तो टॉवेल बाळाच्या कपाळावर ठेवल्याने आणि त्याला क्रोसिन (पॅरासिटामोल) सीरप दिल्यामुळे सहसा ताप लवकर उतरतो.


जेंव्हा बाळाला चक्कर येते तेंव्हा ते बेशुद्ध किंवा निस्तेज पडू शकते, बाळ हाता-पायाला झटके देते आणि त्याचे डोळे फिरतात. अशा वेळी, त्याच्या तोंडात दातांच्या मध्ये एक कपडा दुमडून ठेवावा, म्हणजे त्याच्या ओठाचे आणि जिभेचे कापले जाण्यापासून संरक्षण होईल. पण त्याला श्वास घेता येईल ह्याची खात्री करुन घ्यावी. त्याच्या तोंडातून पडणारी लाळ साफ करत रहावी आणि त्याचे डोके खाली करुन ठेवावे जेणेकरुन त्यातून पडणारा स्राव परत त्याच्या शरीरात ओढला जाणार नाही. डॉक्टरांना कळवावे जेणेकरुन ज्या कारणाने आकडी येते त्यावर योग्य उपचार केला जाऊ शकतो. उच्च तापामुळे जी चक्कर येते ती गंभीर नसते. बाळाचा ताप खूप वाढू देऊ नये. बर्फ आणि क्रोसिन सिरप द्वारे ताप नियंत्रणात येऊ शकतो.


मानवीरित्या एका आईसाठी, तिने कितीही काळजी घेतली तरी हे अशक्य आहे कि ती आपल्या बाळाचे सर्व प्रकारच्या आजारपणापासून, संकट आणि नुकसाना पासून संरक्षण करु शकेल. परंतु येशू म्हणतो, लहान मुलांची देखभाल करण्यासाठी त्यांचे देवदूत आहेत (मत्तय १८:१०). ह्याद्वारे आपल्याला प्रोत्साहन मिळते. आणि मग, आपल्या मुलांसाठी आपण सर्वोत्तम ते केल्यानंतर, बाकीचे सर्वकाही करण्यासाठी आपण निश्चिंतपणे परमेश्वरावर भरंवसा ठेवू शकतो.


धडा 20
परिशिष्ट ६ - अपघात आणि आजार - प्रतिबंध आणि उपचार

बाळांना सर्वकाही जाणून घ्यायला आणि त्यांना जे काही दिसेल त्याचे परीक्षण करायला खूप आवडते. त्यांना कोणत्याही धोक्याची कल्पना नसते. तेंव्हा, एक आई म्हणून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे.


अपघात आणि प्रथमोपचार

पहिल्या दीड वर्षांपर्यंत बाळांना दुखापत होऊ शकणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर त्यांना कात्री, पेन्सिल वगैरे सारख्या विविध गोष्टी कशा वापरायच्या हे शिकवले जाऊ शकते.

स्वयंपाकघरात, स्नानगृहात किंवा जमिनीवर असताना बाळाला एकटे सोडू नये. तो एक वर्षाचा होईपर्यंत त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे त्याचा पाळणा किंवा त्याची खेळण्याची जागा आहे. तो झोपलेला असतानाही त्याला घरी एकटे सोडू नये.

उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम असतो म्हणून ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी की सगळी औषधे आणि विषारी गोष्टी बाळापासून दूर असतील ह्याची काळजी घ्यावी. काही पिना किंवा बटणे वगैरे जमिनीवर पडलेली असतील तर ती नक्कीच त्यांच्या तोंडापर्यंत पोहंचतील. तेंव्हा अशा गोष्टीही त्यांच्या पासून दूर ठेवाव्यात. म्हणूनच छोट्या खेळण्यांपेक्षा मोठ्या खेळण्यां बरोबर खेळणे बाळांसाठी सुरक्षित असते.

किरकोळ अपघातांचा उपचार घरीच केला जाऊ शकतो, परंतु काही अपघातांची सूचना डॉक्टरांना त्वरित करावी. उदाहरणार्थ

१. जर बाळाने एखादी धारधार किंवा विषारी वस्तू गिळली असेल तर.

२. जर त्याने त्याच्या नाकात किंवा कानात काहीतरी ढकलले असेल तर.

