लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   पुरूष
WFTW Body: 

कल्पना करा की 1960 वर्षांपूर्वी तुम्ही पॅलेस्ताईनमध्ये आहात आणि नासरेथच्या येशूच्या सेवेविषयी तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकले की तो लोकांचे रोग बरे करितो. तुम्ही त्याला पाहिलेले नाही. परंतु आता यरूशलेमेमध्ये मोठी सभा आयोजीत करण्यात आली आहे. त्याठिकाणी येशू नावाच्या वक्त्याला बोलावण्यात आले आहे. तुम्ही जवळ जाता आणि पाहता की रंगमंचावर वक्ता असलेला येशू आहे, पिलात आहे, हेरोद आहे, हनन्या व कयफा खुर्च्यांवर बसलेले आहेत. येशू पुढे येऊन लोकांना म्हणतो की आज त्यांचे सौभाग्य आहे की पॅलेस्ताईनचे दोन मोठे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत आहेत, ''आदरणीय हेरोद महाशय व पिलात महाशय, यांनी आपल्या उपस्थितीद्वारे आपली सभा सुशोभीत केली. एवढेच नव्हे तर देवाचे दोन मोठे दास राईट रेव्ह. हनन्या व कयफा देखील आपल्यामध्ये आहेत व त्यांच्या उपस्थितीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे.''

चार पाहुण्यांची अशी ओळख करून दिल्यावर येशू हेरोद व पिलाताला दोन शब्द बोलण्याचे आमंत्रण देतो. हेरोद व पिलात दोघेही येशूची स्तुती करितात की समाजासाठी येशूने मोठी सेवा केली आहे आणि सर्व लोकांच्या सहकार्याच्या तो लायकीचा आहे. त्यानंतर राईट रेव्ह. हनन्या व कयफाला येशू आमंत्रण देतो की त्यांनी प्रार्थना करावी व दोन शब्द बोलावे. ते देखील येशूच्या सेवेची प्रशंसा करितात व लोकांना आव्हान करितात की त्यांनी येशूच्या सेवेला मदत करावी.

त्यानंतर येशू यहूदा इस्कर्योतीला विनंती करितो की त्याने लोकांना सेवेतील आर्थिक गरजांविषयी सांगावे. यहूदा इस्कर्योत लोकांना सांगतो की सेवेतील गरजा पूर्ण करण्याकरिता हजारो रुपयांची गरज आहे. तो सांगतो की दान देणार्यांनी उपलब्ध असलेले फॉर्म भरावे व त्यात प्रतिज्ञा करून सही करावी की ते येशूच्या सेवेसाठी विशेष प्रार्थना करतील व दान देत राहतील. दान देणारे विश्वासणारे असो वा नसोत, ते श्रीमंत असल्यास चांगले अशा शब्दात तो विनंती करितो. त्यानंतर हेरोद राजा उठून जाहीर करितो की जे लोक येशूच्या सेवेला दान देतील त्यांचा कर कमी करण्यात येईल. त्यानंतर दान गोळा करण्यात येते. येशू एक लहान संदेश देतो आणि लोकांना चमत्कार करून दाखवितो आणि काही थोड्या लोकांचे रोग सुद्धा बरे करितो. सभा संपल्याबरोबर लोकांनी गर्दी करण्यापूर्वी येशू हा हेरोद, पिलात हनन्या, कयफा व यहूदा इस्कर्योत सोबत पैशाची थैली घेऊन रोमी रथात बसतो व यरूशलेमेच्या मोठ्या महालात जाऊन मेजवानीचा आनंद घेतो.

शेवटी, तुम्ही नुकतेच परिवर्तित झालेले असाल, पारख करण्यास सक्षम नसाल, तुम्हाला अनुभव नसेल परंतु, काही थोड्या प्रमाणात ही गोष्ट तुमच्या मनाला खटकेल. मत्तय, पेत्र व योहान या शिष्यांनी येशूविषयी जे सांगितले त्या येशूच्या जीवनाप्रमाणे ही वरील घटना मुळीच दिसत नाही. ही अगदी त्याविरोधात आहे.

परंतु, सैतान आपल्या कानामध्ये हळूच सांगतो, 'लिहिले आहे, ∙याय करू नको' ' (मत्तय 7:1). परंतु तुम्ही त्याला म्हणता, ''असे देखील लिहिले आहे, ्य्रत्येक आत्म्यावर विश्वास करू नका. पारख करा की ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही, कारण पुष्कळसे खोटे संदेष्टे जगामध्ये आहेत.'' 'प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरूं नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयीं त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगांत उठले आहेत' (1 योहान 4:1). शेवटी तुम्हाला सत्य कळते, ''पिलात व हेरोद बरोबर असलेला रंगमंचावरील येशू खरा येशू नाही ज्याच्याविषयी आम्ही ऐकले होते. हा नक्कीच वेगळा येशू आहे''(2 करिंथ 11:4). तुम्ही अगदी बरोबर ओळखले. हा रंगमंचावरील येशू वेगळाच येशू आहे. हे सत्य तुम्हाला कसे कळले? कारण देवाने तुम्हाला ते प्रगट केले (1 योहान 2:19, 20 व 27).

