लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

1 राजे 19:19-21 मध्ये आपण वाचतो की एलीया अलीशाला पाचारण करीत आहे. जेव्हा एलीयाने अलीशाला पाचारण केले तेव्हा अलीशा आपल्या शेतामध्ये बैलांसोबत कष्ट करीत होता.

नोंद घ्या की सर्वप्रथम देव अशा लोकांना पाचारण करितो जे आपल्या व्यवसायात किंवा कामात कष्ट करतात व विश्वासू राहतात. मोशेला देवाने पाचारण केले तेव्हा मोशे आपल्या सासर्याची मेंढरे विश्वासूपणे राखीत होता. दावीद देखील मेंढरांना राखीत असे व सिंह आणि अस्वलासोबत झोंबी करून मेंढरांचे रक्षण करीत असे. आमोस देखील कष्टाळू होता. पेत्र, याकोब, योहान व आंद्रिया मासे धरणारे असून कष्ट करीत असत. मत्तय मोठ्या कष्टाने हिशोब सांभाळीत असे. जुना करार असो वा नवीन करार असो देवाने कोणत्याही आळशी माणसाला सेवेकरिता पाचारण केलेले नाही.

याठिकाणी असे झाले नाही की एलीया अलीशाच्या घरी गेला तेव्हा अलीशा घरामध्ये झोपलेला होता. असे झाले असते तर आपण म्हटले असते की देवाने आळशी माणसाला पाचारण केले. येशूने सुद्धा पेत्राच्या घरी संध्याकाळी जाऊन त्याला पाचारण केले नाही. पेत्र मासे धरीत असताना येशूने त्याला पाचारण केले.

या सर्व उदाहरणांवरून आपल्याला कळते की आपला कोणताही व्यवसाय असो किंवा काम असो त्यात आपण कष्टाळू असावे व विश्वासू असावे अशी देवाची इच्छा आहे. त्यानंतरच तो आपल्याला त्याची सेवा करण्याचे पाचारण देईल. जर तुम्ही जगातील गोष्टींमध्ये विश्वासू नसला तर स्वर्गातील गोष्टींबाबत कसे विश्वासू राहणार? जर तुम्ही तरुण आहात व घरी राहता तर घरामध्ये विश्वासू पुत्राची किंवा कन्येची जबाबदारी सांभाळा.

दुसरी गोष्ट लक्षात घ्या की देवाने ज्यांना ज्यांना पाचारण केले त्यांनी त्यांनी आपले सर्वकाही तिथेच सोडून ते देवाला अनुसरले. आपण पाहतो की पेत्र, योहान व मत्तय त्याचप्रमाणे अलीशा या सर्वांनी आपले सर्व तिथेच सोडून ते देवाला अनुसरले. जे देवाच्या पाचारणाला ताबडतोब व पूर्ण मनाने प्रतिसाद देतील त्यांनाच देव पाचारण करितो. ते देवाच्या लोकांचा सल्ला घेऊन आपल्या पाचारणाची पूर्ण खात्री करून घेतात जेणेकरून त्यांचा निर्णय भावनात्मक नसावा. पाचारणाविषयी त्यांची पूर्ण खात्री झाल्याबरोबर ते ताबडतोब कार्य करू लागतात. देव केवळ अशा लोकांचाच उपयोग करून घेतो कारण त्याच्या सेवेमध्ये तात्काळ आज्ञापालनाची, पूर्ण समर्पणाची व कष्टाची आवश्यकता असते.

या कारणास्तव देव आपल्या व्यवासायामध्येच आपली पारख करितो की आपण विश्वासू आहोत किंवा नाही. जर तुम्हाला खोली स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले किंवा खोली नीट स्वच्छ केली नाही तर शंका आहे की देव तुम्हाला सेवेकरिता पाचारण करेल किंवा नाही. जर तुम्ही खोली नीट स्वच्छ केली नाही तर तुम्ही स्वतःचे अंतःकरण सुद्धा नीट स्वच्छ करणार नाही. मग मंडळी स्वच्छ करण्याचे काम देव तुम्हाला कसे देईल? देव आपल्याकडून लहान गोष्टींमध्ये सुद्धा विश्वासूपणाची अपेक्षा करितो.