३. जर तो गंभीरपणे जखमी किंवा भाजला असेल तर.

४. जर एखादा प्राणी त्याला चावला असेल तर.

५. जर तो बेशुद्ध किंवा निस्तेज पडला असेल तर.

६. जर पडल्या नंतर किंवा डोक्याला मार लागल्या नंतर त्याने उलटी केली असेल तर.

७. जर जखमेतून किंवा कापलेल्या जागेतून रक्त वाहणे थांबत नसेल, किंवा ती जखम चिघळली असेल आणि बाळाला ताप आला असेल तर.

८. जर मुरगळले असेल किंवा हाड मोडले असेल तर.

जर त्याने कोणतेही औषध किंवा एखादी विषारी गोष्ट गिळली असेल तर सगळ्यात आधी त्याच्याकडून उलट्या करवून घेतल्या पाहिजेत. त्याला भरपूर पाणी पाजावे आणि तुमचे बोट त्याच्या घशात घालावे. उलट्या झाल्यानंतर काही दिवस त्याला फक्त दुधासारखे सौम्य पदार्थच द्यावेत.


पडण्यामुळे झालेल्या जखमेवर बर्फ लावून किंवा गार शेकाने उपचार केला जाऊ शकतो. कापणे, खरचटणे, किडे चावणे हे साबण आणि पाण्याने धुवावे आणि त्यावर एखादा जंतुनाशक मलम लावावा. जखम झाकलेली असावी. जखमेच्या ठिकाणी घट्ट दाबून धरल्याने रक्ताचा प्रवाह थांबू शकतो.


जर बाळाला गंभीर जखम झाली असेल, खासकरुन जर त्यामध्ये माती किंवा घाण गेली असेल, तर धनुर्वातापासून संरक्षण करण्यासाठी त्याला ताबडतोब लस दिली पाहिजे. काही जखमांसाठी टाके देखील गरजेचे असू शकतात.


जर बाळाच्या डोळ्यात धूळ गेली असेल तर त्याचे डोळे चोळू नयेत, तर भरपूर पाण्याने ते धुवावेत. जर डोळे तरीही लाल असतील तर त्यामध्ये डोळ्यांच्या जंतुनाशक औषधाचे काही थेंब टाकण्याची आवश्यकता असते.


जर बाळाच्या घश्यामध्ये काही अडकले असेल तर त्याला उलटे करुन त्याच्या पाठीवर थापटावे. अशा प्रसंगी, त्याच्या घशात अजिबात बोट घालू नये कारण त्यामुळे अडकलेली वस्तू आणखीनच खाली ढकलली जाऊ शकते.


सामान्य रोग

जंत : भारतामध्ये हे खूप सामान्य आहे. जेंव्हा बाळाला जंत होतात तेंव्हा त्याच्या गुद्-द्वाराजवळ आणि मांडीच्या आसपास खाज येते. जर त्याच्या पोटात किंचित दुखत असेल, जर त्याला भूक लागत नसेल आणि त्याचा चेहरा फिकट पडला असेल, तर त्याच्या शौचाची तपासणी केली पाहिजे कारण त्यामध्ये जंत असू शकतात. जर त्याच्या शौचात जंत आढळले तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि त्याच्यावर उपचार करावेत. जर चांगली स्वच्छता पाळली, तर बाळांना नियमितपणे जंतांचे औषध द्यावे लागणार नाही.


टॉन्सिल्स आणि एडेनॉइड्स : जर बाळाला घशाचा संसर्ग (इन्फेकशन) झाला असेल किंवा जर तो तोंडाने श्वास घेत असेल किंवा कान वहात असेल तर त्याला डॉक्टरांकडे तपासण्यासाठी घेऊन जावे. व्हिटॅमिन 'सी' चे नियमित सेवन केल्यास असे इन्फेक्शन टाळता येऊ शकते.


ॲलर्जी : जर बाळामध्ये काही ॲलर्जीची लक्षणे दिसली जसे कि त्वचेवर पुरळ येणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा दम्याचा ॲटॅक येणे तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाला कसली ॲलर्जी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही ती टाळू शकता.