1. खरा येशू जगिक अधिकार्यांकडून दानधर्माची अपेक्षा करीत नाही किंवा अपरिवर्तित धार्मिक प्रमुखांकडून सेवेकरिता पैसे मागत नाही. तो अशा लोकांची स्तुती देखील करीत नाही. एकदा एक बिशप येशूकडे आला. तेव्हा येशूने त्याला सांगितले की त्याला नव्याने जन्म घेण्याची गरज आहे (योहान 3:1-10). येशूने हेरोद राजाला 'कोल्हा' म्हटले (लूक 13:31,32). येशू हेरोदापुढे असता हेरोदासोबत बोलला नाही (लूक 23:8,9).

2. खरा येशू सेवेकरिता कोणालाही पैसे मागत नव्हता. तो आपल्या गरजा केवळ पित्याला सांगत होता. मग पिता लोकांच्या मनात कार्य करीत होता किंवा मासे जाळ्यात पाठवीत होता जेणेकरून येशूची गरज भागावी. तो भाकरी व मासे बहुगुणीत करीत होता (लूक 8:1-3, मत्तय 17:27).

3. खर्या येशूने त्याच्या प्रार्थनेंचे मोल लावून त्या कधीच विकल्या नाही. शोमरोनातील शिमोनाने एकदा पेत्राच्या प्रार्थनेकरिता पैसे देण्याचा प्रस्ताव मांडला. या दुष्ट विचाराकरिता पेत्राने त्याला दटावले. दैवी दान विकत घेता येत नाही किंवा विकता येत नाही (प्रेषित 8:18-23). शिमोनाने लगेच पश्चात्ताप केला. परंतु, पश्चात्ताप न केलेल्या त्याच्या अनुयायांचा सर्व युगांमध्ये सुळसुळाट होता आणि आज देखील मोठ्या प्रमाणात तो आढळतो. रोमन कॅथलीक पोप जे स्वतःला पेत्राचे उत्तराधिकारी म्हणतात त्यांनी नेहमी पैशात आपल्या प्रार्थना विकल्या आहेत. हे पोप स्वतःला त्या पेत्राचे उत्तराधिकारी म्हणतात ज्याने शिमोनाला दटावले होते की त्याने देवाच्या दानांचा सौदा करू नये. मार्टीन ल्यूथर पेत्राप्रमाणेच या दुष्ट वृत्तीविरुद्ध उभे झाले. परंतु, आजचे प्रोटेस्टंट देखील आपल्या प्रार्थना विकत आहेत व भविष्यवाण्या करून पैसा मिळवीत आहेत. त्या शिमोनासारखे अनेक लोक प्रार्थनेंकरिता, दानांकरिता व भविष्यवाण्यांकरिता पैसा मोजण्यास तयार आहेत.

येशूने विशेषेकरून ताकीद दिली आहे की शेवटच्या दिवसांमध्ये फसविणारे निवडलेल्यांना देखील फसवितील. ते चिन्ह व चमत्कार करून निवडलेल्यांना फसवितील (मत्तय 24:24). आज निवडलेल्यांनी चिन्ह चमत्कार करणार्या सेवकांची पारख करणे फार महत्वाचे आहे. येशूने म्हटले की आपण त्या लोकांवर विश्वास ठेवू नये जे सांगतात की त्यांनी येशूला आपल्या खोलीत पाहिले (मत्तय 24:26). पुनरुत्थित येशूचे शरीर देवपित्याच्या उजवीकडे आहे व 1900 वर्षांपासून ते पित्याला सोडून गेले नाही. पौल व स्तेफनाने त्याठिकाणी त्याला पाहिले, पृथ्वीवर नव्हे (प्रेषित 7:55; 9:3). योहानाने सुद्धा पात्म याठिकाणी येशूचे शरीर पाहिले नाही. परंतु, त्याने येशूच्या शरीराचे प्रतिनिधीत्व करणारे चिन्ह पाहिले (प्रकटीकरण 1:13-16). येशू ज्या दिवशी स्वर्ग सोडून येईल त्यादिवशी तो पुन्हा एकदा पृथ्वीवर येणार. हे त्याचे दुसरे येणे असणार.

म्हणून जेव्हा कोणी म्हणेल की येशू ख्रिस्त त्यांच्या खोलीत आला होता आणि त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

सहज भुलविल्या जाणार्या विश्वासणार्यांमध्ये आपण जीवन जगत असताना आपण पारख करणे सोडू नये. या शेवटच्या दिवसांमध्ये आपण राहत असताना देवाचे वचन आपल्याला स्पष्ट प्रकाश देईल जेणेकरून आपल्याला योग्य पारख करता येईल. परंतु आपली त्याकरिता इच्छा असावी. देवाच्या वचनाच्या प्रकाशात आपण चालल्यास आपण भुलविले जाणार नाही.