लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

कलस्सै २:२ मध्ये पौल म्हणतो, "मी यासाठी परिश्रम घेतो की, तुमचे हृदय प्रीतीत एकत्र बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती तुम्हाला विपुल मिळावी, व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्याचे पूर्ण ज्ञान तुम्हाला व्हावे." 'रहस्य' हा शब्द नवीन करारामध्ये काही वेळा येतो आणि एका सत्याचा संदर्भ देतो जे देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला प्रकट केले तरच कळू शकेल. १ करिंथ २:८-१० म्हणते, "डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने तयार केले आहे, कारण देवाने ते आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केले आहे."

पवित्र शास्त्रामध्ये केवळ दोन रहस्ये आहेत ज्यांना 'मोठी' रहस्ये म्हटले आहे. एक म्हणजे देव मानवी देहात प्रगट झाला हे रहस्य (१ तीमथ्य ३:१६): "सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. देव देहात प्रगट झाला." याला सुभक्तीचे रहस्य किंवा देवभीरू जीवन कसे जगावे याचे रहस्य असे म्हणतात. दुसरे रहस्य म्हणजे मंडळीबद्दल जी ख्रिस्ताचे शरीर आणि वधू आहे. इफिस ५:३१,३२ म्हणते, "ती उभयता एकदेह होतील.हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्या संबंधाने बोलतो आहे." मंडळी ख्रिस्ताबरोबर एकदेह आहे हे दुसरे मोठे रहस्य आहे.

येशू देहात आला, आपल्यासारखीच त्याची परीक्षा झाली आणि सर्व परिक्षावर त्याने मात केली आणि आता आपण त्याच्या पावलावर कसे पाऊल ठेवू शकतो, आपल्या पापांवर मात करू शकतो आणि अशा प्रकारे त्याच मार्गाने चालणाऱ्या इतरांसह ख्रिस्ताचे शरीर कसे बांधू शकतो हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला देवाकडून प्रकटीकरणाची गरज आहे. ख्रिस्ताचे शरीर म्हणून मंडळीची बांधणी करणे हे पृथ्वीच्या पाठीवर एखादा करू शकेल असे सर्वात मोठे सेवाकार्य आहे. त्यापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. पौलाने आपले सर्व आयुष्य हे मंडळी बांधण्यासाठी परिश्रम घेण्यात खर्च केले.

देवाचे सर्वात मोठे सेवक ते आहेत जे ख्रिस्ताबरोबर त्याची मंडळी बांधण्यासाठी काम करतात. देवभीरू जीवन जगणे महत्त्वाचे आहे; पण ते पुरेसे नाही. पौलाने जे केले ते आपणही केले पाहिजे- मंडळी बांधली पाहिजे. पौलाने आपले आयुष्य सामाजिक कार्य करण्यात घालवले नाही. पृथ्वीवरील बाबतीत गरिबांना मदत करणे चांगले आहे, परंतु यामुळे देवाची सार्वकालिक योजना पूर्ण होणार नाही. जर तुम्ही लोकांना फक्त शिक्षण आणि वैद्यकीय उपचार देऊन त्यांचे जीवन अधिक आरामदायक बनवाल, तर तुम्ही त्यांचा नरकाचा मार्ग अधिक सोपा करणारे व्हाल! सुरुवातीला ते एका खडबडीत मार्गाने नरकात जात होते, पण तुम्ही तो मार्ग थोडा गुळगुळीत केला. सर्व सेवाकार्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना ख्रिस्ताकडे नेणे, त्यांना देवाच्या जीवनाकडे नेणे आणि नंतर त्यांना एका शरीरात बांधणे हे पौलाला समजले होते. आपण करू शकू असे हे सर्वात मोठे सेवाकार्य आहे.

सामाजिक कार्य करणाऱ्या आणि ख्रिस्ताच्या नावात गरिबांना मदत करणाऱ्या सर्वांचा आम्ही आदर करतो. असे करण्यासाठी बोलावलेल्या सर्वांना देव आशीर्वाद देवो. पण पौल कधीही त्यात सामील झाला नाही - जरी त्याच्या काळात जगात इतक्या सामाजिक गरजा होत्या. जे गरिबांना मदत करतात त्यांना नोबेल शांतता पुरस्काराप्रमाणे पृथ्वीवरील सन्मान मिळू शकतात. पण येशू आणि पौलाला शांततेचा नोबेल पुरस्कार कधीच मिळाला नसता. मंडळी बांधणाऱ्यांना कोणीही नोबेल पुरस्कार देत नाही.

कलस्सै ४:१७ मध्ये आपण एक अद्भुत उपदेश वाचतो जो पौलाने अर्खिप्पाला सांगितला."जी सेवा तुला प्रभुमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे." देवाने इतरांना दिलेल्या सेवाकार्यांची चिंता करू नका. देवाने तुम्हाला एक विशिष्ट सेवा दिली आहे. त्यावर लक्ष केंद्रित करा आणि कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करा. अर्खिप्पाच्या जागी तुमचे नाव तेथे ठेवा आणि ते वचन आपल्या स्वतःच्या अंतःकरणासाठी एक वचन आहे म्हणून स्वीकारा. जेव्हा मी तरुण होतो आणि मी हे वचन वाचले तेव्हा मी अर्खिप्पाच्या जागी माझे नाव तिथे ठेवले आणि मी परमेश्वराला मला असे म्हणताना ऐकले, "मी तुला दिलेल्या सेवाकार्याकडे लक्ष देऊन ते पूर्ण कर. दुसऱ्या मार्गाकडे वळून वेगळे काहीतरी करू नको." मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, जर देवाने तुम्हाला मंडळी बांधण्यासाठी बोलावले असेल तर सामाजिक कार्याकडे वळू नका. जर देवाने तुम्हाला संदेश देण्याच्या सेवेसाठी बोलावले असेल तर, एखाद्या ख्रिस्ती संघटनेत संचालक म्हणून मेजाच्या मागे बसू नका. देवाने तुम्हाला दिलेल्या सेवाकार्याकडे लक्ष द्या आणि ते पूर्ण करा.