संसर्गजन्य आजार

गोवर : ह्यामध्ये बाळाला तीन - चार दिवस खूप ताप येतो, त्याचे नाक वाहू लागते आणि डोळे लाल होतात.अशा अवस्थेत मूल चिडचिडे होईल आणि त्याला प्रखर प्रकाश आवडणार नाही. जिथे थोडाही प्रकाश नसेल अशा खोलीत त्याला आराम मिळेल. पुरळ आधी चेहरा आणि मानेवर सुरु होऊन संपूर्ण शरीरभर पसरतील. तीन ते चार दिवसांनंतर त्यांचा प्रभाव कमी होण्यास सुरवात होईल आणि एका आठवड्यानंतर ते पूर्णपणे नाहीसे होतील. गोवराशी संबंधित इतर आजारांच्या शक्यता म्हणजे न्यूमोनिया, ब्राँकायटिस, कानाचे इन्फेकशन, आणि क्वचित प्रसंगी इन्सेफेलाइटिस (मेंदूमध्ये सूज /दाह) होऊ शकतो. जर ह्यापैकी काही आढळून आले तर त्वरित डॉक्टरांना कळवावे.


जर्मन गोवर : सामान्य गोवरापेक्षा ह्याची तीव्रता कमी असते आणि ह्या गोवराशी संबंधित इतर आजारांच्या शक्यता कमी असतात. गर्भवती स्त्रीने, विशेषत: पहिल्या तीन महिन्यांत, जर्मन गोवराचा संसर्ग टाळावा कारण त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये बरेच गंभीर दोष उद्भवू शकतात.


गालगुंड : ह्यामध्ये, बाळाला एक - दोन दिवस ताप येतो, डोकेदुखी असते, भूक मंदावते आणि अंग दुखते. त्यानंतर, कानाच्या पाळीखाली दोन्ही जबड्यांजवळ सूज दिसू लागते. ती दोन-तीन दिवसात वाढत जाते आणि नंतर हळूहळू कमी होत जाते. लहान मुलांमध्ये ह्याचे गंभीर परिणाम फार क्वचितच दिसतात. पण वयस्क लोकांमध्ये, अन्ननलिका, अंडाशय किंवा स्वादुपिंड ह्यामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते किंवा एक प्रकारचा मेनिंजायटीस होतो. बाळांना त्याची लस दिली तर हे टाळता येऊ शकते.


डिप्थीरिया आणि डांग्या खोकला : डिप्थीरियामध्ये बाळाला ताप येतो, घसा खवखवतो. डांग्या खोकल्यामध्ये बाळाला ताप येतो आणि खोकल्याची जोरदार उबळ येते आणि श्वास घेताना खोकल्यासोबत घशातून हूप असा शिट्टीसारखा आवाज येतो. बाळ काळेनिळेही पडू शकते.


पोलिओमायलीटिस : बाळामध्ये ताप, डोकेदुखी आणि अस्वस्थ वाटणे ही सामान्य लक्षणे दिसतात. बाळाला पायात आणि त्याने मान पुढे झुकवल्यावरही वेदना होते. अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवावे. जर बाळाला पोलिओची लस दिलेली असेल तर हा आजार होण्याची शक्यता कमी असते. जर हा आजार आजूबाजूला जास्त प्रमाणात पसरलेला असेल तर बाळाला गामा ग्लोब्युलिन दिल्यास काही आठवडे त्याला अंशतः संरक्षण मिळू शकते.

तथापि, व्यापक लसीकरण मोहिमेमुळे आजकाल वरील नमूद केलेल्या रोगांचे प्रमाण फार कमी झाले आहे.


चिकन-पॉक्स : ह्यामध्ये बाळाची भूक मंदावते आणि हलका ताप येतो. पुरळ येऊन खाज सुटते आणि फोड बनून तोंड, डोके आणि सगळ्या शरीरभर पसरतात आणि ते पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी तीन दिवस लागतात. खाज कमी करण्यासाठी कॅलामाइन मलम लावावे. बाळाला खाजवू देऊ नये, कारण त्यामुळे फोडांचा संसर्ग होऊ शकतो. जर त्वचेला संसर्ग (फोडांमध्ये पू) झाल्यास डॉक्टरांना कळवावे.


