लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

योसेफ -

मत्तय १:१९ मध्ये आपण असे वाचतो की जेव्हा योसेफाने मरीयेच्या गर्भवती असण्याविषयी ऐकले, आणि त्याला हे माहित नव्हते की तिच्या गर्भाशयात देवाचे हे एक अलौकिक कार्य आहे, तेव्हा ते वचन सांगते की, तो नीतिमान असल्याने त्याला तिची बेअब्रू करायची नव्हती तर त्याला जे तिचे पाप वाटत होते ते झाकावे अशी त्याची इच्छा होती.

इथे नीतिमत्त्वाबद्दल असे काही आहे जे आपण सर्व शिकू शकतो. सुवार्तेचा संदेश मूलत: एक अनीतिमान मनुष्य नीतिमान कसा होऊ शकतो हा आहे. नवीन करारात नीतिमान म्हटलेला पहिला मनुष्य म्हणजे योसेफ. आणि त्याच्या नीतिमत्वाचा उल्लेख दुसऱ्या व्यक्तीच्या पापावर पांघरूण घालण्याच्या इच्छेशी संबंधित आहे आणि त्या व्यक्तीची बेअब्रू करण्यात नव्हे. हा खरोखरच नीतिमान माणसाचा स्वभाव आहे.

जेव्हा तुम्ही ऐकता की एखाद्याने पाप केले आहे, तेव्हा तुमची तत्काळ प्रतिक्रिया काय असते? तुम्ही एक नीतिमान मनुष्य असाल तर, ते झाकण्याची इच्छा धराल. जर तुम्ही एक अनीतिमान मनुष्य असाल तर त्याबद्दल इतरांना सांगाल. येथे आपण पाहतो की योसेफ, ज्याला पवित्र आत्मा नव्हता आणि जो नवीन कराराच्या अधीन नव्हता तो, नव्या जन्माचा दावा करणाऱ्या लाखो विश्वासणाऱ्यांपेक्षा अधिक नीतिमान होता. जुन्या कराराच्या मापदंडांनुसार योसेफाने जे त्याला पाप वाटले ते, झाकण्याचे ठरवले.

योसेफाने मरियेबद्दल कधीही खोटी बातमी पसरवली नाही याबद्दल देवाचे आभार. कारण जर त्याने तसे केले असते, तर तुम्ही याची कल्पना करू शकता का की जेव्हा त्याला सत्य समजले असते तेव्हा त्याला किती दुःख आणि पस्तावा वाटला असता -याबद्दल की ती १०० % शुद्ध आणि निष्पाप होती !!

या गोष्टी आपल्या शिक्षणासाठी लिहिलेल्या आहेत. तुम्ही इतरांबद्दल पसरवलेल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही नंतर परत कशा काय घेऊ शकता जेव्हा त्या खोट्या आहेत हे तुम्हांला समजेल ? कारण आपण ज्यांना सांगितले होते त्यांनी कदाचित हे आणखी दहा लोकांपर्यंत पसरवले असेल व त्यांनी ते आणखी पुढे पसरविले असेल. म्हणून येथे नवीन कराराच्या पहिल्याच अध्यायात आमच्यासाठी ही एक चेतावणी व उदाहरण आहे. इतरांच्या पापांवर पांघरूण घाला. योसेफाच्या उदाहरणावरून शिका.

शेम आणि याफेथ -

उत्पत्ति ९:२०-२७ मध्ये आपण वाचतो की नोहा एके दिवशी द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडानागडा पडला. त्याचा मुलगा हाम याने त्याला पाहून त्याच्या भावांना हे वृत्त सांगितले. अशा प्रकारे हामाने आपल्या वडिलांचा अनादर केल्यामुळे, त्याच्यावर एक शाप ओढवला. शेम आणि याफेथ यांनी मात्र पाठमोरे होऊन त्यांच्या वडिलांची नग्नता झाकली. म्हणून, ते आशीर्वादित झाले. आमच्यासाठी येथे एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. पवित्र शास्त्रात इथे आपण पहिल्या वेळेस आपल्या वडिलांचा अनादर केल्याबद्दल मुलाला आणि त्याच्या संततीला शिक्षा केल्याचे वाचतो.

जेव्हा आपण अधिकाराचा अनादर करतो तेव्हा देवासमोर ही एक गंभीर बाब आहे. जेव्हा आपण आपल्या वडिलांमध्ये किंवा एखाद्या देवाच्या मनुष्यामध्ये अशक्तपणा पाहता, तेव्हा हामाने केल्याप्रमाणे इतरांसमोर ते उघड करू नका जर तुम्हांला स्वतःवर शाप ओढवून घ्यायचा नसेल. शेम आणि याफेथासारखे व्हा आणि ते झाकून टाका. "प्रीती पापांची रास झाकून टाकते" (१ पेत्र ४:८, नीतिसूत्रे १०:१२).

नोहाने शेम व याफेथ यांना सहभागितेचा आशीर्वाद देऊन असे म्हटले की “देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्‍यात राहील.”(उत्पत्ति ९:२७). आपणही जे एकत्र राहून एकमेकांची पापे झाकतात अशांशी सहभागिता तयार केली पाहिजे. फक्त असे विश्वासणारेच येशू ख्रिस्ताची मंडळी बांधू शकतात.