लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

१. मध्यस्थीचे सेवाकार्य : जखऱ्या ३:१ मध्ये आपण असे वाचतो की मुख्य याजक यहोशवा, प्रभू समोर उभा होता आणि सैतान त्याच्यावर आरोप करण्यासाठी उभा होता. सैतान नेहमीच पुढार्‍यांवर आरोप करून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्यांना आणि त्यांच्या पत्नींना आणि मुलांना लक्ष्य बनवतो. पुढार्‍याचा न्याय करण्यात कठोर होऊ नका, कारण तो सैतानाचे तुमच्यापेक्षा मोठे लक्ष्य आहे. त्याची पत्नी आणि मुले ही तुमची पत्नी आणि मुलांपेक्षा सैतानाचे मोठे लक्ष्य आहेत. यहोशवावर आरोप करण्यासाठी सैतान तिथे प्रभू समोर उभा राहिला. पण प्रभुने उत्तर दिले, "मी, प्रभू, तुझे आरोप फेटाळून लावतो." (जखऱ्या ३:२) (लिव्हिंग बायबल). नीतिमान असलेला येशू ख्रिस्त हा पित्यासोबत आमचा वकील आहे. कधीकधी आपण आरोप करणाऱ्याचे इतके मनावर घेतो की आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आपल्या वकिलाबद्दल आपण सर्व काही विसरतो. सध्या स्वर्गामध्ये दोन सेवाकार्ये चालू आहेत. एक म्हणजे सैतानाने दोषारोप करणे. त्याने ईयोब आणि यहोशवा यांच्यावर आरोप लावला. त्याचवेळी, स्वर्गात आणखी एक सेवाकार्य चालू आहे. "येशू आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी सर्वदा जिवंत आहे" (इब्री लोकांस पत्र ७:२५). दोषारोप करण्याचे कार्य आणि मध्यस्थी करण्याचे कार्य अशी दोन कार्ये आहेत. जे सैतानाचे सोबती आहेत ते इतर विश्वासणार्‍यांवर आरोप करतील. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही दुस-या विश्वासणार्‍याविरुद्ध चहाड्या करता किंवा वाईट बोलता, ज्याबद्दल तुम्हांला माहीत असो वा नसो तेव्हा तुम्ही सैतानाशी हातमिळवणी करून म्हणता, "सैताना, मी तुझ्याशी सहमत आहे. तो तसाच आहे." आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही दुर्बल बंधूसाठी प्रार्थना करता तेव्हा तुम्ही येशूचा हात धरून म्हणता, "प्रभुजी, मी तुझ्याशी सहमत आहे. आपल्याला त्या बंधूसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्या समस्येतून त्याची सुटका करावयाची आहे."

२.प्रोत्साहन देण्याचे सेवाकार्य : जखऱ्याचे आशीर्वादित असे सेवाकार्य हे निराश झालेल्या लोकांना प्रोत्साहित करणारे होते. यहूदी नुकतेच बाबेलहून परत आले होते जिथे त्यांचे वडील गुलाम होते आणि ते गरीब, भेदरलेले आणि निराश होते. त्यांना पुष्कळ मारहाण झाली होती. ते २०० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांसारखे सुसंस्कृत, शुद्ध मनाचे किंवा श्रीमंत नव्हते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जखऱ्याला पाचारण करण्यात आले. जखऱ्या ८:६,८ मध्ये "सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवसांत ह्या अवशिष्ट राष्ट्रांना ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी त्यांना घेऊन येईन व ते यरुशलेमेत (मंडळी ) वस्ती करतील आणि सत्याने व न्यायीपणाने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन." त्यामुळे देव आपल्याला धीर धरायला सांगतो आणि त्याची मंडळी पूर्ण होईपर्यंत आणि पूर्णतेस जाईपर्यंत काम करायला सांगतो. "त्यामुळे घाबरू नका किंवा निराश होऊ नका, तर त्याऐवजी मंदिराची (मंडळी) पुनर्बांधणी करा!" (जखऱ्या ८:९-१३ ) (लिव्हिंग बायबल) . या प्रोत्साहनाच्या संदेशामुळे जखऱ्याच्या काळातील लोकांना मंदिर बांधण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली. आणि प्रोत्साहनाच्या शब्दामुळेच लोकांना आज मंडळी बांधण्यासाठी उत्तेजन मिळेल.

३. इतरांशी समतोल साधणारे सेवाकार्य : जखऱ्या ४:१-१४ मधील दोन झाडे ही देवाच्या अभिषिक्त सेवकांचे प्रतीक आहेत ज्यांना देव मंडळीला ताजेतवाने व आत्म्याने भरलेले राहण्यासाठी वापरतो. ते स्वतः आत्म्याने भरलेले असतात आणि नेहमी आत्म्याच्या सहवासात असतात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्याद्वारे तेल वाहते. मंडळीला देवाच्या अशा प्रकारच्या अनेक सेवकांची गरज आहे. हाग्गय आणि जखऱ्या हे दोन पुरुष एकत्र काम करू शकत होते. देवाच्या प्रत्येक सेवकाने देवाच्या दुसऱ्या सेवकाच्या सेवाकार्यात समतोल साधला पाहिजे. एक झाड एका बाजूने तर दुसरे झाड दुस-या बाजूने तेल ओतते. एक व्यक्ती कृपेवर जोर देते आणि दुसरा सत्यावर जोर देतो. पण ते एकत्र मिळून ख्रिस्तात दिसणारे देवाचे वैभव प्रकट करतात आणि मंडळीचा दीपस्तंभ तेजस्वीपणे जळतो (योहान १:१४). जिथे दोन बंधू मंडळीच्या उभारणीसाठी एकत्र काम करू शकतात- दोन्ही पवित्र आत्म्याने भरलेले, स्पर्धा, मत्सर, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसलेले किंवा स्वतःला इतरांपेक्षा अधिक चांगले दाखवण्याची इच्छा नसणारे परंतु फक्त दीपस्तंभ जळत राहावा अशी इच्छा असणारे असे ते, मंडळी बांधू शकतात ज्याविरुद्ध नरकाची द्वारे विजय मिळवू शकत नाही.