पोषणसंबंधीत आजार : जर बाळाचा आहार योग्य असेल, आणि त्याला पुरेसे जीवनसत्त्व दिले जात असेल तर मुडदूस सारखा आजार टाळता येऊ शकतो. कुपोषण हा भारतीय मुलांमध्ये आढळणारा एक सामान्य आजार आहे. पण जर मुलांचा आहार चांगला असेल तर हा आजार टाळता येऊ शकतो. बाळाला नियमितपणे मल्टी-व्हिटॅमिन देणे चांगले असते.


संधिवाताचा ताप : हा सहसा घसा खवखवणे किंवा सर्दी झाल्यानंतर दोन तीन आठवड्या नंतर सुरु होतो. बाळाच्या सांध्यामध्ये वेदना होतात. सांधा गरम, सूजलेला, लाल आणि खूप वेदनादायक असतो. दोन - तीन दिवसानंतर, हा सांधा सामान्य होईल आणि दुसर्‍या सांध्याला त्रास सुरु होईल. ह्या व्यतिरिक्त बाळाला ताप येणे, छातीत दुखणे आणि धाप लागणे असे देखील होऊ शकते. हे डॉक्टरांना त्वरित कळवावे कारण त्याचा हृदयावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. संधिवाताच्या तापाचे वारंवार आक्रमण झाल्यास, बाळाच्या हृदयाचे गंभीर नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, मोठा होईपर्यंत त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली नियमितपणे अँटी-बायोटिक्स देणे चालू ठेवावे.

जे काही सांगितले आहे त्यामुळे बाळ अगदी थोडेसे जरी आजारी पडले तर आपल्या बाळालाही असे आजार होतील असे समजून तुम्ही कायमच चिंताग्रस्तग्रस्त होऊ नये. बालके अनेक शारीरिक अडथळे सहज पार करु शकतात. परमेश्वर त्यांची विशेष रीतीने काळजी घेत असतो, म्हणून आपण निश्चिंतपणे त्यांना त्याच्या सर्वसमर्थ हाती सोपवून द्यावे.


एका आईला भेडसावणाऱ्या भावनिक समस्या :

काही मातांना भावनिक आणि "स्वभावाच्या स्थित्यंतराच्या"समस्यांचा सामना करावा लागतो त्याविषयी थोडक्या शब्दात सांगून मी समाप्त करु इच्छिते. ह्याची अनेक कारणे आहेत.

त्याचे कारण हार्मोनल असू शकते,खास करुन तुम्ही मध्यमवयीन असल्यास.


कधीकधी, ह्याचे कारण थकवा, घरातील ताण-तणाव किंवा मुलांच्या समस्या हे देखील असू शकते.

कारण काहीही असो, तुम्ही पुरेसा आहार आणि विश्रांती घेतली पाहिजे हे लक्षात असू द्यावे. आणि तुम्हाला निभावणे खूप कठीण जाईल अशा अनावश्यक घराबाहेरील जबाबदाऱ्या घेणे टाळावे. तुमच्या आहारासोबतच अतिरिक्त, लोह, कॅल्शियम आणि व्हिटामिनस् देखील घ्यावीत.


जर ही समस्या कायम राहिली तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.


आपल्या स्वर्गीय पित्याला आपली रचना माहित आहे की आपण केवळ माती आहोत. आणि तो आपल्या शरीराची काळजी घेतो. समस्या काहीही असो, प्रत्येक समस्येतून विजयाने बाहेर पडण्यासाठी त्याची कृपा आपल्याला पुरेशी आहे.


हे किती अद्भूत आहे की रोग आणि आजाराने शापित अशा ह्या जगामध्ये आपण जिवंत परमेश्वराशी जोडलेले राहू शकतो. खरोखर हा एक अवर्णनीय विशेषाधिकार आहे.


जर आपण प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती करायला, स्वतःला सर्व कटूपणापासून मुक्त करायला आणि आपली सर्व चिंता त्याच्यावर सोपवायला शिकलो तर आपण सामना करीत असलेल्या प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो.


सरतेशेवटी, सदैव आपल्यासोबत असलेले परमेश्वराचे न बदलणारे अभिवचन लक्षात ठेवा - कारण त्याने स्वतः म्हंटले आहे, "मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही". (इब्री १३:५, ६).