लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रार्थना म्हणजे केवळ देवाशी बोलणे नव्हे तर त्याचे बोलणे ऐकणेदेखील होय. आणि त्याच्याशी बोलण्यापेक्षा त्याचे ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे. विचार करा: जर तुम्ही एखाद्या वयस्कर आणि अधिक देवभीरू व्यक्तीशी फोनवर बोलत असाल, तर तुम्ही बोलण्यापेक्षा कितीतरी अधिक ऐकाल. प्रार्थनेच्याबाबतीत असेच असले पाहिजे- तुम्ही देवाशी बोलण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याचे ऐकले पाहिजे.

एखादी गोष्ट करण्याची तुम्हाला खूप इच्छा असेल, तर ती देवाची इच्छा आहे, अशी सहज फसवणूक करून, त्याविषयी तुमच्या विवेकबुद्धीचे समाधान करण्यासाठी थोडक्यात प्रार्थना करून आणि मग ती गोष्ट करण्याबद्दल तुमच्या 'मनाला शांती आहे', असे स्वत:शीच म्हणू शकता - आणि ती गोष्ट करू शकता! अशा प्रकारे तुम्ही देवाच्या इच्छेपासून पूर्णपणे भटकू शकता. लक्षात असू द्या: तुम्हाला जितका महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, तितके जास्त तुम्ही कृती करण्याआधी देवाची वाट पाहिली पाहिजे.

देह हा मूलत: आळशी आणि आनंदप्रिय आणि आरामप्रिय असतो. त्याने फसवले जाऊ नका. देवाच्या इच्छेचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना, तुमच्या ज्ञानेंद्रियांद्वारे तुमच्यावर पडणारे प्रभाव तुम्ही नाकारले पाहिजेत. जितके अंतर पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये आहे तितकेच अंतर तुमची विचार करण्याची पद्धत आणि देवाचे विचार यांत आहे. (यशया ५५:८,९). देवाची काम करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने उच्च प्रतीची आहे. म्हणूनच देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याच्या अधीन व्हावे - त्याचे सर्वोत्तम प्राप्त व्हावे म्हणून.

कदाचित तुमच्याकडे प्रार्थनेसाठी जास्त वेळ नसेल. परंतु आपले निर्णय घेताना परमेश्वरावर विसंबण्याची वृत्ती तुमच्यात असली पाहिजे. आणि म्हणून दररोज देवाबरोबर काही मिनिटे घालवण्यासाठी स्वत:ला शिस्त लावा - शक्यतो सकाळी पहिली गोष्ट. सकाळी ते शक्य नसेल, तर दिवसातून कधीतरी. नाहीतर, तुमच्यावर जे प्रभाव होतील त्यामुळे तुमच्या जीवनात देवाच्या इच्छेपासून तुमची दिशाभूल होईल.

देवाला दररोज तुमच्याशी संवाद साधायचा आहे. पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानावरून हा संदेश येतो ज्यात असे म्हटले आहे: "पहिल्या दिवशी देव बोलला.... दुसऱ्या दिवशी देव बोलला......... तिसऱ्या , ............ चौथ्या , ............ पाचव्या आणि सहाव्या दिवशी, देव बोलला". जेव्हा देव बोलत असे तेव्हा दररोज काहीतरी घडत असे आणि त्याचा अंतिम परिणाम "फार चांगला" असा झाला. तसेच जर तुम्ही दररोज देवाचे ऐकले तर ते तुमच्या आयुष्यातही असू शकते. येशूने म्हटले, " मनुष्य परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल." (मत्तय ४:४). जर तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज देवाला प्रथम स्थान दिले नाही, तर पापाकडे मागे परत फिरणे खूप सोपे जाईल.

"देवाचे ऐकणे" याचा अर्थ पवित्र शास्त्र वाचणे असे मला म्हणायचे नाही, तर दिवसभर तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने पवित्र आत्म्याचा आवाज ऐकणे अभिप्रेत आहे, जेणेकरून तुम्ही त्याला आवडेल ते कराल आणि त्याला नाराज करणारी कोणतीही गोष्ट टाळू शकाल.

देवाला नेहमीच आपल्या प्रार्थनेचे उत्तर द्यायचे असते. परंतु उत्तरासाठी आपण त्याची आतुरतेने वाट पाहिली पाहिजे. कधीकधी त्याचे उत्तर “नाही” असे असू शकते. कधीकधी ते "वाट पाहा" असू शकते. वाहतुकीच्या लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या दिव्यांप्रमाणे, देवाचे उत्तर "नाही", "वाट पाहा" किंवा "होय" असू शकते.