लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

देवाच्या वचनाच्या विरुद्ध शिकवणाऱ्या आणि येशूने जे शिकवले त्याच्या विरुद्ध शिकवणाऱ्यांसोबत आपली कोणतीही सहभागिता असू शकत नाही. देवाशिवाय गर्दीमध्ये असण्यापेक्षा देवासोबत एकटे राहणे चांगले. लक्षात असू द्या की सर्वसाधारणपणे ख्रिस्ती धर्मजगतात बहुसंख्य लोक सहसा चुकीचे असतात. इथे देवाच्या वचनातील पाच उदाहरणात आपण हे पाहू शकतो :

१. बहुसंख्य लोक वासराची उपासना करत होते तेव्हा मोशेने विचारले की, प्रभूच्या बाजूने कोण आहे? एकच वंश (लेवी) त्याच्यासोबत उभा होता. त्यामुळे त्यांना याजकपण (निर्गम ३२) देण्यात आले. बहुसंख्य (११ वंश) चुकीचे होते.

२. शौलाने देवाचा अभिषिक्त दावीद याच्यावर हल्ला करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे अनर्थ घडला. शौलाकडे इस्राएलातील बहुसंख्य होते. पण देव दाविदाबरोबर होता (१ शमुवेल १६). नंतर, अबशालोमानेही आपले वडील दावीद यांचा पाठलाग केला तेव्हा त्याच्याबरोबरही बहुसंख्य इस्राएली होते. पण देव दाविदाबरोबर होता (२ शमुवेल १५).

३. गणना १३ मध्ये आपल्याला असे आढळून येते की इस्राएली लोक कनानाच्या सीमेवरील कादेश बर्ण्या येथे आले होते- देवाने त्यांना वचन दिलेला देश. इजिप्त सोडून त्यांना (अनुवाद २:१४, २९:५) आता दोन वर्षे झाली होती आणि देवाने त्यांना आत जाऊन देश हस्तगत करण्यास सांगितले. इस्राएली लोकांनी बारा हेरांना ही भूमी हेरण्यासाठी पाठवले. ते सगळे जण परत सांगत आले की हा देश खरोखरच एक अद्भुत देश आहे. पण त्यांपैकी दहा जण म्हणाले, "पण तिथे मोठे धिप्पाड लोक आहेत आणि आम्ही त्यांना जिंकू शकत नाही." पण त्यांपैकी दोन - कालेब आणि यहोशवा - म्हणाले, "त्या महाकाय लोकांवर विजय मिळवण्यासाठी प्रभू आम्हांला मदत करेल." पण ६,००,००० इस्राएली लोकांनी बहुसंख्य लोकांचे म्हणणे मान्य केले.

यातून आपण काय शिकतो? सर्वप्रथम, बहुमताचे पालन करणे धोकादायक आहे - कारण बहुसंख्य लोक नेहमीच चुकीचे असतात. येशूने म्हटले: "परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत."(मत्तय ७:१४) बहुसंख्य लोक अजूनही विनाशाच्या रुंद मार्गावर जातात. त्यामुळे जर तुम्ही बहुमताचे पालन केले तर विनाशाच्या रुंद मार्गावर तुम्ही नक्कीच त्यांच्यासोबत असाल. मोठी मंडळी म्हणजे आध्यात्मिक मंडळी अशी कधीही कल्पना करू नका. येशूच्या मंडळीमध्ये फक्त ११ सदस्य होते.

जेव्हा दहा पुढारी एक गोष्ट सांगतात आणि दोन पुढारी नेमके उलट सांगतात, तेव्हा तुम्ही कोणाची बाजू घ्याल? देव इथे दोघांच्या बाजूला होता - यहोशवा आणि कालेब. अविश्वास आणि सैतान इतर दहा जणांच्या बाजूने होते. पण इस्राएली लोकांनी मूर्खपणे बहुमताचे पालन केले - आणि म्हणूनच त्यांना पुढील ३८ वर्षे अरण्यात भटकावे लागले. देव कोणाची बाजू घेत आहे हे पाहण्याची त्यांना समज नव्हती! देव आणि एक व्यक्ती नेहमीच बहुमत असतात - आणि तिथेच मला नेहमी उभे राहायचे असते. निर्गम ३२ मध्ये आपण पाहतो की सर्व इस्राएल लोक सोन्याच्या वासराची उपासना करत असताना मोशे या केवळ एका मनुष्याच्या बाजूने देव होता. पण सर्व बारा वंशांपैकी लेवी वंशालाच ते दिसले. आणि आता देव, यहोशवा आणि कालेब यांच्याबरोबर होता तेव्हा लेवीच्या वंशालाही ते ओळखता आले नाही!

या सगळ्यांतून आज आपल्यासाठी धडे आहेत. सर्वसाधारणपणे ख्रिस्ती धर्मजगतात तडजोड आणि जगिकपणा आहे. देव इकडे-तिकडे, कोणतीही तडजोड न करता देवाच्या वचनाच्या सत्याच्या बाजूने असणारे मोजके लोक उभे करतो. जर तुम्हांला समज असेल तर तुम्ही हे ओळखाल की देव त्या मोजक्या लोकांबरोबर आहे आणि तुम्ही बहुसंख्य लोकांच्या विरोधात उभे राहाल. तुम्ही त्यांच्याबरोबर वचनदत्त देशात प्रवेश कराल. देव ज्याच्याबरोबर उभा आहे त्या मनुष्याला तुम्ही कसे ओळखता? तो विश्वासाची भाषा बोलतो. यहोशवा आणि कालेब हे विश्वासाची भाषा बोलले : "आपण मात करू शकतो." क्रोध, लैंगिक वासना, मत्सर, कुरकुर इत्यादींच्या महाकायांवर आपण मात करू शकतो.आपण सैतानावर मात करू शकतो. देव त्याला आपल्या पायाखाली चिरडून टाकेल. देव ज्याच्याबरोबर उभा आहे त्या मनुष्याची ही भाषा आहे.

४. यहुद्यांनी येशूला नाकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते जवळजवळ १९०० वर्षे विखुरले गेले. बहुसंख्य लोक यहुदी आणि परूशांबरोबर होते. पण देव येशूसोबत होता आणि त्याने त्याला मृतांतून उठवले.

५. पौलाच्या बहुतेक मित्रांनी त्याला आयुष्याच्या शेवटी सोडले . पण प्रभू शेवटपर्यंत पौलाबरोबर होता (२ तीमथ्य १:१५; ४:१६-१८).